चालू घडामोडी : १८ डिसेंबर

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक

  • १८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झालेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी स्पष्ट बहुमत राखण्यात यश मिळाले आहे.
  • याशिवाय, या विजयामुळे देशातील भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९वर गेली आहे. तर काँग्रेस पक्ष फक्त चार राज्यांपुरता मर्यादित राहिला आहे.
  • अरुणाचल प्रदेश, असाम, छत्तीसगड, गोवा, हरयाणा, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजप स्वबळावर सत्तेत आहे.
  • तर बिहार, आंध्रप्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम आणि नागालँडमध्ये भाजप मित्रपक्षांबरोबर सत्तेत आहे.
  • दुसरीकडे काँग्रेसच्या ताब्यात केवळ कर्नाटक, पंजाब, मिझोराम आणि मेघालय ही ती चार राज्ये असून, त्यातही कर्नाटक आणि पंजाब ही दोनच मोठी राज्ये काँग्रेसच्या हातात आहेत.
गुजरात
  • गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती.
  • १८२ जागांसाठी गुजरातमध्ये सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले होते. सरकार स्थापनेसाठी येथे ९२ एवढे संख्याबळ आवश्यक होते.
  • काँग्रेसने दिलेल्या कडव्या लढतीमुळे गुजरातेत सत्ता राखताना भाजपची चांगलीच दमछाक झाली असून, त्यांचे संख्याबळ ११५वरून ९९पर्यंत घसरले.
  • तर कॉंग्रेसने ६१वरून ७७ जागांपर्यंत मजल मारल्याने मागील सलग २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला कसेबसे गुजरात राखण्यात यश आले.
  • यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळविणे अवघड जाऊ शकते हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.
  • उना दलित अत्याचारानंतर दलितांचा आवाज बनलेले जिग्नेश मेवाणी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम मतदार संघात भाजपचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांचा पराभव केला.
हिमाचल प्रदेश
  • गुजरातच्या तुलनेत कमी जागा आणि ग्लॅमर असल्यामुळे हिमाचल प्रदेशची निवडणूक काहीशी झाकोळली गेली होती.
  • हिमाचल प्रदेशात मतदार दर पाच वर्षांनी सरकार बदलतात असा गेल्या दोन-अडीच दशकांचा अनुभव आहे. तो पॅटर्न त्यावेळीदेखील कायम राखला आहे.
  • ६८ जागा असलेल्या हिमाचल विधानसभेत सरकार स्थापनेसाठी ३५ जागांची गरज होती. ६८ पैकी ४४ जागा जिंकत स्पष्ट भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले.
  • गेली पाच वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला २१ जागा जिंकता आल्या, तर  मार्क्सवादी पक्षाने १ व अपक्षांनी २ जागा जिंकल्या. मावळत्या विधानसभेत काँग्रेसच्या ३६ तर भाजपाच्या २६ जागा होत्या.
  • या निकालामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपला आलटून पालटून सत्ता देण्याचा 
  • या निवडणुकीत काँग्रेसविरोधातील अँटी-इन्कम्बसी फॅक्टर, विकासाचा मुद्दा घेऊन भाजपने केलेला प्रचार, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, स्थानिक नेत्यांमधील बेबनाव हे घटक महत्त्वपूर्ण ठरले.
  • या निवडणुकीतील भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा काँग्रेसचे राजिंदर राणा यांच्याकडून ३,५०० मतांनी पराभव झाला.
  • प्रेमकुमार धुमल हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. २००७-१२ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
  • काँग्रेसने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या नावावरच निवडणूक लढवली. ८३ वर्षीय वीरभद्र यांनी ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले.
  • राज्याचे सहा वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलेले वीरभद्र सिंह आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे दोघे विजयी झाले आहे.
  • वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असून, त्याची चौकशीही विविध गुप्तचर यंत्रणांकडून सुरू आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा: सुशील कुमार आणि साक्षी मलिकला सुवर्णपदक

  • भारताचे कुस्तीपटू सुशील कुमार आणि साक्षी मलिक यांनी जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल रेसलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली आहेत.
  • सुशील कुमारने ७४ किलो वजनी गटात अंतिम लढतीत न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरवर मात करत सुवर्णपदक जिंकले.
  • याआधी २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर सुशीलचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले.
  • रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाइलमधील ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने न्यूझीलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा १३-२ असा पराभव केला.
  • या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी एकूण १० वजनी गटात नऊ सुवर्ण, सात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा