चालू घडामोडी : १५ डिसेंबर

स्वदेशी बनावटीच्या आयएनएस कलवरी पाणबुडीचे लोकार्पण

  • ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे १४ डिसेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत लोकार्पण करण्यात आले.
  • नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखल झाली.
  • आयएनएस कलवरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. भारताची सुरक्षा आणि स्थिरतेमध्ये कलवरी महत्वाची भूमिका पार पाडेल.
  • मोदींनी भारताच्या पाणबुडी विकास कार्यक्रमाला सागर (SAGAR - Security And Growth for All in the Region) हे विशेष नाव दिले आहे.
 कलवरीची वैशिष्ट्ये 
  • कलवरी ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलासाठी फ्रान्सच्या सहकार्याने बांधली आहे.
  • स्टेल्थ बांधणी आणि नेमका लक्ष्यभेद करणारी यंत्रणा ही ‘टायगर शार्क’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कलवरीची सामर्थ्ये आहेत. 
  • पाणतीर त्याचप्रमाणे क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून पाण्यातून भूपृष्ठावर तसेच पाण्यातून पाण्यात असा दुहेरी हल्ला करण्याची कलवरीची क्षमता आहे.
  • तसेच पाण्यात पाणसुरुंग पेरणे, पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करणे या क्षमतांचाही कलवरीच्या सामर्थ्यात समावेश आहे.
  • पाकिस्तान आणि चीनकडून समुद्रमार्गे होणारी घुसखोरी रोखण्यासाठी ही पाणबुडी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
  • ८ डिसेंबर १९६७ रोजी भारतीय नौदलात पहिली पाणबुडी दाखल झाली, तिचे नावही कलवरी असेच होते. ३१ मे १९९६ रोजी ती सेवेतून निवृत्त झाली होती.
  • २०२१पर्यंत अशा प्रकारच्या एकूण सहा स्कॉर्पियन पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल होणार असून कलवरी ही या ताफ्यातील पहिली पाणबुडी आहे.
  • भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी अंतर्गत हा प्रकल्प साकारला आहे. आयएनएस कलवरी ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण आहे.

स्नेहलता श्रीवास्तव लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव

  • लोकसभेच्या महासचिवपदी स्नेहलता श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
  • नोव्हेंबर महिन्यात त्यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८पर्यंत असेल.
  • लोकसभेचे विद्यमान मुख्यसचिव अनुप मिश्रा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले, त्यानंतर १ डिसेंबर रोजी श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला. 
  • स्नेहलता श्रीवास्तव या १९८२च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
  • त्यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
  • श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
  • लोकसभेच्या महासचिवसारख्या सर्वोच्च पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यसभेत रमा देवी या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा मसुदा मंजूर

  • मुस्लिम धर्मियांमध्ये प्रचलित असलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवलेल्या तिहेरी तलाक पद्धतीविरोधात नव्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला असून या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • ‘मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक २०१७’ असे या तिहेरी तलाक पद्धतीविरोधातील कायद्याचे नाव आहे.
  • गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी पी चौधरी यांच्या मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे.
  • या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही प्रकारे (तोंडी, लिहून, ई-मेलद्वारे, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप) तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
  • हा गुन्हा दंडात्मक आणि अजामीनपात्र असणार आहे. जम्मू आणि काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू होईल.
  • हे विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर याबाबत कायदा अस्तित्वात येईल.
  • सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला बेकायदा ठरवत त्यावर ६ महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते.

वैद्यकीय शिक्षणासाठी नवा नियामक

  • वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी नवा नियामक आयोग स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७’च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे सध्याची ‘राष्ट्रीय वैद्यकीय परिषद’ (एमसीआय) मोडीत काढली जाणार आहे. 
  • रणजीत रॉय चौधरी समितीच्या शिफारशी तसेच संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार हा आयोग स्थापन केला जात आहे.
  • या आयोगाचा अध्यक्ष आणि काही सदस्य हे सरकारनियुक्त असतील. ५ सदस्य हे निवडणुकीतून निवडले जातील, तर १२ सदस्य पदसिद्ध असतील.
 या विधेयकातील तरतुदी 
  • वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तसेच वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन आणि अधिस्वीकृती, डॉक्टरांची नोंदणी यासाठी चार स्वायत्त मंडळे स्थापली जाणार.
  • या आयोगामार्फत सामूहिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल तसेच सर्व वैद्यकीय पदवीधारकांसाठी अनुज्ञा परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच वैद्यकीय व्यवसायासाठीचा परवाना दिला जाईल.
  • वैद्यकीय महाविद्यालयांची वार्षिक मूल्यांकनातून व नोंदणीच्या वार्षिक नूतनीकरणातून सुटका होणार.
  • याऐवजी वैद्यकीय महाविद्यालयांना केवळ स्थापना आणि नोंदणीच्यावेळी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे.
  • आपल्या जागा वाढविण्यासाठी किंवा पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी या महाविद्यालयांना परवानगी घ्यावी लागणार नाही.
  • त्याबाबतचा निर्णय महाविद्यालये स्वेच्छेने घेऊ शकतात. मात्र २५० जागांची मर्यादा त्यांना ओलांडता येणार नाही.
  • सरकारनियुक्त वैद्यकीय मूल्यमापन आणि मूल्यांकन मंडळ महाविद्यालयांची पाहणी करू शकतील.
  • ज्या महाविद्यालयांनी नियमांचा आणि निकषांचा भंग केला असेल त्यांना कठोर दंडाला सामोरे जावे लागेल.
  • या आयोगामार्फत महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाणार आहे.

नासाकडून नव्या सूर्यमालेचा शोध

  • अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे. ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे हा शोध घेण्यात आला आहे.
  • या सूर्यमालेत ८ ग्रह आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणे या सूर्यमालेतही ‘केप्लर ९०’ नावाच्या एका ताऱ्याभोवती हे ग्रह फिरत आहेत.
  • पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २,५४५ प्रकाश वर्षे लांब आहे, तर पृथ्वीच्या तुलनेत ती ३० टक्क्यांनी मोठी आहे.
  • सध्या नासा गूगलसोबत ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेते आहे. त्या मोहिमेंतर्गत हा नवीन शोध लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा