चालू घडामोडी : ३० व ३१ डिसेंबर

प्रा. यमुना कृष्णन यांना इन्फोसिस पुरस्कार

  • भारतीय महिला वैज्ञानिक प्रा. यमुना कृष्णन यांना भौतिकशास्त्र विषयातील इन्फोसिस पुरस्कार २०१७ जाहीर झाला आहे.
  • ६५ लाख रुपयांचा इन्फोसिस पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित संशोधन पुरस्कारांपैकी एक आहे.
  • अभियांत्रिकी व संगणक शास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितीशास्त्र, समाजशास्त्र आणि मानवता या सहा श्रेणींमध्ये प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • यमुना कृष्णन यांचा जन्म २४ मे १९७४ रोजी केरळमध्ये झाला. सध्या त्या शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात अध्यापिका आहेत.
  • यमुना यांनी रसायनशास्त्रात एमएस केल्यानंतर बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमधून पीएचडी केली आहे.
  • २००२-०४ या काळात त्यांनी केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले. रसायनशास्त्राच्या माध्यमातून त्या डीएनए संशोधनाकडे वळल्या. 
  • कृष्णन यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत पेशीतील रसायनांच्या नेमक्या क्रिया कशा चालतात हे जाणून घेण्यासाठी नॅनोबोट्स तयार केले. ते डिझायनर डीएनएवर आधारित होते.
  • एखादी निरोगी पेशी व बाधित पेशी यांच्यात नेमका काय फरक असतो हे त्यातून स्पष्ट झाले.
  • त्यांच्या नॅनोबोट्सनी पेशींचे आचरण कसे चालते हे टिपले आहे. पेशींच्या इतर घटकांना धक्का न लावता हे नॅनोबोट्स काम करतात.
  • पेशींच्या रासायनिक व्यवहारांचे नॅनोबोट्सच्या माध्यमातून चित्रण ही त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.
  • प्रा. कृष्णन या शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराच्या मानकरी असून इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

विश्वनाथन आनंदला विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद

  • विश्वनाथन आनंदने रियाध येथे सुरु असलेल्या विश्व जलद बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता होण्याचा मान मिळविला.
  • याआधी २००३मध्ये आनंदने अंतिम लढतीत ब्लादीमिर क्रामनिकला नमवून विश्वविजेतेपद जिंकले होते.
  • आनंदने टायब्रेकरमध्ये रशियाचा ग्रॅण्ड मास्टर व्लादिमिर फेडोसीव्हवर २-० असा विजय नोंदवित विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
  • एकूण १५ फेऱ्यांच्या या स्पर्धेत विश्वनाथन आनंद ६ विजय आणि ९ ड्रॉ अशा वाटचालीसह विश्वविजेता ठरला.

रोनाल्डोला ‘ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्कार

  • पोर्तुगाल व रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला ‘ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • युरोपियन असोसिएशन फुटबॉल एजंट्स आणि युरोपियन क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो.
  • रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी त्याने २०११, २०१४ आणि २०१६ साली हा पुरस्कार जिंकला आहे. 
  • यंदाच्या सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार रिअल माद्रिदने, तर सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार झिनेदिन झिदान यांनी पटकावला.

रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश

  • दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर रोजी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
  • स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी केली आहे.
  • रजनीकांत यांच्या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मासिक : नोव्हेंबर २०१७

चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा.
मासिक आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.
हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा.
Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २९ डिसेंबर

मेघालयमध्ये कॉंग्रेसच्या पाच आमदारांचा राजीनामा

  • मेघालयमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या पाच आमदारांसह इतर तीन आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
  • यामध्ये कॉंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचाही समावेश आहे. या सर्वांनी आपले राजीनामे विधानसभेचे मुख्य सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.
  • यामुळे एकूण ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे आता केवळ २४ आमदार राहिले आहेत.
  • विधानसभेचा कार्यकाळ ६ मार्च रोजी संपणार असून २०१८मध्ये नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. 
  • राजीनामा दिलेल्या या सदस्यांनी यापुर्वी मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्याविरोधात बंड केले होते.
  • या पाच आमदारांमध्ये चार आमदार संगमा यांच्या कॅबिनेटमध्ये होते. मात्र त्यांना संगमा यांनी मंत्रिमंडळातून वगळले होते.

आरकॉमचे रिलायन्स जिओकडून अधिग्रहण

  • अनिल अंबानी यांच्याकडील दूरसंचार मनोरे तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय मुकेश अंबानी यांनी खरेदी केला आहे.
  • यामुळे अनिल अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) ४३००० दूरसंचार मनोरे, ४जी सेवा तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या ताब्यात जाणार आहे.
  • सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या आरकॉमला यामुळे मोठा आधार मिळाला आहे.
  • सुरुवातीला इन्फोकॉम नावाने एकत्रित रिलायन्स समूहाकडे असलेला हा दूरसंचार व्यवसाय २०००मध्ये विलग झालेल्या अंबानी बंधूंपैकी अनिल अंबानी यांच्याकडे आला होता.
  • आरकॉमची २जी सेवा नोव्हेंबरअखेरपासून बंद करण्यात आली. तसेच कंपनीने तिचा डीटीएच व्यवसायही नोव्हेंबरमध्ये विकला.
  • आरकॉमवर सध्या ४४,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. पैकी २४,००० कोटी रुपये कर्ज हे देशांतर्गत तर २०,००० कोटी रुपयांचे कर्ज हे विदेशातून घेतलेले आहे.
  • थकीत कर्जापोटी चिनी बँकेनेही अंबानी यांच्या या कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली आहे.
  • भारतातील अनेक सार्वजनिक बँकाही कर्जवसुलीकरिता कंपनीविरोधात पावले टाकण्यासाठी सरसावल्या आहेत.

चालू घडामोडी : २८ डिसेंबर

तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

  • तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारे ‘मुस्लिम महिला (विवाहोत्तर हक्कांचे संरक्षण) विधेयक’ २८ डिसेंबर रोजी विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत मंजूर झाले.
  • या विधेयकामधील काही तरतुदींवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीसह इतरांनी आक्षेप घेत बदल सुचविले होते.
  • मात्र, हे बदल सदस्यांनी मतदानाद्वारे पूर्णपणे नाकारले. त्यामुळे अखेर हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
  • सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत न्यायालयाने केंद्र सरकारला यासंबंधी कायदा बनवण्यास सांगितले होते.
  • कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
  • या मंत्री गटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी पी चौधरी यांचा समावेश आहे. 
 कायद्यातील तरतुदी 
  • या विधेयकाचे औपचारिक नाव ‘मुस्लिम महिला (विवाहोत्तर हक्कांचे संरक्षण) विधेयक २०१७’ असे आहे. यामध्ये एकूण आठ कलमे आहेत.
  • मुस्लिम महिलांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण आणि त्यांचे सक्षमीकरण हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे.
  • जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण देशभरात हा कायदा लागू होणार आहे.
  • मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तोंडी, लेखी, ई-मेल अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिहेरी तलाकद्वारे दिलेला घटस्फोट बेकायदेशीर ठरणार आहे.
  • तिहेरी तलाक देणाऱ्या संबंधीत पतीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
  • घटस्फोटित मुस्लिम महिलेला आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पाल्याला तसेच संबंधीत जोडप्याच्या अल्पवयीन मुलांच्या संरक्षण हक्कांतर्गत पतीला निर्वाह भत्ता देणे बंधनकारक असणार आहे.
  • मुस्लीम जोडप्याच्या घटस्फोटानंतर त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या संगोपणासाठी त्यांचा ताबा महिलेकडे असणार आहे.
 पार्श्वभूमी 
  • मार्च २०१६मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोने मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिले. 
  • मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधले होते.
  • त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.
 तिहेरी तलाक म्हणजे काय? 
  • तिहेरी तलाकला तलाक ए मुघलझा असेही म्हटले जाते. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. 
  • या पद्धतीमध्ये मुस्लीम पुरुष तीनवेळा ‘तलाक’ शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो अथवा घटस्फोट मिळवू शकतो.
  • वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणे अपेक्षीत आहे. मात्र बऱ्याचदा एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटले जाते. 
  • तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो. आधुनिक काळात तलाक देण्यासाठी फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचा वापर केल्याची उदाहरणे आहेत.
  • तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसऱ्या पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते.
  • तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे.
  • भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल लाँ (शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७च्या अंतर्गत येतात. 
  • काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.
 तिहेरी तलाक प्रथा हद्दपार केलेले देश 
  • पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया

भारताच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • हवाई संरक्षणासाठी भारताने अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून २८ डिसेंबर रोजी यशस्वी चाचणी केली.
  • डीआरडीओने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र ७.५ मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट मिसाईल आहे. जे रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात आले होते.
  • भारतीय सीमेच्या दिशेने डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची क्षमता या सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रामध्ये आहे.
  • यापूर्वी भारताने याच श्रेणीतील दोन क्षपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या अनुक्रमे ११ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी केल्या होत्या.
  • या क्षेपणास्त्रामुळे पृथ्वीच्या हवाई कक्षेत ३० किमी उंचीच्या आतून जाणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करत देशाच्या सीमेवर होणारा संभाव्य हल्ला रोखता येणार आहे.
  • या क्षेपणास्त्रात स्वत:ची रडार यंत्रणा आहे. मानवी आदेशांशिवाय हे क्षेपणास्त्र स्वत:च शत्रू क्षेपणास्त्राची दिशा, मार्ग ओळखून ते नष्ट करते.
  • विशेष म्हणजे, या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आले आहे.
  • जगातील मोजक्या देशांकडे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान असून त्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

चालू घडामोडी : २७ डिसेंबर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ‘मोक्का’तून मुक्त

  • २००८मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह ७ आरोपींवरील कठोर अशा ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केले. 
  • त्यांच्यावर दहशतवादी कृत्ये करणे, कट रचणे आणि हत्या या आरोपांसाठी बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या कलम १६ व १८ तसेच भारतीय दंड विधानच्या कलम १२० बी, ३०२, ३०७ व ३२६ या अन्वये खटला चालविला जाईल.
  • या खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी एकूण १० आरोपींनी अर्ज केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यास विरोध केला होता.
  • दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने शिवनारायण कलसांग्रा, श्याम साहू व प्रवीण टक्कलकी या तीन आरोपींना पूर्णपणे दोषमुक्त केले.
  • २९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
  • रमझानच्या अजाननंतर मशिदीबाहेर पडलेल्या ७ जणांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.
  • दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा तपास करत हिंदूत्ववादी संघटनांनी हा स्फोट घडवल्याचा गौप्यस्फोट केला होता.
  • साध्वी आणि पुरोहित यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात एटीएसने आरोपपत्र दाखल केले होते. सध्या साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

विजय रूपाणी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री

  • गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुजरातचे राज्यपाल ओ पी कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
  • यावेळी नवनिर्वाचित सरकारचे उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल आणि मंत्रिमंडळातील १९ सदस्यांनीही शपथ घेतली.
  • भाजपने ६ पाटीदार, ६ ओबीसी, २ राजपूत, ३ आदिवासी, १ दलित आणि एका ब्राह्मण आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.
  • भाजपने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले होते. तर कॉंग्रेसने ८० जागांवर विजय मिळवला होता.

महंमद अल जाँदला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार

  • सीरियाच्या १६ वर्षीय महंमद अल जाँद याला ‘किड्स राइट्स फाऊंडेशन’चा ‘आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार’ मिळाला आहे.
  • सीरियन शरणार्थी मुलांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याला नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सिरियातील यादवी संघर्षामुळे निर्वासित झालेल्या महंमद अल जाँदने आपल्या कुटुंबासह लेबनॉनमधील शरणार्थी छावणीत २०१४मध्ये एक शाळा सुरु केली.
  • शंभर विद्यार्थी व चार शिक्षकांसह सुरु झालेल्या या शाळेत आज २०० मुले शिक्षण घेत आहेत.
  • जगात सध्या २.८ कोटी मुले विस्थापित आहेत. त्यातील २५ लाख सीरियातील आहेत, त्यांना शिक्षणाची कोणतीही संधी नाही.
  • या अंधारातून चालताना त्यांना महंमदने हात दिला, त्यामुळे प्रकाशाचा कवडसा त्यांच्यावरही पडला व त्यांच्याही आयुष्यात आशेची नवी पालवी फुटते आहे.

चालू घडामोडी : २६ डिसेंबर

यूजीसीच्या अध्यक्षपदी प्रा. धीरेन्द्रपाल सिंह

  • एप्रिल २०१७ पासून रिक्त असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी प्रा. धीरेन्द्रपाल सिंह नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देशभरातील विद्यापीठांचे नियमन करणाऱ्या या संस्थेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे एप्रिल २०१७ पासून रिक्त आहेत.
  • उत्तर प्रदेशातील शेतकरी कुटुंबात १९५६साली जन्मलेल्या धीरेन्द्रपाल यांनी गढवाल विद्यापीठातूनच पीएचडी मिळवली आहे. त्यानंतर देशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
  • सध्या ते राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’च्या संचालक पदावर कार्यरत आहेत. जुलै २०१५मध्ये या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.
  • त्यांचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव साडेतीन दशकांहून अधिक असून २००४पासून त्यांनी विविध कुलगुरूपदे सांभाळली आहेत.
  • व्यवसायशिक्षण, पर्यावरणशास्त्र यांसोबतच मूल्यशिक्षणाच्या क्षेत्रात प्रा. सिंह यांनी विविध प्रशासकीय पदे सांभाळताना काम केले आहे.
  • देशातील अनेक संस्थांच्या विद्यापरिषदांवर किंवा कार्यकारी मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
  • त्यात बनारस, सागर व इंदूरच्या विद्यापीठांखेरीज अलाहाबाद विद्यापीठ, मिझोरम विद्यापीठ, पंजाबातील केंद्रीय विद्यापीठ, यांचा समावेश आहे.
  • बेंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे ते सन्माननीय सदस्य असून ‘सोसायटी ऑफ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च’ या कोलकाता आणि भोपाळ येथील संस्थांचेही सदस्य आहेत.

स्वयंसेवी संस्थाना मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडण्याचे निर्देश

  • परदेशातून निधी मिळत असलेल्या स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक आस्थापने व व्यक्ती यांना मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.
  • परदेशातून निधी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता यावी, या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • बँकेत खाते उघडण्यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींना २१ जानेवारी २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • या मुदतीतच संबंधितांना त्यांच्या बँक खात्याची सगळी माहिती विहित नमुन्यात गृह मंत्रालयास सादर करावी लागणार आहे.
  • याशिवाय परदेशातून मिळालेला निधी देशहितास बाधा आणणाऱ्या कामासाठी वापरला जाणार नाही याची हमी या संस्थांना द्यावी लागणार आहे.
  • मान्यताप्राप्त बँकांमध्ये केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ३२ बँकांचा समावेश असून, त्यात एक परदेशी बँकही आहे.
  • या बँका सरकारच्या सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन यंत्रणेशी (पीएफएमएस) संलग्न असतील, त्यामुळे संबंधितांनी नियमांचे अनुपालन केले की नाही हे सरकारला समजणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने स्वयंसेवी संस्थांसाठीचे नियम कडक केले असून परदेशी निधी नियमन कायद्याच्या विविध तरतुदींचा भंग केल्याबद्दल अनेक संस्थांवर कारवाई केली आहे.

ट्युनेशियामध्ये एमिरेट्स एअरलाइन्सवर बंदी

  • ट्युनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाने एमिरेट्स एअरलाइन्स कंपनीच्या सर्व विमानांना देशात उतरण्यास आणि उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.
  • दुबईला निघालेल्या एमिरेट्सच्या विमानात दोन ट्युनेशियन महिलांना चढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ट्युनेशियन महिलांना विमानात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे विचित्र कारण एमिरेट्सकडून त्या महिलांना देण्यात आले.
  • वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानांना ट्युनेशियामध्ये बंदी घालण्यात आली आहे.
  • जोपर्यंत कंपनी जागतिक नियम आणि करारांप्रमाणे काम करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

चालू घडामोडी : २४ व २५ डिसेंबर

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना अटक

  • देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी जाहीर केले.
  • लालूप्रसाद व अन्य १५ जणांना अटक झाली असून, सबळ पुराव्याअभावी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य ६ जणांना मात्र आरोपमुक्त केले आहे.
  • १९९०नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला असून, शिक्षेचा निकाल ३ जानेवारी रोजी दिला जाणार आहे.
  • पाटणा उच्च न्यायालयाने १९९६मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. सुमारे २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
  • चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता.
  • माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना मात्र न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. आधी काँग्रेसमध्ये असलेले मिश्रा हे राष्ट्रवादी काँग्रेसमार्गे सध्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात दाखल आहेत.
  • याआधी २०१३मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने चाराघोटाळ्यात त्यांना दोषी जाहीर केले होते आणि ४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. 
  • लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी ३ प्रकरणे दाखल आहेत. त्यात दुमका कोषागारातून ३.९७ कोटी रुपयांचा, छैबासा कोषागारातून ३६ कोटी रुपयांचा आणि दोरांदा कोषागारातून १८४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
 पार्श्वभूमी 
  • शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा पुरवला जावा या उद्देशाने सरकारतर्फे मदत योजना राबवली जाते. बिहारच्या स्थापनेपासून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
  • सरकारी अधिकारी जनावरांची संख्या निश्चित करुन त्याप्रमाणे चारा खरेदीसाठी अनुदान द्यायचे. या अनुदानाचा हिशेब नंतरच्या महिन्यात देणे अपेक्षित असते. परंतू या प्रकरणात कोणताही हिशोब दिला गेला नाही.
  • देशाचे तत्कालीन महालेखापाल टी एन चतुर्वेदी यांना १९८५साली पहिल्यांदा या प्रकरणात काही काळेबेरे असल्याचा संशय आला. बिहार सरकार या खर्चाचे हिशेबच देत नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारला खडसावले होते.
  • १९९२ साली बिहार सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिंदुभूषण त्रिवेदी या पोलीस अधिकाऱ्याने या घोटाळ्याची चौकशी देखील केली.
  • बिहारच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी अहवाल देखील दिला. मात्र, त्रिवेदी यांची तडकाफडकी बदली आणि हे प्रकरण थंड पडले.
  • १९९६मध्ये पश्चिम सिंगभूम जिह्याचे उपायुक्त अमित खरे यांनी या प्रकरणी धाडी घालण्यास सुरुवात केली आणि चारा घोटाळ्याचे घबाडच त्यांच्या हाती लागले.
  • चारा घोटाळ्यात अनेक संस्थांना अनुदान देण्यात आले. या संस्था प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या, अशी माहिती समोर आली.
  • चारा घोटाळा उघड करण्यात अमित खरे यांची महत्त्वाची भूमिका होती. मूळचे बिहारचे असेलेले खरे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.
  • या घोटाळ्याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी २ खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य ४ खटल्यांचे कामकाज सुरू आहे.
  • चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
  • २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली.

जयराम ठाकूर हिमाचलचे १३वे मुख्यमंत्री

  • सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते हिमाचलचे १३ वे मुख्यमंत्री असतील.
  • हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला २१ जागांवरच समाधान मानावे लागले.
  • भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला.
  • यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले ठाकूर हे सेरज विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. २००७ ते २००९ या कालावधीत ते भाजपचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष होते.
  • त्यांनी १९९८साली विधानसभेत प्रथमच प्रवेश केला, त्यानंतर ते सतत विजयी होत गेले. धुमल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती.

अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी

  • पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली.
  • अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात करत, महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा पटकावली.

टेमबिन वादळाचा दक्षिण फिलिपीन्सला तडाखा

  • टेमबिन या उष्णकटिबंधीय वादळाचा दक्षिण फिलिपीन्सला तडाखा बसला असून, या वादळामुळे आतापर्यंत १३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.
  • मिंदानो या फिलिपीन्समधील दुसऱ्या मोठय़ा बेटाला या वादळाने तडाखा दिला, त्यामुळे तेथे पूर आले व अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यात अनेक खेडी नष्ट झाली.
  • फिलिपीन्सला दरवर्षी किमान वीस मोठय़ा वादळांचा तडाखा बसत असतो. त्यातील बहुतांश प्राणघातक असतात.

चालू घडामोडी : २२ व २३ डिसेंबर

गुजरात मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी

  • गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. तर नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. 
  • यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. 
  • भाजपा गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा बऱ्यापैकी घटल्या आहेत.
  • १८२ जागांच्या विधानसभेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपाला फक्त ९९ जागांवर समाधान मानावे लागले. २०१२मध्ये भाजपाने गुजरातमध्ये ११५ जागा जिंकल्या होत्या.
  • यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली असून, २०१२मध्ये ६१ जागा जिंकणारी काँग्रेस ७७ जागांपर्यंत पोहोचली. 

बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी साबा करीम

  • भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि माजी निवड समिती सदस्य साबा करीम यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. १ जानेवारी २०१८ पासून ते आपला कार्यभार सांभाळतील.
  • सप्टेंबरमध्ये ‘दुटप्पी भूमिके’च्या मुद्यावरून एम व्ही श्रीधर यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. श्रीधर यांचे ३० ऑक्टोबरला निधन झाले.
  • करीम यांना स्थानिक क्रिकेट आणि त्यातील गुंतागुंत आदींची इत्थंभूत माहिती आहे. एक कसोटी आणि ३४ वन-डेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 
  • १८ वर्षांच्या करिअरमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज या नात्याने १२० प्रथमश्रेणी, १२४ लिस्ट ए सामने खेळले आहेत.

वैज्ञानिक डॉ. कॅलेस्टस जुमा यांचे निधन

  • शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उत्कृष्टरीत्या वापर केल्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले केनियाचे वैज्ञानिक डॉ. कॅलेस्टस जुमा यांचे १५ डिसेंबर रोजी निधन झाले.
  • डॉ. जुमा हे हार्वर्ड केनेडी स्कूल येथे विज्ञान, तंत्रज्ञान व जागतिकीकरण प्रकल्पाचे संचालक होते.
  • तसेच बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे अर्थसहाय्यित आफ्रिकेतील कृषी इनोव्हेशन प्रकल्पाचेही ते संचालक होते.
  • आंतरराष्ट्रीय विकास पद्धती या विषयाचे प्राध्यापक व व्यापक विषयांवर लेखन करणारे विद्वान असा त्यांचा लौकिक होता.
  • ब्रिटनच्या ससेक्स विद्यापीठातून त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान धोरण या विषयात पीएचडी केली होती.
  • संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता जाहीरनाम्याचे ते कार्यकारी सचिव होते. तंत्रज्ञानाचा वापर गरिबांचे जीवन बदलण्यासाठी झाला पाहिजे असे त्यांना वाटत होते.
  • त्यांनी नैरोबीत ‘आफ्रिकन सेंटर फॉर टेक्नॉलॉजी स्टडीज’ ही संस्था स्थापन केली. शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, असा या संस्थेचा हेतू आहे.
  • तंत्रज्ञान अभिनवता, जेनेटिक पेटंटिंग, हरित क्रांतीचा आफ्रिकेवरचा परिणाम यावर त्यांनी मोठे काम केले होते.
  • २०१६मध्ये त्यांनी लिहिलेले ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इट्स एनेमीज’ हे पुस्तक गाजले. त्यात कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला नाके मुरडण्याच्या सामाजिक प्रवृत्तींवर टीका केली होती.
  • ‘द नेशन’ या मायदेशातील वृत्तपत्रांत त्यांनी सुरुवातीला विज्ञान तंत्रज्ञान प्रतिनिधी म्हणून काम केले होते. इन लॅण्ड वुइ ट्रस्ट, दी न्यू हार्वेस्ट, दी जीन हंटर्स ही त्यांची पुस्तके गाजली.
  • न्यू आफ्रिकन मॅगझिनने २०१२, २०१३ आणि २०१४ साली त्यांचा समावेश १०० सर्वाधिक प्रभावशाली आफ्रिकन्सच्या यादीत केला होता.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलेब्रिटींमध्ये सलमान खान पहिल्या स्थानी

  • फोर्ब्स मॅगझीनने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय सेलेब्रिटींच्या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे.
  • सलमान खानची वार्षिक कमाई २३२ कोटी आहे. शाहरुख खान १७० कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.
  • धुवॉंधार बॅटींगने धावांचा विक्रमी पाऊस पाडणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (वार्षिक कमाई १०० कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (९८ कोटी), पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (८२ कोटी), आमीर खान (६८ कोटी) सहाव्या स्थानी आहे.
  • तर प्रियांका चोप्रा (६८ कोटी) सातव्या, महेंद्रसिंह धोनी (६३ कोटी) आठव्या, हृतिक रोशन (६३ कोटी) नवव्या आणि अभिनेता रणवीर सिंह (६२ कोटी) दहाव्या स्थानी आहे.

चालू घडामोडी : २१ डिसेंबर

२-जी घोटाळ्यातील सर्व आरोपी दोषमुक्त

  • सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २-जी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमकेच्या राज्यसभेतील खासदार कनिमोळी यांच्यासह १७ आरोपींना दोषमुक्त केले.
  • आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने सर्व १७ आरोपींना दोषमुक्त केले.
 २-जी स्पेक्ट्रम घोटाळा 
  • २००१नंतर देशभरात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत होती. मोबाईल ऑपरेटर कंपन्यांवर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचे (ध्वनीलहरी) निर्बंध घातलेले असतात.
  • ग्राहकांची वाढती संख्या पाहून सरकारने नवीन ध्वनीलहरी खुल्या करण्याचा निर्णय घेतला. या ध्वनीलहरींना ‘२-जी स्पेक्ट्रम’ म्हणून ओळखले जाते.
  • टू जी स्पेक्ट्रमचा लिलाव करणे अपेक्षित असताना तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांनी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ याआधारे स्पेक्ट्रमचे वाटप केले.
  • स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या ७ जानेवारी २००८च्या प्रसिद्धी अधिसूचनेत ए. राजा यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता.
  • विशेष म्हणजे २००८मध्ये स्पेक्ट्रम वाटप झाले असले तरी २००१मधील दरानुसार हे वाटप करण्यात आले. तसेच स्पेक्ट्रम वाटप करताना ते काही काळासाठी इतरांना विकता येणार नाही, अशी अटही नव्हती.
  • त्यामुळे सुरुवातीला कंपन्यांनी कमी दरात स्पेक्ट्रम मिळवले आणि नंतर चढ्या दराने बाजारात विकून फायदा मिळविल्याचा दावा केला जात होता.
  • बोली लावून स्पेक्ट्रमचा लिलाव झाला असता तर सरकारला आणखी १.७६ लाख कोटी रुपये मिळाले असते, असे तत्कालीन महालेखापाल (कॅग) विनोद राय रांनी आपल्या अहवालात म्हटले होते. या अहवालामुळे देशभरात खळबळ उडाली होती.
  • काँग्रेसप्रणित ‘यूपीए २’च्या कार्यकाळात हा घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता. 
  • या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ मार्च २०११ रोजी एका विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाची स्थापना केली होती. 
  • या विशेष न्यायालयाने या प्रकरणात ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित करत, त्यांना अटक केली होती. ए राजा जवळपास १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी तुरुंगात होते.
  • गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.

कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

  • प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या काव्य संग्रहाला २०१७चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
  • ‘बोलावे ते आम्ही..’ हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिढीतील नवा कवितासंग्रह आहे. कृषीजन व्यवस्थेला वेढून टाकणारी, आक्रमित आणि संस्कारित करणारी बाहय व्यवस्था या काव्य संग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे.
  • ६८ कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणारा आहे. या संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
  • त्याचबरोबर सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • ५० हजार रुपये रोख, ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘माय नेम इज गौहर जान’ या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला आहे.
  • दिल्लीतील रवींद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  • एकूण २४ भाषांमध्ये ७ कादंबऱ्या, ५ काव्यसंग्रह, ५ लघू कथा, ५ समिक्षात्मक पुस्तके तर १ नाटक आणि १ निबंध या पुस्तकांची यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

बाजरीच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंगसाठी बंगळुरूत परिषद

  • सोयाबिन आणि तूरडाळीसारख्या आधुनिक पिकांच्या शर्यतीत पारंपरिक बाजरी पौष्टिक असतानाही दुर्लक्षित असून, तिचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी पुढील महिन्यात बंगळुरूत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.
  • कर्नाटक सरकारने सेंद्रीय शेती व त्या माध्यमातून देशी आणि पारंपरिक पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
  • १९६०च्या हरित क्रांतीनंतर आपली पारंपरिक धान्ये विस्मृतीत गेली. मात्र अशा धान्यांमध्ये अधिक पोषणमूल्ये आहेत. बाजरी त्यापैकीच एक पीक आहे.
  • शरीरातील लोह, बी जीवनसत्व, अमिनो ॲसिड, मधुमेह, लठ्ठपणा आदी संतुलित करण्याची क्षमता बाजरीत आहे.
  • तांदळापेक्षा ७० टक्के कमी पाणी लागत असल्याने हे पीक दुष्काळातही तग धरून राहू शकते. देशात ३ कोटी एकरावर हे पीक घेतले जाते.
  • पण मागणीअभावी ते दुर्लक्षित आहे. यासाठीच बंगळुरूत ही व्यापार परिषद घेतली जात आहे.
  • संयुक्त राष्ट्रांकडून २०१८ हे ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’ म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ इंडियावर आरबीआयकडून निर्बंध

  • वाढता एनपीए आणि कमी होणारी भांडवल तरलता यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत.
  • त्यामुळे बँकेला आता नव्याने कर्जे देता येणार नाहीत, तसेच शेअरधारकांना लाभांशाचे वाटपही करता येणार नाही.
  • मार्च २०१७अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात जोखमेवर आधारित केलेल्या तपासणीअंती रिझर्व्ह बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
  • मार्च २०१७पर्यंत बँक ऑफ इंडियाच्या एनपीएचे प्रमाण १३.२२ टक्क्यावर पोहोचले आहे. सप्टेंबर २०१६मध्ये हेच प्रमाण १२.६२ टक्के होते. तर एकूण थकीत कर्जांची रक्कम ४९,३०७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
  • रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमुळे बँक ऑफ इंडियाच्या जोखमीचे व्यवस्थापन, संपत्तीची गुणवत्ता, नफा आणि कार्यक्षमतेत सुधारणा होण्यीस मदत होणार आहे.
  • यापूर्वी रिझर्व्ह बँकेने याच कारणांवरून आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक अशा प्रकारच्या निर्देशांना ‘करेक्टीव्ह प्रॉम्प्ट अ‍ॅक्शन’ संबोधते.
  • रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडियाबरोबरच युनायटेड बँक ऑफ इंडियावरही निर्बंध घातले आहेत. एनपीएचे प्रमाण वाढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २० डिसेंबर

डॉ. जी. सतीश रेड्डी यांना नॅशनल डिझाइन पुरस्कार

  • संरक्षण क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक डॉ. जी. सतीश रेड्डी यांना क्षेपणास्त्र रचना व विकासकामासाठी नॅशनल डिझाइन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • क्षेपणास्त्रांच्या दिशादर्शन यंत्रणांच्या संशोधनात त्यांचे नाव आघाडीवर आहे. दिशादर्शित शस्त्रास्त्र प्रणाली स्वदेशी पातळीवर विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
  • सध्या ते संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व क्षेपणास्त्र-सामरिक प्रणाली कार्यक्रमाचे महासंचालक आहेत.
  • त्यांच्या कार्यावर त्यांचे गुरु आणि दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा ठसा आहे. कलाम यांच्यानंतर ‘ज्युनियर मिसाइल मॅन’ असा रेड्डी यांचा लौकिक आहे.
  • अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, राष्ट्रीय धोरणनिश्चिती, विविध क्षेपणास्त्र प्रणाली या क्षेत्रांत त्यांनी पायाभूत काम केले आहे.
  • आता त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तो नॅशनल डिझाइन रीसर्च फोरम या संस्थेचा असून तो इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स या संस्थेकडून दिला जातो.
  • त्यांना यापूर्वी होमी भाभा स्मृती पुरस्कार, डीआरडीओ अग्नी पुरस्कार, तरुण वैज्ञानिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • रेड्डी यांनी डॉ. कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे प्रमुख म्हणून निर्णायक भूमिका पार पाडली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला स्वयंपूर्णता प्राप्त करून देण्यात त्यांनी मोठे काम केले आहे.
  • लंडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ नेव्हिगेशन या संस्थेचे ते पहिले भारतीय फेलो आहेत. रॉयल एरॉनॉटिकल सोसायटीचे ते सदस्य आहेत.

स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिला

  • संयुक्त राष्ट्रांच्या २०१७च्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर अहवालानुसार, परदेशातील स्थलांतरितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
  • या अहवालानुसार, एकूण १.७ कोटी भारतीय लोक परदेशात वास्तव्य करीत असून, त्यातील पन्नास लाख लोकांचे सध्याचे वास्तव्य आखातात आहे.
  • भारताखालोखाल मेक्सिकोचे १.३ कोटी, रशियाचे १.१ कोटी, चीनचे १ कोटी, बांगलादेशचे ०.७ कोटी, सीरियाचे ०.७ कोटी, पाकिस्तान व युक्रेनचे प्रत्येकी ०.६ कोटी लोक परदेशात स्थलांतरित म्हणून वास्तव्यास आहेत.
  • भारताचे ३० लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत तर प्रत्येकी ०.२ कोटी नागरिक अमेरिका व सौदी अरेबियात आहेत.
  • सध्या जगात २.५८ कोटी लोक त्यांचा जन्मदेश सोडून परदेशात राहात आहेत. त्यांचे प्रमाण इ.स. २००० पासून ४९ टक्के वाढले आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा चिंतेचा विषय असून, २०३०च्या शाश्वत विकास कार्यक्रमात त्याचा समावेश आहे.

२०२२च्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद बर्मिंगहॅमला

  • २०२२साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद भूषवण्याचा मान बर्मिंगहॅम शहराला देण्यात आला आहे.
  • बर्मिंगहॅम आणि डर्बन या शहरांनी यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. नंतर आर्थिक अडचणींचे कारण देत डर्बन शहराने यजमानपद भूषवण्यात नकार दिला.
  • यामुळे राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाने २०२२साली होणाऱ्या स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क बर्मिंगहॅमला दिले आहेत.
  • या स्पर्धेसाठीचा अंदाजे ७५ टक्के खर्च हा बर्मिंगहॅम स्थानिक प्रशासनाला करावा लागणार असून उर्वरित २५ टक्के खर्च हा राष्ट्रकुल समिती करणार आहे.
  • याआधी २०१४साली ग्लास्गो आणि त्याआधी २००२साली मँचेस्टर शहराने राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाचा मान भूषवला होता. २०१८साली ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहेत.

चालू घडामोडी : १९ डिसेंबर

ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांना केंद्र सरकारची मदत

  • ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपला केंद्र सरकारने ३२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • याबरोबरच चक्रीवादळामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १४०० घरे बांधून देण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओखी चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या राज्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पीडित शेतकरी आणि बेपत्ता मासेमारांच्या कुटुंबीयांशी देखील चर्चा केली.

जेष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे निधन

  • बडोद्याच्या आधुनिक शिल्पकलेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे १६ डिसेंबर रोजी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले.
  • बडोद्यानजीकच्या जुनी जथराटी या खेडय़ात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी १९५६ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागात आले.
  • बडोदे महापालिकेची खूण असलेल्या ‘दोन वटवृक्षां’चे आधुनिकतावादी भारतीय शैलीतील शिल्प नागजीभाईंनी घडवले होते.
  • अगदी अलीकडेच बडोदे रेल्वे स्थानकाजवळ ‘कॉलम ऑफ फेथ’ हे नागजी पटेलकृत स्तंभशिल्प उभारण्यात आले आहे.
  • ‘नजर आर्ट गॅलरी’ हे फतेहगंज भागातील कलादालन उभारले जाण्यामागेही त्यांचीच प्रेरणा होती.
  • १९६१साली विद्यार्थी म्हणून त्यांना राष्ट्रीय कलापुरस्कार मिळाला. युगोस्लाव्हिया, जपान, ब्राझील अशा अनेक देशांत जाऊन, तिथल्या दगडांमध्ये नागजीभाईंनी शिल्पे घडवली.
  • सँडस्टोनला शिल्परूप देताना या दगडातील खडबडीतपणा आणि संस्कारांनी त्याला येणारा लोभस गुळगुळीतपणा या दोहोंचा वापर ते करीत.
  • मध्य प्रदेशच्या ‘कालिदास सम्मान’सह अनेक मानसन्मान नागजी यांना मिळाले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने त्यांना सुप्रतिष्ठ (तहहयात) फेलोशिपही दिली होती.

भारताला कच्चे तेल पुरवण्यात इराक आघाडीवर

  • गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरवण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे.
  • गेल्या तीन वर्षांमध्ये भारत आणि इराक या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
  • एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या काळामध्ये इराककडून भारताने २५.८ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली आहे.
  • भारताला कच्चे तेल पुरवण्यात आजवर आघाडीवर असलेला सौदी अरेबिया या काळामध्ये २१.९ दशलक्ष टन इंधन पुरवू शकला तर इराणने १२.५ दशलक्ष टन कच्चे तेल भारताला पुरविले.
  • इराकने गेल्या काही वर्षांमध्ये कमी दरामध्ये भारताला कच्चे तेल पुरवले आहे, त्याचाच परिणाम म्हणून भारताने मोठ्या प्रमाणात इराककडून इंधन आयात केली आहे.
  • केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

चालू घडामोडी : १८ डिसेंबर

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक

  • १८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी स्पष्ट बहुमत राखण्यात यश मिळाले आहे.
  • याशिवाय, या विजयामुळे देशातील भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९वर गेली आहे. तर काँग्रेस पक्ष फक्त चार राज्यांपुरता मर्यादित राहिला आहे.
  • अरुणाचल प्रदेश, असाम, छत्तीसगड, गोवा, हरयाणा, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजप स्वबळावर सत्तेत आहे.
  • तर बिहार, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम आणि नागालँडमध्ये भाजप मित्रपक्षांबरोबर सत्तेत आहे.
  • दुसरीकडे काँग्रेसच्या ताब्यात केवळ कर्नाटक, पंजाब, मिझोराम आणि मेघालय ही ती चार राज्ये असून, त्यातही कर्नाटक आणि पंजाब ही दोनच मोठी राज्ये काँग्रेसच्या हातात आहेत.
गुजरात
  • गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती.
  • १८२ जागांसाठी गुजरातमध्ये सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले होते. सरकार स्थापनेसाठी येथे ९२ एवढे संख्याबळ आवश्यक होते.
  • काँग्रेसने दिलेल्या कडव्या लढतीमुळे गुजरातेत सत्ता राखताना भाजपची चांगलीच दमछाक झाली असून, त्यांचे संख्याबळ ११५वरून ९९पर्यंत घसरले.
  • तर कॉंग्रेसने ६१वरून ७७ जागांपर्यंत मजल मारल्याने मागील सलग २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला कसेबसे गुजरात राखण्यात यश आले.
  • यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाऊ शकते हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
  • उना दलित अत्याचारानंतर दलितांचा आवाज बनलेले जिग्नेश मेवाणी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम मतदार संघात भाजपचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांचा पराभव केला.
हिमाचल प्रदेश
  • गुजरातच्या तुलनेत कमी जागा आणि ग्लॅमर असल्यामुळे हिमाचल प्रदेशची निवडणूक काहीशी झाकोळली गेली होती.
  • हिमाचल प्रदेशात मतदार दर पाच वर्षांनी सरकार बदलतात असा गेल्या दोन-अडीच दशकांचा अनुभव आहे. तो पॅटर्न त्यावेळीदेखील कायम राखला आहे.
  • ६८ जागा असलेल्या हिमाचल विधानसभेत सरकार स्थापनेसाठी ३५ जागांची गरज होती. ६८ पैकी ४४ जागा जिंकत स्पष्ट भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले.
  • गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकता आल्या, तर  मार्क्सवादी पक्षाने १ व अपक्षांनी २ जागा जिंकल्या. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.
  • या निकालामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपला आलटून पालटून सत्ता देण्याचा 
  • या निवडणुकीत काँग्रेसविरोधातील अँटी-इन्कम्बसी फॅक्टर, विकासाचा मुद्दा घेऊन भाजपने केलेला प्रचार, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, स्थानिक नेत्यांमधील बेबनाव हे घटक महत्त्वपूर्ण ठरले.
  • या निवडणुकीतील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा काँग्रेसचे राजिंदर राणा यांच्याकडून ३,५०० मतांनी पराभव झाला.
  • प्रेमकुमार धुमल हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. २००७-१२ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
  • काँग्रेसने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या नावावरच निवडणूक लढवली. ८३ वर्षीय वीरभद्र यांनी ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले.
  • राज्याचे सहा वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलेले वीरभद्र सिंह आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे दोघे विजयी झाले आहे.
  • वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असून, त्याची चौकशीही विविध गुप्तचर यंत्रणांकडून सुरू आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा: सुशील कुमार आणि साक्षी मलिकला सुवर्णपदक

  • भारताचे कुस्तीपटू सुशील कुमार आणि साक्षी मलिक यांनी जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल रेसलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली आहेत.
  • सुशील कुमारने ७४ किलो वजनी गटात अंतिम लढतीत न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरवर मात करत सुवर्णपदक जिंकले.
  • याआधी २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर सुशीलचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले.
  • रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाइलमधील ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने न्यूझीलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव केला.
  • या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण १० वजनी गटात नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.

चालू घडामोडी : १७ डिसेंबर

सिंधूला वर्ल्ड सुपर सीरिजचे उपविजेतेपद

  • भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला दुबई वर्ल्ड सुपर सीरिजच्या उपविजेतेपदावर (रौप्यपदक) समाधान मानावे लागले.
  • अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १५-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव करत दुबई वर्ल्ड सुपर सीरीजचे जेतेपद पटकावले.
  • या स्पर्धेच्या गट लढतीत सिंधूने यामागुचीवर सरळ गेममध्ये मात केली होती. त्यामुळे फायनलमध्येही सिंधू वरचढ ठरेल असा अंदाज होता.
  • ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सिंधूने यापूर्वी इंडिया ओपन सुपर सीरिज आणि कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर नाव कोरले होते.
  • वर्ल्ड सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत जगातील अव्वल आठ बॅडमिंटनपटू भाग घेतात. ही स्पर्धा जिंकण्यात सिंधूला यश आले असते, तर ही मानाची व आव्हानात्मक स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली असती.
  • सायना नेहवालने २०११मध्ये तर ज्वाला गुट्टा-व्ही डिजू या जोडीने २००९मध्ये या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती; पण त्यांनाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

एअरटेलचा ई-केवायसी परवाना रद्द

  • मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास यूआयडीएआय भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेला तात्पुरती बंदी केली आहे.
  • ‘युनिक आयडेन्टिटी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) हे भारतीय नागरिकांना ‘आधार’ कार्ड जारी करणारे प्राधिकरण आहे. 
  • एअरटेलच्या मोबाइल फोनधारकाने त्याचे सिमकार्ड ‘आधार’शी जोडून घेतले की त्याच डेटाचा वापर करून एअरटेल बँकेत त्याचे खाते नको असताना उघडले जाते.
  • तसेच त्या ग्राहकास मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदानही परस्पर त्या खात्यात वळते होते, अशा असंख्य तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने हा अंतरिम मनाई आदेश जारी केला आहे.
  • सिमकार्डांची ‘आधार’शी जोडणी सक्तीची केल्यापासून त्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल कोणाही मोबाइल फोन कंपनीविरुद्ध असा आदेश काढला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • आत्तापर्यंत सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी केलेल्या एअरटेलच्या सुमारे २३ लाख ग्राहकांची खाती एअरटेल बँकेत उघडली गेली असून त्यात गॅसच्या अनुदानाचे सुमारे ४७ कोटी रुपये परस्पर जमा झाले आहेत.
  • या अंतरिम आदेशाने प्राधिकरणाने भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांचे ई-केवायसी परवाने तूर्तास निलंबित केले आहेत.
  • परिणामी हा आदेश लागू असेपर्यंत एअरटेल त्यांच्या ग्राहकांच्या सिमकार्डाच्या ‘ई व्हेरिफिकेशन’साठी ‘आधार’ कार्डाचा आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेचा वापर करू शकणार नाही.
  • तसेच सिम व्हेरिफिकेशनसाठी प्राप्त झालेल्या ‘आधार’च्या माहितीचा उपयोग करून एअरटेल पेमेंट बँक त्या ग्राहकाचे त्याच्या संमतीविना खातेही उघडू शकणार नाही.

कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना शिक्षा

  • कोळसा घोटाळ्यात दोषी ठरलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
  • त्यांच्याशिवाय माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह आणखी चौघांनाही यात दोषी ठरवले होते.
  • संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळ्यात अनियमित पद्धतीने खाण वाटप करण्याचा आरोप सिद्ध झाल्याने कोडा यांच्यासह इतर आरोपींना कट रचणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते.
  • २००६ मध्ये कोडा यांनी झारखंडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मुख्यमंत्री होईपर्यंत ते अपक्ष आमदार होते.
  • त्यांनी ऑल झारखंड स्टुडंट युनियनपासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही क्रियाशील होते.
  • बाबुलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रीपदाची सूत्रे स्विकारली होती.
  • २००५च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते.
  • या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहूमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन दिले होते.
  • सप्टेंबर २००६मध्ये मधू कोडा यांच्यासहित अन्य ३ अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे अल्पमतात आलेले भाजपा सरकार पडले. यानंतर युपीएने त्यांना मुख्यमंत्रीपद देत आपले सरकार स्थापन केले होते. 
  • याआधी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची योग्य माहिती न दिल्याने मधू कोडा यांच्यावर तीन वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.

चालू घडामोडी : १६ डिसेंबर

ममता कालिया यांना व्यास सम्मान

  • आधुनिक हिंदी साहित्यातील प्रख्यात कथालेखिका ममता कालिया यांना त्यांच्या ‘दुक्खम-सुक्खम’ या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला आहे.
  • ममता कालिया यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४० रोजी मथुरा येथे झाला. त्यांचे वडील विद्याभूषण अग्रवाल हे हिंदी साहित्यातील एक विद्वान मानले जातात.
  • दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ममताजींनी एम.ए. केले. नंतर मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले.
  • सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांनी इंग्रजीतून लिखाण केले. नंतर मात्र हिंदी लेखनावरच भर दिला.
  • कथा, कविता, कादंबरी, नाटय़, अनुवाद, पत्रकारिता अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली.
  • बदलत्या परिस्थितीत बदललेली महिलांची मानसिकता व त्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या धाटणीच्या कथा त्यांनी लिहिल्या.
  • बेघर, मेला, मुखौटा, बोलने वाली औरत, रोशनी की मार, प्रेम कहानी, दौडक, दुक्खम-सुक्खम या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या.
  • यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेश हिंदी साहित्य संस्थेचा यशपाल कथा सम्मान तसेच साहित्य भूषण सम्मान, राम मनोहर लोहिया पुरस्कार मिळाला आहे.
व्यास सन्मान
  • हिंदी साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तीला व्यास सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
  • के.के. बिर्ला फाऊंडेशनने १९९१मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. सन्मानचिन्ह आणि ३.५० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

केंद्र सरकारकडून एमडीआरमध्ये सवलत

  • डेबिट कार्ड, भिम तसेच यूपीआय अ‍ॅपद्वारे होणारे २००० रुपयापर्यंतच्या विनिमय व्यवहारांवर व्यापारी सवलत दर अर्थात मर्चन्ट डिस्काउन्ट रेट (एमडीआर) न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • या निर्णयाचा लाभ ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना होणार असून बँकांना होणारे २५१२ कोटी रुपयांचे नुकसान सरकार भरून देणार आहे.
  • १ जानेवारी २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी करण्यात येणार आहे.
  • निश्चलनीकरणानंतर थंड पडलेल्या रोकडरहित व्यवहारांना नव्याने चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • ग्राहकांच्या डेबिट कार्डाद्वारे व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी बँकांकडून मशीन (पीओएस) दिल्या जातात. त्यासाठी बँकांद्वारा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दराला ‘एमडीआर’ म्हणतात.

युथक्वेक : वर्ड ऑफ दी यिअर २०१७

  • ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१७मधील ‘वर्ड ऑफ दी यिअर’ म्हणून “युथक्वेक” या शब्दाची निवड केली आहे. गेल्या वर्षी पोस्टट्रथ या शब्दाची निवड करण्यात आली होती.
  • युथक्वेक या शब्दाचा अर्थ तरुण मतदारांमध्ये निर्माण झालेली राजकीय जागरूकता असा आहे.
  • सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक बदल जर तरुणांच्या कृती किंवा प्रभावातून घडून आले, तर त्याला युथक्वेक असे म्हणतात.
  • २०१७मध्ये या शब्दाचा वापर पाचपट वाढला. साधारण या वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात वापर वाढल्याचे दिसून आले.
  • जूनमध्ये ब्रिटनमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात तरुण मतदारांनी मजूर पक्षाला विजय मिळवून दिला, तेव्हा हा शब्द जास्तच प्रचलित होता.
  • त्यानंतर न्यूझीलंडमध्ये सप्टेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातही या शब्दाचा वापर करण्यात आला.
  • गेल्या वर्षी ब्रेक्झिट व ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजयानंतर वापरला गेलेला पोस्टट्रथ या शब्दाची ऑक्सफर्डने ‘वर्ड ऑफ दी यिअर’ म्हणून निवड केली होती.

योगी सरकारची नववधुंसाठी नवी योजना

  • उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून ३ हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे.
  • तसेच या योजनेअंतर्गत लग्नासाठी पात्र तरूणींना ३५ हजार रूपये दिले जाणार आहेत. सध्या ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.
  • योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला २० हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. हे पैसे त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
  • तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असे एकूण १० हजार रुपयांचे सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल.
  • तसेच लग्नामध्ये अर्जांची मुलाकडील आणि मुलीकडील नातेवाईकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी ५ हजार रुपये खर्च केले जातील.

चालू घडामोडी : १५ डिसेंबर

स्वदेशी बनावटीच्या आयएनएस कलवरी पाणबुडीचे लोकार्पण

  • ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे १४ डिसेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत लोकार्पण करण्यात आले.
  • नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखल झाली.
  • आयएनएस कलवरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. भारताची सुरक्षा आणि स्थिरतेमध्ये कलवरी महत्वाची भूमिका पार पाडेल.
  • मोदींनी भारताच्या पाणबुडी विकास कार्यक्रमाला सागर (SAGAR - Security And Growth for All in the Region) हे विशेष नाव दिले आहे.
 कलवरीची वैशिष्ट्ये 
  • कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलासाठी फ्रान्सच्या सहकार्याने बांधली आहे.
  • स्टेल्थ बांधणी आणि नेमका लक्ष्यभेद करणारी यंत्रणा ही ‘टायगर शार्क’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कलवरीची सामर्थ्ये आहेत. 
  • पाणतीर त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाण्यातून भूपृष्ठावर तसेच पाण्यातून पाण्यात असा दुहेरी हल्ला करण्याची कलवरीची क्षमता आहे.
  • तसेच पाण्यात पाणसुरुंग पेरणे, पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करणे या क्षमतांचाही कलवरीच्या सामर्थ्यात समावेश आहे.
  • पाकिस्तान आणि चीनकडून समुद्रमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ही पाणबुडी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
  • ८ डिसेंबर १९६७ रोजी भारतीय नौदलात पहिली पाणबुडी दाखल झाली, तिचे नावही कलवरी असेच होते. ३१ मे १९९६ रोजी ती सेवेतून निवृत्त झाली होती.
  • २०२१पर्यंत अशा प्रकारच्या एकूण सहा स्कॉर्पियन पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे.
  • भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी अंतर्गत हा प्रकल्प साकारला आहे. आयएनएस कलवरी ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण आहे.

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव

  • लोकसभेच्या महासचिवपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
  • नोव्हेंबर महिन्यात त्यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत असेल.
  • लोकसभेचे विद्यमान मुख्यसचिव अनुप मिश्रा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले, त्यानंतर १ डिसेंबर रोजी श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला. 
  • स्नेहलता श्रीवास्तव या १९८२च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
  • श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
  • लोकसभेच्या महासचिवसारख्या सर्वोच्च पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यसभेत रमा देवी या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा मसुदा मंजूर

  • मुस्लिम धर्मियांमध्ये प्रचलित असलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवलेल्या तिहेरी तलाक पद्धतीविरोधात नव्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला असून या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • ‘मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक २०१७’ असे या तिहेरी तलाक पद्धतीविरोधातील कायद्याचे नाव आहे.
  • गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी पी चौधरी यांच्या मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे.
  • या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही प्रकारे (तोंडी, लिहून, ई-मेलद्वारे, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप) तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
  • हा गुन्हा दंडात्मक आणि अजामीनपात्र असणार आहे. जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू होईल.
  • हे विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर याबाबत कायदा अस्तित्वात येईल.
  • सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला बेकायदा ठरवत त्यावर ६ महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते.

वैद्यकीय शिक्षणासाठी नवा नियामक

  • वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी नवा नियामक आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७’च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे सध्याची ‘राष्ट्रीय वैद्यकीय परिषद’ (एमसीआय) मोडीत काढली जाणार आहे. 
  • रणजीत रॉय चौधरी समितीच्या शिफारशी तसेच संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार हा आयोग स्थापन केला जात आहे.
  • या आयोगाचा अध्यक्ष आणि काही सदस्य हे सरकारनियुक्त असतील. ५ सदस्य हे निवडणुकीतून निवडले जातील, तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.
 या विधेयकातील तरतुदी 
  • वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तसेच वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन आणि अधिस्वीकृती, डॉक्टरांची नोंदणी यासाठी चार स्वायत्त मंडळे स्थापली जाणार.
  • या आयोगामार्फत सामूहिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल तसेच सर्व वैद्यकीय पदवीधारकांसाठी अनुज्ञा परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वैद्यकीय व्यवसायासाठीचा परवाना दिला जाईल.
  • वैद्यकीय महाविद्यालयांची वार्षिक मूल्यांकनातून व नोंदणीच्या वार्षिक नूतनीकरणातून सुटका होणार.
  • याऐवजी वैद्यकीय महाविद्यालयांना केवळ स्थापना आणि नोंदणीच्यावेळी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • आपल्या जागा वाढविण्यासाठी किंवा पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी या महाविद्यालयांना परवानगी घ्यावी लागणार नाही.
  • त्याबाबतचा निर्णय महाविद्यालये स्वेच्छेने घेऊ शकतात. मात्र २५० जागांची मर्यादा त्यांना ओलांडता येणार नाही.
  • सरकारनियुक्त वैद्यकीय मूल्यमापन आणि मूल्यांकन मंडळ महाविद्यालयांची पाहणी करू शकतील.
  • ज्या महाविद्यालयांनी नियमांचा आणि निकषांचा भंग केला असेल त्यांना कठोर दंडाला सामोरे जावे लागेल.
  • या आयोगामार्फत महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाणार आहे.

नासाकडून नव्या सूर्यमालेचा शोध

  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे.
  • या सूर्यमालेत ८ ग्रह आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणे या सूर्यमालेतही ‘केप्लर ९०’ नावाच्या एका ताऱ्याभोवती हे ग्रह फिरत आहेत.
  • पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २,५४५ प्रकाश वर्षे लांब आहे, तर पृथ्वीच्या तुलनेत ती ३० टक्क्यांनी मोठी आहे.
  • सध्या नासा गूगलसोबत ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेते आहे. त्या मोहिमेंतर्गत हा नवीन शोध लागला आहे.

चालू घडामोडी : १४ डिसेंबर

एडीबीने भारताच्या विकास दराचा अंदाज खालावला

  • नोटाबंदी, वस्तू व सेवा कर या आव्हानाबरोबरच कृषी क्षेत्रातील जोखीम गृहीत धरून आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज खालावला आहे.
  • आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने चालू आर्थिक वर्षांत देशाच्या प्रगतीचा दर आता ६.७ टक्के असेल, असे नमूद केले आहे. बँकेचा यापूर्वीचा अंदाज ७ टक्के होता.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर २०१८मध्ये पुन्हा उचल खाण्याची शक्यताही विकास दर अंदाज खुंटविण्यास निमित्त ठरली आहे.
  • आशियाई विकास बँकेने २०१८-१९ या पुढील वित्त वर्षांतील भारताच्या विकास दराचा अंदाजही आधीच्या ७.४ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
  • गेल्या वर्षांतील नोटाबंदी, चालू वित्त वर्षांच्या मध्यापूर्वी लागू झालेली नवी अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे अर्थव्यवस्था तूर्त सावरणे अवघड असल्याचे बँकेने म्हटले आहे.
  • आशियाई विकास बँकेपूर्वी जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या विकास दराचा अंदाज आधीच्या ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.
  • फिच, मूडीज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी यापूर्वीच भारताच्या वाढत्या विकास दराबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

  • प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे १४ डिसेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते.
  • गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते.
  • सुरुवातीला त्यांनी गुजराती नाटकांसाठी लेखक म्हणूनही काम केले. केतन मेहता यांच्या होली (१९८४) चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
  • हॅलो ब्रदर, रंगीला, मन, पुकार, बादशहा, सत्या, मस्त, अकेले हम अकेले तूम, दौड या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तर खिलाडी ४२०, फिर हेराफेरी या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
  • विनोदी भूमिकांसह त्यांनी विरासत, कंपनी या सारख्या सिनेमांमध्येही काम केले. २०१५मध्ये आलेला ‘वेलकम बॅक’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

आयओए अध्यक्षपदी नरिंदर बात्रा

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल.
  • सरचिटणीस पदासाठी राजीव मेहता हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले असून पुढील ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी ते या पदावर कार्य करतील.
  • कोषाध्यक्ष पदासाठी आनंदेश्वर पांडे यांची निवड झाली आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी आर के आनंद यांची निवड झाली आहे.
  • या निवडणुकीआधी वकील राहुल मेहरा यांनी ही निवडणूक केंद्राच्या क्रीडा आचारसंहितेनुसार होत नसल्याची याचिका केली होती व निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
  • पण न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. आता ही निवडणूक क्रीडा आचारसंहितेनुसार घेतली आहे की नाही, हे न्यायालयातच स्पष्ट होईल.

चालू घडामोडी : १३ डिसेंबर

प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ लालजी सिंह यांचे निधन

  • भारताचे प्रख्यात जनुकशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि भारतातील डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे १० डिसेंबर रोजी निधन झाले.
  • १९८८मध्ये त्यांनी भारतात सर्वप्रथम डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञान विकसित करून ते न्यायवैद्यक शाखेत वापरण्यास सुरुवात केली.
  • त्यानंतर प्रियदर्शिनी मट्टू खून प्रकरण, दिल्लीतील नैना साहनी तंदूरकांड, उत्तर प्रदेशातील मधुमिता हत्याकांड यांसह अनेक प्रकरणांत मृतांची व आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यांचे हे तंत्रज्ञान वापरले गेले. या तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांच्या तपासाला अतिशय निर्णायक अशी कलाटणी मिळाली.
  • याच तंत्रज्ञानातून जनुकीय रोगांचे कोडेही उलगडता येते. डीएनएच्या आधारे रोगनिदानाची पद्धतीही त्यांनी भारतात विकसित केली होती.
  • मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कलवरी गावचे असलेले सिंह यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून जैवतंत्रज्ञानात बीएससी, एमएससी आणि पीएचडीची पदवी घेतली.
  • पुढचे शिक्षण एडिनबर्ग विद्यापीठातून घेताना त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञानातील संशोधन सुरू केले. 
  • परदेशात संशोधनाची संधी असतानाही १९७७ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी देशात डीएनए फिंगर पिंट्रिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात घालवला.
  • रेशमाच्या किडय़ांचे जनुकीय विश्लेषण, मानवी जिनोम व प्राचीन डीएनएचा अभ्यास, वन्यजीव संरक्षण असे त्यांचे आवडीचे विषय होते.
  • त्यांनी तीनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले. हैदराबादची सेंटर फॉर डीएनए फिंगर पिंट्रिंग अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक्स या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता.
  • सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक असलेले सिंह यांनी या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते बीएचयूचे २५वे उपकुलगुरूही होते.
  • त्यांनी त्यांच्या छोटय़ाशा गावात २००१मध्ये राहुल कॉलेज व नंतर अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित जिनोम फाऊंडेशन या संस्था स्थापन केल्या.
  • १९७४मध्ये त्यांना युवा संशोधक पुरस्कार मिळाला. त्यानंतर रॅनबक्सी पुरस्कार, भटनागर पुरस्कार व पद्मश्री असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.

रोहित शर्माचे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक

  • पंजाबमधील मोहाली येथील मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
  • विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला कर्णधारही ठरला आहे.
  • त्याने १५३ चेंडूंमध्ये केलेल्या २०८ धावांच्या धमाकेदार खेळीत १३ चौकार १२ षटकारांची आतिषबाजी केली.
  • रोहित शर्माने पहिल्या शंभर धावा ११५ चेंडूत तर नंतरच्या शंभर धावा अवघ्या ३६ चेंडूत पूर्ण केल्या. रोहितच्या या धमाकेदार खेळीमुळे भारताने या सामन्यात श्रीलंकेचा १४१ धावांनी पराभव केला. 
  • २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द रोहितने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावताना २०९ धावांची खेळी साकारली होती.
  • २०१४मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. ही खेळी कोणत्याही खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
  • यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१०मध्ये वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती.
  • याशिवाय भारताचा वीरेंद्र सेहवाग, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलनेही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहे.