सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना मॅगसेसे पुरस्कार
- आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार २०१८ या वर्षासाठी सहा जणांना जाहीर करण्यात आला. या सहा जणांमध्ये २ स्त्रियांचा तसेच २ भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
- प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी या दोन भारतीयांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- याशिवाय पुरस्कार विजेत्यांमध्ये फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी, व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम, कंबोडियाचे युक छांग आणि ईस्ट तिमोर या नवजात देशातील मारिया डी लार्देस मार्टिन्स क्रूझ या चौघांचाही समावेश आहे.
- कंबोडियाच्या युक छांग यांनी आपल्या देशातील वंशसंहाराची स्मृती जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या स्मृतींमधून विद्वेषाला कायमची मूठमाती मिळावी, ही त्यांची यामागची संकल्पना.
- ईस्ट तिमोरच्या मारिया यांनी सर्व वंश व वर्णाच्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या लढ्यात गरिबी हटावला विशेष स्थान आहे.
- फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी यांनी गेले अर्धशतक सामाजिक न्यायाची लढाई चालवली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा रोषही पत्करला.
- व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम यांनी अपंगत्वावर मात करून देशातील अपंगांसाठी सारे जीवन वाहिले आहे.
मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठ्या सरोवराचा शोध
- इटलीच्या संशोधकांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले आहे.
- यामुळे या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
- याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
- युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने या सरोवरचा शोध लागला आहे.
- मंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास २० किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे.
- हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
- मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
- मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा असला तरी तो उबदार आणि काहिसा ओलसरही आहे. ३.६ अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.
- या नवीन शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानात इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष
- पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळवता आले नाही.
- तरीही ६५ वर्षीय इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनणार हे जवळपास निश्चित आहे. इम्रान खान पाकिस्तानचे १९वे पंतप्रधान असतील.
- पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.
- नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी २७० जागांसाठी पार पडलेल्या निवणुकीत ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने जिंकल्या.
- नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत.
- या निवडणुकीत पाकिस्तानची सत्ता बळकावू पाहणारा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफीज सईदच्या अल्लाह-ओ-अकबर पक्षाला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
- निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला आहे.
- पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी २७२ उमेदवार थेट जनतेमधून निवडले जातात. तर बाकीच्या ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.
- २७२ पैकी दोन ठिकाणी अजूनही निवडणूक झालेली नाही त्यामुळे इम्रान यांना बहुमतासाठी १३६ हा आकडा जुळवून आणावा लागेल. सरकार स्थापनेसाठी त्यांना छोटया पक्षांची व अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
- अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे.
- निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर भारताबाबत इम्रान काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
- इम्रान पंतप्रधान झाल्यास काश्मीर प्रश्न अधिक चिघळण्याची व भारतातील दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कर्नाटकमध्ये दुर्मिळ रक्तगटाचा शोध
- कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे.
- ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे.
- या रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले असता या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले.
व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणाला मंजुरी
- व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. एकत्रीकरणानंतर ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी असेल.
- दोन्ही कंपन्या एकत्रित आल्यानंतर त्यांचे एकत्रित मूल्य २३ अब्ज डॉलरवर (दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) जाण्याची शक्यता आहे.
- शिवाय या कंपनीकडे देशातील दूरसंचार उद्योगाचा ३५ टक्के बाजार हिस्सा राहणार असून, एकूण ग्राहक संख्या ४३ कोटींवर जाणार आहे.
- यामुळे व्होडाफोन आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ यांच्यात येत्या काही दिवसांत नव्याने डेटायुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे.
- सध्याचे ग्राहक राखून नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी या तिन्ही कंपन्या अधिक आकर्षक डेटा योजना व अन्य सुविधा सादर करण्याची शक्यता आहे.
- आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाद्वारे मोबाइल व्यवसायाच्या एकत्रीकरणासाठी दूरसंचार विभागाला एकत्रितरित्या ७२६८.७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
- या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाला केंद्र सरकारने ९ जुलैलाच मंजुरी दिली होती. मात्र, तत्पूर्वी दोन्ही कंपन्यांना सरकारने थकीत रक्कम भरण्याविषयी सूचना केली होती.
- दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीमध्ये कुमारमंगलम बिर्ला यांच्यावर गैरकार्यकारी संचालकपदाची जबाबदारी येणार आहे.
- नव्या कंपनीच्या सीईओपदी व्होडाफोन इंडियाचे सध्याचे सीओओ बालेश शर्मा तर सीएफओपदी आयडियाचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अक्षय मुंद्रा यांची नियुक्ती होणार आहे.
पाकिस्तानात मुख्य न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिलेची नेमणूक
- बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा सफदर या महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
- पाकिस्तानसारख्या धर्मसत्ताक व पुराणमतवादी देशात पहिल्यांदाच एखाद्या महत्त्वाच्या पदावर महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
- पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आतापर्यंत मुख्य न्यायाधीशपदी महिलेची नेमणूक झाली नव्हती.
- ताहिरा यांचा जन्म क्वेट्टा येथे ५ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. बलुचिस्तानात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची १९८२मध्ये नेमणूक झाली.
- बलुचिस्तान विद्यापीठातून नंतर त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर पदवी व १९८०मध्ये युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
- त्यांची वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणून १९८७मध्ये नेमणूक झाली. नंतर १९९१ मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद त्यांच्याकडे आले.
- १९९८मध्ये त्यांची बलुचिस्तान सेवा लवादाच्या सदस्यपदी निवड, २००९ मध्ये याच लवादाचे अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास प्रगतीकडे होत राहिला.
- नंतर त्यांची नेमणूक २००९ मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली व नंतर २०११मध्ये त्यांना या पदावर कायम करण्यात आले.
- अलीकडे त्या माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यातील तीनसदस्यीय पीठाच्या सदस्या होत्या.
- ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी देशातील काही न्यायाधीशांना अटक करून आणीबाणी जाहीर केली होती, त्याबाबतचा हा खटला महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय त्यातील त्यांची नेमणूकही लक्ष वेधणारी आहे.
- पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेवर आयएसआय व लष्कराचा सतत दबाव वाढला असताना ताहिरा यांचा मार्ग कंटकमय असला तरी त्यांची नियुक्ती तेथील महिलांचे मनोबल वाढवणारी आहे.
