चालू घडामोडी : २६ डिसेंबर
यूजीसीच्या अध्यक्षपदी प्रा. धीरेन्द्रपाल सिंह
- एप्रिल २०१७ पासून रिक्त असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी प्रा. धीरेन्द्रपाल सिंह नियुक्ती करण्यात आली आहे.
- देशभरातील विद्यापीठांचे नियमन करणाऱ्या या संस्थेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे एप्रिल २०१७ पासून रिक्त आहेत.
- उत्तर प्रदेशातील शेतकरी कुटुंबात १९५६साली जन्मलेल्या धीरेन्द्रपाल यांनी गढवाल विद्यापीठातूनच पीएचडी मिळवली आहे. त्यानंतर देशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
- सध्या ते राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’च्या संचालक पदावर कार्यरत आहेत. जुलै २०१५मध्ये या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.
- त्यांचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव साडेतीन दशकांहून अधिक असून २००४पासून त्यांनी विविध कुलगुरूपदे सांभाळली आहेत.
- व्यवसायशिक्षण, पर्यावरणशास्त्र यांसोबतच मूल्यशिक्षणाच्या क्षेत्रात प्रा. सिंह यांनी विविध प्रशासकीय पदे सांभाळताना काम केले आहे.
- देशातील अनेक संस्थांच्या विद्यापरिषदांवर किंवा कार्यकारी मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
- त्यात बनारस, सागर व इंदूरच्या विद्यापीठांखेरीज अलाहाबाद विद्यापीठ, मिझोरम विद्यापीठ, पंजाबातील केंद्रीय विद्यापीठ, यांचा समावेश आहे.
- बेंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे ते सन्माननीय सदस्य असून ‘सोसायटी ऑफ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रीसर्च’ या कोलकाता आणि भोपाळ येथील संस्थांचेही सदस्य आहेत.
स्वयंसेवी संस्थाना मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडण्याचे निर्देश
- परदेशातून निधी मिळत असलेल्या स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक आस्थापने व व्यक्ती यांना मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.
- परदेशातून निधी घेणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता यावी, या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- बँकेत खाते उघडण्यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींना २१ जानेवारी २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
- या मुदतीतच संबंधितांना त्यांच्या बँक खात्याची सगळी माहिती विहित नमुन्यात गृह मंत्रालयास सादर करावी लागणार आहे.
- याशिवाय परदेशातून मिळालेला निधी देशहितास बाधा आणणाऱ्या कामासाठी वापरला जाणार नाही याची हमी या संस्थांना द्यावी लागणार आहे.
- मान्यताप्राप्त बँकांमध्ये केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ३२ बँकांचा समावेश असून, त्यात एक परदेशी बँकही आहे.
- या बँका सरकारच्या सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन यंत्रणेशी (पीएफएमएस) संलग्न असतील, त्यामुळे संबंधितांनी नियमांचे अनुपालन केले की नाही हे सरकारला समजणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने स्वयंसेवी संस्थांसाठीचे नियम कडक केले असून परदेशी निधी नियमन कायद्याच्या विविध तरतुदींचा भंग केल्याबद्दल अनेक संस्थांवर कारवाई केली आहे.
ट्युनेशियामध्ये एमिरेट्स एअरलाइन्सवर बंदी
- ट्युनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाने एमिरेट्स एअरलाइन्स कंपनीच्या सर्व विमानांना देशात उतरण्यास आणि उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.
- दुबईला निघालेल्या एमिरेट्सच्या विमानात दोन ट्युनेशियन महिलांना चढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ट्युनेशियन महिलांना विमानात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे विचित्र कारण एमिरेट्सकडून त्या महिलांना देण्यात आले.
- वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानांना ट्युनेशियामध्ये बंदी घालण्यात आली आहे.
- जोपर्यंत कंपनी जागतिक नियम आणि करारांप्रमाणे काम करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा