चालू घडामोडी : २२ जुलै

भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता

 • चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे विमान २२ जुलै रोजी सकाळी बेपत्ता झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
 • तंबरम हवाई तळावरून सकाळी आठच्या सुमारास उड्डाण केल्यानंतर बंगालच्या उपसागरादरम्यान विमानाचा रडारशी संपर्क तुटला.
 • एएन-३२ हे द्विइंजिनचे विमान भारतीय सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येते. विमानाच्या शोधासाठी हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाने मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.
 • नौदलाने कार्मुख, घडियाल, ज्योती आणि कुठर या चार नौकांना शोधासाठी वळविले असून, डॉर्निअर श्रेणीतील एक विमानही हरविलेल्या विमानाचा शोध घेत आहे.
 • एएन ३२ श्रेणीतील सुमारे १००हून अधिक विमाने भारतीय हवाई दलात कार्यरत आहेत. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान तब्बल चार तास उड्डाण करू शकते.

आदर्श इमारत ताब्यात घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 • वादग्रस्त आदर्श इमारत राज्य सरकारने पाच ऑगस्टपूर्वी ताब्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इमारतीचे पाडकाम करु नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
 • मुंबई उच्च न्यायालयाने ही वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालायने त्याला स्थगिती देताना, इमारत लष्कराला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
 • आदर्श इमारत ही नियमांचे उल्लंघन करुन लष्कराच्या जागेवर बांधल्याचा आरोप आहे. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांना या इमारतीत घरे देणे आवश्यक होते.
 • आदर्श सोसायटीतील आरोपांवरुन काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तिबेटमध्ये पन्नास वर्षांनंतर कालचक्र विधी

 • तिबेटमध्ये चीन सरकारने नियुक्ती केलेले ११वे पंचेन लामा ग्याल्तसन नोर्बू यांनी बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कालचक्र विधीला सुरवात केली. गेल्या पन्नास वर्षांत तिबेटमध्ये प्रथमच हा विधी होत आहे.
 • पंचेन लामा हे तिबेटमधील बौद्ध धर्मातील दुसऱ्या क्रमांकाचे पद समजले जाते. चीन सरकारने तिबेटी नागरिकांचे मन जिंकण्यासाठी नोर्बू यांची १९९५मध्ये या पदावर नियुक्ती केली होती.
 • मात्र, चीन विरोधात असलेल्या तिबेटी जनतेने नोर्बू यांना पंचेन लामा समजण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे.
 कालचक्र विधी 
 • कालचक्र हा विधी विशिष्ट व्यक्तींनीच करायचा असतो. ज्ञानप्राप्तीच्या हेतूने अंतस्थ शक्ती जागृत करण्यासाठी हा विधी केला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 • चीन सरकारने गेल्या पन्नास वर्षांमध्ये हा विधी तिबेटमध्ये होऊ दिला नव्हता. चीन सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर १९५९पासून भारतात आश्रय घेतलेल्या दलाई लामा यांनी हा विधी तिबेटबाहेर केला आहे.
 • तिबेटच्या नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.
 • चीनने मात्र हा दावा फेटाळला असून, आपल्यामुळे तिबेटचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दलाई लामा हे धोकादायक व्यक्ती असल्याचे चीनचे म्हणणे आहे.

दयाशंकर सिंह सहा वर्षांसाठी भाजपामधून निलंबित

 • बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची तुलना वारांगनेशी केल्यामुळे दयाशंकर सिंह यांना सहा वर्षांसाठी भाजप पक्षामधून निलंबित करण्यात आले.
 • उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या तिकीट वाटप पद्धतीवर दयाशंकर सिंह यांनी टीका केली होती. त्याच वेळी मायावती यांची तुलना त्यांनी वारांगनेशी केली. 
 • तसेच दयाशंकर यांना भाजपचे उपाध्यक्ष आणि राज्याच्या युवा शाखेचे प्रभारी या पदांवरूनही हटविण्यात आले आहे.
 • दयाशंकर सिंह यांच्याविरुद्ध १५३ ए, ५०४, ५०९ आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा