चालू घडामोडी : २२ व २३ डिसेंबर
गुजरात मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी
- गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. तर नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे.
- यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती.
- भाजपा गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करणार आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा बऱ्यापैकी घटल्या आहेत.
- १८२ जागांच्या विधानसभेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपाला फक्त ९९ जागांवर समाधान मानावे लागले. २०१२मध्ये भाजपाने गुजरातमध्ये ११५ जागा जिंकल्या होत्या.
- यावेळी काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली असून, २०१२मध्ये ६१ जागा जिंकणारी काँग्रेस ७७ जागांपर्यंत पोहोचली.
बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी साबा करीम
- भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि माजी निवड समिती सदस्य साबा करीम यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. १ जानेवारी २०१८ पासून ते आपला कार्यभार सांभाळतील.
- सप्टेंबरमध्ये ‘दुटप्पी भूमिके’च्या मुद्यावरून एम व्ही श्रीधर यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. श्रीधर यांचे ३० ऑक्टोबरला निधन झाले.
- करीम यांना स्थानिक क्रिकेट आणि त्यातील गुंतागुंत आदींची इत्थंभूत माहिती आहे. एक कसोटी आणि ३४ वन-डेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
- १८ वर्षांच्या करिअरमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज या नात्याने १२० प्रथमश्रेणी, १२४ लिस्ट ए सामने खेळले आहेत.
वैज्ञानिक डॉ. कॅलेस्टस जुमा यांचे निधन
- शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उत्कृष्टरीत्या वापर केल्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले केनियाचे वैज्ञानिक डॉ. कॅलेस्टस जुमा यांचे १५ डिसेंबर रोजी निधन झाले.
- डॉ. जुमा हे हार्वर्ड केनेडी स्कूल येथे विज्ञान, तंत्रज्ञान व जागतिकीकरण प्रकल्पाचे संचालक होते.
- तसेच बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे अर्थसहाय्यित आफ्रिकेतील कृषी इनोव्हेशन प्रकल्पाचेही ते संचालक होते.
- आंतरराष्ट्रीय विकास पद्धती या विषयाचे प्राध्यापक व व्यापक विषयांवर लेखन करणारे विद्वान असा त्यांचा लौकिक होता.
- ब्रिटनच्या ससेक्स विद्यापीठातून त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान धोरण या विषयात पीएचडी केली होती.
- संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता जाहीरनाम्याचे ते कार्यकारी सचिव होते. तंत्रज्ञानाचा वापर गरिबांचे जीवन बदलण्यासाठी झाला पाहिजे असे त्यांना वाटत होते.
- त्यांनी नैरोबीत ‘आफ्रिकन सेंटर फॉर टेक्नॉलॉजी स्टडीज’ ही संस्था स्थापन केली. शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, असा या संस्थेचा हेतू आहे.
- तंत्रज्ञान अभिनवता, जेनेटिक पेटंटिंग, हरित क्रांतीचा आफ्रिकेवरचा परिणाम यावर त्यांनी मोठे काम केले होते.
- २०१६मध्ये त्यांनी लिहिलेले ‘इनोव्हेशन अॅण्ड इट्स एनेमीज’ हे पुस्तक गाजले. त्यात कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला नाके मुरडण्याच्या सामाजिक प्रवृत्तींवर टीका केली होती.
- ‘द नेशन’ या मायदेशातील वृत्तपत्रांत त्यांनी सुरुवातीला विज्ञान तंत्रज्ञान प्रतिनिधी म्हणून काम केले होते. इन लॅण्ड वुइ ट्रस्ट, दी न्यू हार्वेस्ट, दी जीन हंटर्स ही त्यांची पुस्तके गाजली.
- न्यू आफ्रिकन मॅगझिनने २०१२, २०१३ आणि २०१४ साली त्यांचा समावेश १०० सर्वाधिक प्रभावशाली आफ्रिकन्सच्या यादीत केला होता.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलेब्रिटींमध्ये सलमान खान पहिल्या स्थानी
- फोर्ब्स मॅगझीनने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय सेलेब्रिटींच्या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे.
- सलमान खानची वार्षिक कमाई २३२ कोटी आहे. शाहरुख खान १७० कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.
- धुवॉंधार बॅटींगने धावांचा विक्रमी पाऊस पाडणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (वार्षिक कमाई १०० कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार (९८ कोटी), पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (८२ कोटी), आमीर खान (६८ कोटी) सहाव्या स्थानी आहे.
- तर प्रियांका चोप्रा (६८ कोटी) सातव्या, महेंद्रसिंह धोनी (६३ कोटी) आठव्या, हृतिक रोशन (६३ कोटी) नवव्या आणि अभिनेता रणवीर सिंह (६२ कोटी) दहाव्या स्थानी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा