देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी जाहीर केले.
लालूप्रसाद व अन्य १५ जणांना अटक झाली असून, सबळ पुराव्याअभावी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह अन्य ६ जणांना मात्र आरोपमुक्त केले आहे.
१९९०नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला असून, शिक्षेचा निकाल ३ जानेवारी रोजी दिला जाणार आहे.
पाटणा उच्च न्यायालयाने १९९६मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. सुमारे २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.
चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता.
माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना मात्र न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. आधी काँग्रेसमध्ये असलेले मिश्रा हे राष्ट्रवादी काँग्रेसमार्गे सध्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात दाखल आहेत.
याआधी २०१३मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने चाराघोटाळ्यात त्यांना दोषी जाहीर केले होते आणि ४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता.
लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी ३ प्रकरणे दाखल आहेत. त्यात दुमका कोषागारातून ३.९७ कोटी रुपयांचा, छैबासा कोषागारातून ३६ कोटी रुपयांचा आणि दोरांदा कोषागारातून १८४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
जयराम ठाकूर हिमाचलचे १३वे मुख्यमंत्री
सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते हिमाचलचे १३ वे मुख्यमंत्री असतील.
हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला २१ जागांवरच समाधान मानावे लागले.
भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला.
यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले ठाकूर हे सेरज विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. २००७ ते २००९ या कालावधीत ते भाजपचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष होते.
त्यांनी १९९८साली विधानसभेत प्रथमच प्रवेश केला, त्यानंतर ते सतत विजयी होत गेले. धुमल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती.
अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी
पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली.
अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात करत, महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा पटकावली.
टेमबिन वादळाचा दक्षिण फिलिपीन्सला तडाखा
टेमबिन या उष्णकटिबंधीय वादळाचा दक्षिण फिलिपीन्सला तडाखा बसला असून, या वादळामुळे आतापर्यंत १३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत.
मिंदानो या फिलिपीन्समधील दुसऱ्या मोठय़ा बेटाला या वादळाने तडाखा दिला, त्यामुळे तेथे पूर आले व अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्यात अनेक खेडी नष्ट झाली.
फिलिपीन्सला दरवर्षी किमान वीस मोठय़ा वादळांचा तडाखा बसत असतो. त्यातील बहुतांश प्राणघातक असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा