विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकारसय्यद हैदर रझा उर्फ एस.एच. रझा (वय ९४) यांचे २३ जुलै रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
भारतात आधुनिक व बंडखोर विचारांच्या चित्रकलेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुप’च्या अध्वर्यूंपैकी रझा एक होते.
काबुलमध्ये दहशतवादी हल्ला
अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ८० जण ठार, तर २३१ जण जखमी झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
काबुलमधील देह मझांग चौकात हजारा समूदायाचे लोक आंदोलन करत होते. तेव्हा ३ आत्मघाती हल्लेखोरांनी स्वतःला उडवून घेतले.
२९ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस विराट निवृत्त
जगातील सर्वांत जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ‘गिनिज बुक’मध्ये नोंद असलेली ‘आयएनएस विराट’ २९ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे.
नौदलात विराट कामगिरी बजावलेल्या या युद्धनौकेवरील सगळा भार आता २०१३मध्ये नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर गेला आहे.
विशाखापट्टणम येथे याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमध्ये भाग घेतल्यानंतर विराट नौदलाच्या पश्चिम विभागाच्या गोदीत नांगर टाकून उभी होती.
कोचिन शिपयार्डमध्ये तिच्यात काही महत्त्वाची दुरुस्ती करून नंतर ती वर्षाच्या अखेरीस पुन्हा मुंबईत आणली जाईल आणि तिला समारंभपूर्वक निवृत्त केले जाईल.
व्हाईट टायगर म्हणून नावाजली गेलेली ‘सी हॅरिअर फायटर एअरक्राफ्ट’ या युद्धनौकेवर होती. गोव्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनाही निवृत्ती देण्यात आली.
भारतीय नौदलात १२ मे १९८७ मध्ये दाखल झालेली ‘आयएनएस विराट’ त्या वेळी देशातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती.
२,२५० दिवस गस्तीवर असलेल्या या युद्धनौकेने ५,८८,२८८ समुद्री मैल अंतर प्रवास केला. विराटने संपूर्ण पृथ्वीची २७ वेळा प्रदक्षिणा होईल एवढा जलप्रवास सहा वर्षांत केला.
भारतीय नौदलापूर्वी २७ वर्षे तिने युनायटेड किंगडमच्या ‘रॉयल नेव्ही’साठी एचएमएस हर्मेस नावाने कामगिरी बजावली होती. १९८२च्या फाल्कच्या भू अभियानाच्या वेळी रॉयल नेव्हीची ‘फ्लॅगशिप’ म्हणूनही तिने कामगिरी बजावली होती.
तीन चिनी पत्रकारांना देश सोडण्याचा इशारा
गुप्तचर खात्याने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेसाठी भारतात काम करणाऱ्या तीन पत्रकारांचा भारतातील मुक्काम वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
या तीन पत्रकारांना ३१ जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
हे तीन पत्रकार फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांना भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले आहे.
वू किआंग, तांग लू आणि मी किआंग या तीन पत्रकारांचा व्हिसा महिनाअखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यांनी उत्तराधकिारी येईपर्यंत मुक्काम वाढवण्याची परवानगी मागितली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा