चालू घडामोडी : ८ डिसेंबर

युनेस्कोकडून कुंभमेळा सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित

  • शेकडो वर्षांच्या परंपरा लांबलेल्या भारताच्या कुंभमेळ्याला युनेस्कोकडून मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून, आता त्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारश्यांच्या यादीत समावेश झाला आहे.
  • दक्षिण कोरियातील जेजू येथे ४ ते ९ डिसेंबरदरम्यान पार पडलेल्या युनेस्कोच्या बैठकीमध्ये कुंभमेळ्याला हेरिटेज यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • या यादीत बोस्वाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, मंगोलिया, मोरक्को, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
  • ‘योग’ आणि ‘नवरोज’ यांच्यानंतर सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेला ‘कुंभमेळा’ तिसरा वारसा आहे.
  • युनेस्कोच्या विशेष समितीच्या मते, हा महोत्सव खूपच मोठा आणि शांतीपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. भूतलावर हा यात्रेकरुंचा सर्वात शांतीपूर्ण मेळा आहे.
 कुंभमेळा 
  • कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.

  • दर ३ वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने १२ वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या ४ वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री ‘पूर्ण कुंभमेळे’ भरत असतात.
  • दर ६ वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे ‘अर्धकुंभमेळा’ भरतो. १२ पूर्ण कुंभमेळ्यांनंतर १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे ‘महाकुंभमेळा’ भरतो.
  • भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात. या मेळ्यादरम्यान, या शहरांच्या नद्यांच्या किनाऱ्यांवर पूजा अर्चा केली जाते.
  • पवित्र जलाने स्नान करण्याबरोबरच विविध धार्मिक विधीही या काळामध्ये केले जातात. भारताच्या इतिहासाशी आणि सामाजिक सौहार्दाशी जोडलेला हा एक उत्सव आहे.
  • हा धार्मिक महोत्सव सहिष्णुता आणि सर्वसमावेशक प्रवृत्तीचे दर्शन घडवतो. यात कोणत्याही भेदभावाशिवाय लोक सहभागी होतात.
  • मंत्र आणि उपदेशांद्वारे गुरुद्वारे शिष्यांना ज्ञान देण्याची परंपरा या कुंभमेळ्याद्वारे चालवली जाते.
 आख्यायिका व सांस्कृतिक संदर्भ 
  • हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते.
  • युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात.
  • पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता.
  • आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.

रोनाल्डोला पाचव्यांदा ‘बॅलन डी ऑर’ पुरस्कार

  • पोतुर्गालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने पाचव्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलन डी ऑर’ हा मानाचा पुरस्कार पटकाविला आहे.
  • या पुरस्काराच्या शर्यतीत अर्जेंटीनाचा मेस्सी हा दुसऱ्या तर ब्राझीलचा नेयमार हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
  • रिअल माद्रिदच्या रोनाल्डोने सलग दुसऱ्या पुरस्कारासह सर्वाधिक वेळा हा पुरस्कार पटकावणाऱ्या बार्सिलोनाच्या लियोनेल मेस्सीशी (५ पुरस्कार) बरोबरी साधली आहे.
  • रोनाल्डो यापूर्वी २००८, २०१३ , २०१४ आणि २०१६ साली या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
  • त्याने मागील मोसमात सर्व स्पर्धांमध्ये मिळून ४२ गोल नोंदवले. त्याचप्रमाणे युरोपियन वर्ल्ड कप पात्रता फेरीमध्येही त्याने १५ गोल केले.
  • चॅम्पियन्स लीगच्या गेल्या सत्रात रोनाल्डो गोल नोंदवण्यात अव्वलस्थानी होता. त्याच्या जोरावर माद्रिदने चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकाविले होते.
  • त्याचप्रमाणे, ला लीगा स्पर्धेतही त्याच्या नेतृत्वाखाली रियाल माद्रिदने विजेतेपद निश्चित केले होते.
  • फुटबॉलच्या मैदानातील प्रतिष्ठित पुरस्काराशिवाय रोनाल्डोने यावर्षी ‘प्लेअर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देखील पटकवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा