चालू घडामोडी : २७ डिसेंबर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ‘मोक्का’तून मुक्त

 • २००८मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह ७ आरोपींवरील कठोर अशा ‘मोक्का’ कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केले. 
 • त्यांच्यावर दहशतवादी कृत्ये करणे, कट रचणे आणि हत्या या आरोपांसाठी बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या कलम १६ व १८ तसेच भारतीय दंड विधानच्या कलम १२० बी, ३०२, ३०७ व ३२६ या अन्वये खटला चालविला जाईल.
 • या खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी एकूण १० आरोपींनी अर्ज केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यास विरोध केला होता.
 • दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने शिवनारायण कलसांग्रा, श्याम साहू व प्रवीण टक्कलकी या तीन आरोपींना पूर्णपणे दोषमुक्त केले.
 • २९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
 • रमझानच्या अजाननंतर मशिदीबाहेर पडलेल्या ७ जणांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.
 • दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा तपास करत हिंदूत्ववादी संघटनांनी हा स्फोट घडवल्याचा गौप्यस्फोट केला होता.
 • साध्वी आणि पुरोहित यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात एटीएसने आरोपपत्र दाखल केले होते. सध्या साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत.

विजय रूपाणी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री

 • गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. गुजरातचे राज्यपाल ओ पी कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 
 • यावेळी नवनिर्वाचित सरकारचे उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल आणि मंत्रिमंडळातील १९ सदस्यांनीही शपथ घेतली.
 • भाजपने ६ पाटीदार, ६ ओबीसी, २ राजपूत, ३ आदिवासी, १ दलित आणि एका ब्राह्मण आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.
 • भाजपने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले होते. तर कॉंग्रेसने ८० जागांवर विजय मिळवला होता.

महंमद अल जाँदला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार

 • सीरियाच्या १६ वर्षीय महंमद अल जाँद याला ‘किड्स राइट्स फाऊंडेशन’चा ‘आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार’ मिळाला आहे.
 • सीरियन शरणार्थी मुलांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याला नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • सिरियातील यादवी संघर्षामुळे निर्वासित झालेल्या महंमद अल जाँदने आपल्या कुटुंबासह लेबनॉनमधील शरणार्थी छावणीत २०१४मध्ये एक शाळा सुरु केली.
 • शंभर विद्यार्थी व चार शिक्षकांसह सुरु झालेल्या या शाळेत आज २०० मुले शिक्षण घेत आहेत.
 • जगात सध्या २.८ कोटी मुले विस्थापित आहेत. त्यातील २५ लाख सीरियातील आहेत, त्यांना शिक्षणाची कोणतीही संधी नाही.
 • या अंधारातून चालताना त्यांना महंमदने हात दिला, त्यामुळे प्रकाशाचा कवडसा त्यांच्यावरही पडला व त्यांच्याही आयुष्यात आशेची नवी पालवी फुटते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा