तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारे ‘मुस्लिम महिला (विवाहोत्तर हक्कांचे संरक्षण) विधेयक’ २८ डिसेंबर रोजी विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत मंजूर झाले.
या विधेयकामधील काही तरतुदींवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीसह इतरांनी आक्षेप घेत बदल सुचविले होते.
मात्र, हे बदल सदस्यांनी मतदानाद्वारे पूर्णपणे नाकारले. त्यामुळे अखेर हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत न्यायालयाने केंद्र सरकारला यासंबंधी कायदा बनवण्यास सांगितले होते.
कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
या मंत्री गटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी पी चौधरी यांचा समावेश आहे.
भारताच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
हवाई संरक्षणासाठी भारताने अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून २८ डिसेंबर रोजी यशस्वी चाचणी केली.
डीआरडीओने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र ७.५ मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट मिसाईल आहे. जे रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात आले होते.
भारतीय सीमेच्या दिशेने डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची क्षमता या सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रामध्ये आहे.
यापूर्वी भारताने याच श्रेणीतील दोन क्षपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या अनुक्रमे ११ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी केल्या होत्या.
या क्षेपणास्त्रामुळे पृथ्वीच्या हवाई कक्षेत ३० किमी उंचीच्या आतून जाणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करत देशाच्या सीमेवर होणारा संभाव्य हल्ला रोखता येणार आहे.
या क्षेपणास्त्रात स्वत:ची रडार यंत्रणा आहे. मानवी आदेशांशिवाय हे क्षेपणास्त्र स्वत:च शत्रू क्षेपणास्त्राची दिशा, मार्ग ओळखून ते नष्ट करते.
विशेष म्हणजे, या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आले आहे.
जगातील मोजक्या देशांकडे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान असून त्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा