सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना मॅगसेसे पुरस्कार
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार २०१८ या वर्षासाठी सहा जणांना जाहीर करण्यात आला. या सहा जणांमध्ये २ स्त्रियांचा तसेच २ भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.
प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी या दोन भारतीयांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे.
याशिवाय पुरस्कार विजेत्यांमध्ये फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी, व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम, कंबोडियाचे युक छांग आणि ईस्ट तिमोर या नवजात देशातील मारिया डी लार्देस मार्टिन्स क्रूझ या चौघांचाही समावेश आहे.
कंबोडियाच्या युक छांग यांनी आपल्या देशातील वंशसंहाराची स्मृती जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. या स्मृतींमधून विद्वेषाला कायमची मूठमाती मिळावी, ही त्यांची यामागची संकल्पना.
ईस्ट तिमोरच्या मारिया यांनी सर्व वंश व वर्णाच्या नागरिकांना सामाजिक न्याय मिळावा, यासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या लढ्यात गरिबी हटावला विशेष स्थान आहे.
फिलिपिन्सचे हॉर्वर्ड डी यांनी गेले अर्धशतक सामाजिक न्यायाची लढाई चालवली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा रोषही पत्करला.
व्हिएतनामच्या वो थी होआंग येन रोम यांनी अपंगत्वावर मात करून देशातील अपंगांसाठी सारे जीवन वाहिले आहे.
मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठ्या सरोवराचा शोध
इटलीच्या संशोधकांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
युरोपीय स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने या सरोवरचा शोध लागला आहे.
मंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास २० किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे.
हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा असला तरी तो उबदार आणि काहिसा ओलसरही आहे. ३.६ अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.
या नवीन शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तानात इम्रान खानचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष
पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळवता आले नाही.
तरीही ६५ वर्षीय इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनणार हे जवळपास निश्चित आहे. इम्रान खान पाकिस्तानचे १९वे पंतप्रधान असतील.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.
नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी २७० जागांसाठी पार पडलेल्या निवणुकीत ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने जिंकल्या.
नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत पाकिस्तानची सत्ता बळकावू पाहणारा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफीज सईदच्या अल्लाह-ओ-अकबर पक्षाला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही.
निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीमध्ये एकूण ३४२ जागा आहेत. त्यापैकी २७२ उमेदवार थेट जनतेमधून निवडले जातात. तर बाकीच्या ६० जागा महिलांसाठी आणि १० जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.
२७२ पैकी दोन ठिकाणी अजूनही निवडणूक झालेली नाही त्यामुळे इम्रान यांना बहुमतासाठी १३६ हा आकडा जुळवून आणावा लागेल. सरकार स्थापनेसाठी त्यांना छोटया पक्षांची व अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर भारताबाबत इम्रान काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
इम्रान पंतप्रधान झाल्यास काश्मीर प्रश्न अधिक चिघळण्याची व भारतातील दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कर्नाटकमध्ये दुर्मिळ रक्तगटाचा शोध
कर्नाटकमधील कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका अतिशय दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावला आहे. या रक्तगटाचे नाव पीपी किंवा पी नल फोनोटाइप असे आहे.
ज्या रुग्णाचा हा रक्तगट आहे, तो रुग्ण हा रक्तगट असणारी देशातील पहिली आणि एकमेव व्यक्ती ठरली आहे.
या रुग्णाच्या रक्ताचा नमूना आंतरराष्ट्रीय ब्लड ग्रूप रेफरन्स लॅबॉरेटरीमध्ये ब्रिस्टल येथे (यूके) तपासणीसाठी पाठवले असता या रुग्णाच्या रक्तात पीपी फेनोटाइप सेल्स असल्याचे आढळले.
व्होडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणाला मंजुरी
व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. एकत्रीकरणानंतर ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी असेल.
दोन्ही कंपन्या एकत्रित आल्यानंतर त्यांचे एकत्रित मूल्य २३ अब्ज डॉलरवर (दीड लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) जाण्याची शक्यता आहे.
शिवाय या कंपनीकडे देशातील दूरसंचार उद्योगाचा ३५ टक्के बाजार हिस्सा राहणार असून, एकूण ग्राहक संख्या ४३ कोटींवर जाणार आहे.
यामुळे व्होडाफोन आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ यांच्यात येत्या काही दिवसांत नव्याने डेटायुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे.
सध्याचे ग्राहक राखून नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी या तिन्ही कंपन्या अधिक आकर्षक डेटा योजना व अन्य सुविधा सादर करण्याची शक्यता आहे.
आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाद्वारे मोबाइल व्यवसायाच्या एकत्रीकरणासाठी दूरसंचार विभागाला एकत्रितरित्या ७२६८.७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाला केंद्र सरकारने ९ जुलैलाच मंजुरी दिली होती. मात्र, तत्पूर्वी दोन्ही कंपन्यांना सरकारने थकीत रक्कम भरण्याविषयी सूचना केली होती.
दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीमध्ये कुमारमंगलम बिर्ला यांच्यावर गैरकार्यकारी संचालकपदाची जबाबदारी येणार आहे.
नव्या कंपनीच्या सीईओपदी व्होडाफोन इंडियाचे सध्याचे सीओओ बालेश शर्मा तर सीएफओपदी आयडियाचे चीफ फायनान्शियल ऑफिसर अक्षय मुंद्रा यांची नियुक्ती होणार आहे.
पाकिस्तानात मुख्य न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिलेची नेमणूक
बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा सफदर या महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
पाकिस्तानसारख्या धर्मसत्ताक व पुराणमतवादी देशात पहिल्यांदाच एखाद्या महत्त्वाच्या पदावर महिलेची नेमणूक करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आतापर्यंत मुख्य न्यायाधीशपदी महिलेची नेमणूक झाली नव्हती.
ताहिरा यांचा जन्म क्वेट्टा येथे ५ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला. बलुचिस्तानात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची १९८२मध्ये नेमणूक झाली.
बलुचिस्तान विद्यापीठातून नंतर त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर पदवी व १९८०मध्ये युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
त्यांची वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश म्हणून १९८७मध्ये नेमणूक झाली. नंतर १९९१ मध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे पद त्यांच्याकडे आले.
१९९८मध्ये त्यांची बलुचिस्तान सेवा लवादाच्या सदस्यपदी निवड, २००९ मध्ये याच लवादाचे अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास प्रगतीकडे होत राहिला.
नंतर त्यांची नेमणूक २००९ मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली व नंतर २०११मध्ये त्यांना या पदावर कायम करण्यात आले.
अलीकडे त्या माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यातील तीनसदस्यीय पीठाच्या सदस्या होत्या.
३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी देशातील काही न्यायाधीशांना अटक करून आणीबाणी जाहीर केली होती, त्याबाबतचा हा खटला महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय त्यातील त्यांची नेमणूकही लक्ष वेधणारी आहे.
पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेवर आयएसआय व लष्कराचा सतत दबाव वाढला असताना ताहिरा यांचा मार्ग कंटकमय असला तरी त्यांची नियुक्ती तेथील महिलांचे मनोबल वाढवणारी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा