चालू घडामोडी : ३१ जुलै

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

  • पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा प्रदान केल्याबद्दल मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला २०१४-१५चा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आला.
  • पर्यटन मंत्रालयातर्फे विज्ञान भवनात आज झालेल्या शानदार सोहळ्यात लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.
  • देशातील २९ शहरांना मुंबईशी जोडणाऱ्या या विमानतळावरून दररोज १९० विमाने उड्डाण करतात, तर ८५ आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही या विमानतळावरून विमाने पोहचतात.
  • काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक नेणाऱ्या ‘केसरी टुर्स’चादेखील या कार्यक्रमामध्ये गौरव करण्यात आला. ‘केसरी टुर्स’चे संस्थापक केसरी पाटील आणि सुनीता पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. 
  • दिल्लीतील 'अशोका हॉटेल'चे कार्यकारी शेफ मच्छिंद्र कस्तुरे (मूळचे पुण्याचे) यांना उत्कृष्ट शेफचा पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आला. 
  • सर्वोत्कृष्ट पर्यटन विकासाचा २०१४-१५च्या पहिला पुरस्कार मध्यप्रदेश राज्याला मिळाला असून, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे.
  • याशिवाय राजस्थानातील सवाई माधोपूर स्थानकाची सर्वोत्कृष्ट पर्यटनस्नेही रेल्वे स्थानक म्हणून निवड झाली, तर तेलंगणामधील वारांगळची उत्कृष्ट हेरिटेज शहर म्हणून निवड झाली.
  • मध्यप्रदेशला अमरकंटक या धार्मिक शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे उत्कृष्ट जतन केल्याबद्दलचा पुरस्कार देण्यात आला.
  • केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री : महेश शर्मा

रशियाच्या वेटलिफ्टिंग संघावर बंदी

  • आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या रशियाच्या वेटलिफ्टिंग संघाला रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • उत्तेजक सेवनाला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांवरून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेने (आयडब्ल्यूएफ) त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आतापर्यंत रशियाच्या एकूण ११७ खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये अ‍ॅथलेटिक्समधील ६७ खेळाडूंचा समावेश आहे. रशियाने रिओसाठी ३८७ खेळाडूंचे पथक जाहीर केले होते.
  • उत्तेजक प्रकरणांमुळे रशियावर सरसकट बंदी घालावी, अशी मागणी अमेरिका, कॅनडा यांच्यासह अनेक देशांनी केली होती.
  • मात्र रशियाला जागतिक स्तरावर असलेले मोठे स्थान लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यांच्यावर सरसकट बंदी न घालण्याचा निर्णय घेतला आहे.

महमूद फारुकी बलात्कार प्रकरणात दोषी

  • अमेरिकेच्या एका संशोधक तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ‘पीपली लाईव्ह’ या हिंदी चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकी याला दिल्लीच्या न्यायालयाने दोषी ठरवले.
  • शिक्षेबाबतच्या युक्तिवादासाठी न्यायालयाने २ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला  किमान ७ वर्षे सक्तमजुरी व कमाल जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
  • २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या पिपली लाइव्ह या चित्रपटाचे फारुकी याने सह दिग्दर्शन व लेखन केले होते.

चालू घडामोडी : ३० जुलै

गुजरातमध्ये मोटारी आणि लहान वाहनांना टोलमुक्ती

  • येत्या १५ ऑगस्टपासून गुजरातमधील मोटारी आणि लहान वाहनांना टोलपासून मुक्ती मिळणार असून गुजरात सरकारने करमुक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • गुजरातमध्ये टोलमुक्ती जाहीर झाल्याने आता महाराष्ट्रात टोलमुक्ती होणार की नाही? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
  • राज्य सरकारने महाराष्ट्रातील १२ टोलनाके कायमचे बंद आणि ५३ टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलमुक्ती करण्यात आलेली नाही.

अ‍ॅक्सिस बँक आणि एलआयसीदरम्यान सामंजस्य करार

  • आयुर्विमा योजनांच्या विक्रीसाठी खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅक्सिस बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्यादरम्यान सामंजस्य करार झाला.
  • बँका आणि विमा कंपन्यांतील आजवरचे हे सर्वात मोठे बँक अश्युरन्स सामंजस्य मानले जात आहे.
  • देशभरात ३,००० हून अधिक शाखा व विस्तार कक्ष असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेचा गेली पाच वर्षे आयुर्विमा पॉलिसींच्या विक्रीचा व्यवसाय दरसाल २५ टक्के दराने वाढत आहे.

भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणुकीच्या  मर्यादेत वाढ

  • केंद्र सरकारने विदेशी बँका, विमा कंपन्या, शेअर बाजार आणि वस्तू बाजार (कमॉडिटी एक्सचेंज) यांना भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणुकीची मर्यादा ५ टक्क्यांनी वाढवून १५ टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला.
  • याबरोबरच विदेशी गुंतवणूकदारांना प्रारंभिक प्रस्तावात (आयपीओ) तसेच दुय्यम बाजारांतही समभाग खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • या निर्णयांनी भारतीय बाजारांची जगाच्या अन्य बाजारांसोबतची स्पर्धा क्षमता वाढणार आहे.
  • आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील प्रचलन याचा अंगीकार करण्यासही बाजारास मदत होणार आहे.
  • याचा एकत्रित परिणाम म्हणून भारताच्या देशांतर्गत भांडवली बाजाराची एकूण वृद्धी आणि विकास होईल.
  • अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पातच या निर्णयाची घोषणा केली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

बँकांची ३० टक्के एटीएम अकार्यक्षम

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून स्थापित ३० टक्के तर खासगी क्षेत्रातील बँकांशी संलग्न १० टक्के एटीएम हे कार्यक्षम नसल्याचे रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
  • नोटा नाहीत अथवा तांत्रिक बिघाडामुळे एटीएम केंद्रे बंद असल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
  • रिझर्व्ह बँकेने बडी महानगरे तसेच शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण ४,००० एटीएम केंद्रांचा प्रातिनिधिक नमुना घेऊन हे सर्वेक्षण पार पाडले.
  • एटीएम यंत्रातील तांत्रिक बिघाड या मुख्य कारणासह, नेटवर्क उपलब्ध नसणे, वीज पुरवठा खंडित होणे, यंत्रात नोटाच नसणे अशी एटीएम केंद्रे बंद राहण्याची कारणे आहेत.
  • देशात मे २०१६ अखेर २,१४,२७१ एटीएम कार्यरत आहेत. यापैकी १,०२,७७९ इतके ऑन-साइट म्हणजे बँकांच्या शाखांना लागून एटीएम आहेत. तर शाखांपासून दूर अलिप्तपणे कार्यरत असणाऱ्या एटीएमची संख्या १,११,४९२ आहे.

जर्मनीचा बॅस्टिअन श्वेईनस्टायगर निवृत्त

  • गेल्या दशकभराहून अधिक काळ जर्मनीच्या संघाचा आधारस्तंभ आणि संस्मरणीय विजयांचा शिल्पकार बॅस्टिअन श्वेईनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
  • ३१ वर्षीय बॅस्टिअनने १२० सामन्यांत जर्मनीचे प्रतिनिधित्त्व केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत असताना बॅस्टिअन मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळत राहणार आहे.
  • ब्राझीलमधील रिओ येथे झालेल्या २०१४ विश्वचषकात अर्जेटिनाविरुद्धच्या लढतीत बॅस्टिअनने केलेला गोल निर्णायक ठरला होता.
  • चेंडू टॅकल करण्याची अनोखी शैली, चेंडू सोपवण्याची सुरेख पद्धत, चिवटपणे झुंज देण्याची वृत्ती यासाठी बॅस्टिअन ओळखला जातो.

चालू घडामोडी : २९ जुलै

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य

  • जळगावची केळी, मराठवाड्यातील केसर आंबा, भिवापूर (नंदुरबार) मिरची, डहाणू घोलवडचा (पालघर) चिकू आणि आंबेमोहर (पुणे) तांदळास भौगोलिक निर्देशांक मिळाले आहेत.
  • यापूर्वी महाराष्ट्रातील १८ शेतमालास जीआय मिळाले असून, एकूण २३ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य ठरले आहे. 
जीआय मिळालेली महाराष्ट्रातील कृषी उत्पादने
जळगावची केळी मराठवाड्यातील केसर आंबा भिवापूर (नंदुरबार) मिरची
डहाणू घोलवडचा चिकू आंबेमोहर (पुणे) तांदूळ सोलापुरी डाळिंब
नाशिकची द्राक्ष वायगावची हळद मंगळवेढ्याची ज्वारी
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा कोकम कोरेगावचा वाघ्या घेवडा नवापूरची तूरडाळ
वेंगुर्ल्याचा काजू लासलगावचा कांदा सांगलीचे बेदाणे
बीडची सीताफळे जालन्याची मोसंबी जळगावची भरताची वांगी
पुरंदरचे अंजीर कोल्हापूरचा गूळ महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी
नागपूरची संत्री आजऱ्याचा घनसाळ तांदूळ

 भौगोलिक उपदर्शन म्हणजे काय? 
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक उपदर्शन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी व पेटंटची मान्यता दिली जाते, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते. 
  • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१ साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यू.टी.ओ.) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • मानांकनाचे फायदे 
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी 
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख 
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव

गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तान दौऱ्यावर जाणार

  • ‘सार्क‘ समूहाच्या अंतर्गत सुरक्षा किंवा गृहमंत्र्यांच्या इस्लामाबाद येथे ३ व ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
  • ही बहुस्तरीय आणि बहुपक्षीय परिषद असल्याने त्या दौऱ्यात भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित नाही. 

प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे निधन

  • बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे २७ जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वाराणसी येथे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
  • लच्छू महाराज यांचे खरे नाव लक्ष्मीनारायण सिंग असे होते.
  • ख्यातनाम तबलावादक असलेले वडील वासुदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी तबला शिकणे सुरू केले आणि त्यात प्रावीण्य मिळवले.
  • बनारसी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या लच्छू महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते, मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा कुठलाही पुरस्कार मोठा नसल्याचे सांगून त्यांनी तो नाकारला होता.

चालू घडामोडी : २८ जुलै

अमेरिकेकडून पी ८ आय या लढाऊ विमानांच्या खरेदी

  • भारताने अमेरिकेसोबत चार पोसायडन ८आय (पी ८आय) या लांब पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक अब्ज डॉलरचा करार केला.
  • गेल्या दहा वर्षांत भारताने संरक्षण सामग्रीसाठी केवळ अमेरिकेसोबत १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. 
  • याआधी २००९ मध्ये २.१ अब्ज डॉर्लसना खरेदी केलेली अशी आठ लढाऊ विमाने मे २०१३ आणि ऑक्टोबर २०१५ मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती.
  • पोसायडन ८आय १२०० मैलांपर्यंत मारा करू शकणार आहे. समुद्री निरीक्षण व गुप्तचर तपास मिशन अशा महत्त्वाच्या मोहिमांवर याचा उपयोग होणार आहे.
  • हारपून ब्लॉक क्षेपणास्त्राने सज्ज असणारी ही विमाने टेहळणी बरोबरच शत्रूच्या पाणबुडयांनाही लक्ष्य करु शकतात.
  • २२ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या एएन-३२ या विमानाच्या शोधासाठीही या विमानांची मदत घेण्यात येत आहे.
  • सध्या नौदलात पी ८आयएस हे लढाऊ विमान हार्पन ब्लॉक २ मिसाईलसह सज्ज आहे. याचसोबत एमके-५४ लाइटवेट पाणबुड्या, रॉकेट आदींचा समावेश आहे.
  • तसेच समुद्रावर लक्ष्य करण्यासाठी ‘इंटेलिजंट हॉक आय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे. 

ज्येष्ठ लेखिका महाश्वेता देवी यांचे निधन

  • ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी (वय ९०) यांचे २८ जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय पद्मविभूषण, मॅगसेस पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • महाश्वेता देवी यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यामध्ये झाला. नंतर महाश्वेता देवी यांचे संपूर्ण कुटुंब पश्चिम बंगालमध्ये येऊन स्थायिक झाले.
  • कोलकाता विद्यपीठातून इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यावर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून नोकरी केली.
  • महाश्वेता देवी यांनी विविध बंगाली मासिकांमधून तरुण वयातच लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. ‘झाँशी की रानी’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.
  • महाश्वेता देवी यांचे लघुकथेचे २० संग्रह, त्याचबरोबर बंगाली भाषेत १०० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • ‘झाँसी की रानी’, ‘हजार चौराशिर माँ’, ‘रुदाली’ या त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर आधारित चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
  • महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित म्हादू हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा कोरकू या मागासलेल्या जमातीवर बेतलेली होती.
  • महाश्वेतादेवी लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या होत्या. भारताच्या वेगवेगळया समाजातील कमकुवत घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य केले.
  • त्यांच्या या साहित्यीक योगदानासाठी १९९६ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर पुढच्याच वर्षी मॅगसेसे पुरस्कारही त्यांना मिळाला. हे दोन्ही पुरस्कार पटकाविणाऱ्या त्या एकमेव व्यक्ती आहेत.

बेनामी व्यवहार सुधारणा विधेयक मंजुर

  • काळ्या पैशावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून लोकसभेमध्ये सर्वसमावेशक बेनामी व्यवहार सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
  • बेनामी व्यवहार (मनाई) सुधारणा विधेयक २०१५ लोकसभेमध्ये मांडताना अर्थमंत्री जेटली म्हणाले की, हे विधेयक प्रामुख्याने काळ्या पैशाविरोधातील एक उपाय आहे.
  • या कायद्याचा उद्देश बेनामी मालमत्ता जप्त करणे आणि संबंधित गुन्हेगारांवर खटला चालवणे हा आहे.
  • बेहिशेबी उत्पन्न मिळवणारे असंख्य लोक काल्पनिक नावांवर बेनामी मालमत्ता खरेदी करतात. अशा व्यवहारांना चाप लावणे आवश्यक आहे.

अमृतलाल मकवाना यांच्याकडून पुरस्कार वापसी

  • गुजरातमधील उना येथे दलित नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दलित लेखक अमृतलाल मकवाना यांनी गुजरात सरकारकडे पुरस्कार परत केले आहेत.
  • मकवाना यांना २०१२-१३ मध्ये ‘खरापत नू दलित लोकसाहित्य’ याबद्दल देसी जीवन श्रेष्ठ दलित साहित्य कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • मकवाना यांनी उना येथील घटनेच्या निषेधार्थ या पुरस्कारासह मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कमही अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केली आहे.
  • उना येथे चार दलित नागरिकांना गायीची कातडी काढल्यामुळे जबर मारहाण करण्यात आली होती.

चालू घडामोडी : २७ जुलै

रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०१६

  • सामाजिक कार्यकर्ते बी. विल्सन आणि संगीतकार टी.एम.कृष्णा या दोन भारतीयांना आशिया खंडातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा २०१६ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे.
    Bezwada Wilson and T M Krishna
 टी. एम. कृष्णा 
  • चेन्नईचे टी. एम. कृष्णा यांना संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • कर्नाटकी संगीताचे पुरस्कर्ते असलेल्या कृष्णा यांनी संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक सर्वसमावेशकता व सामाजिक समरसता वाढवण्याचा प्रयत्न केला.
  • एका वर्गापुरते बंदिस्त असलेले शास्त्रीय संगीत दलितांसह इतर वर्गांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कृष्णा यांनी केला. त्यांच्या या कामाची दखल मॅगसेसे फाउंडेशनने घेतली आहे.
 बेझवाडा विल्सन 
  • बेझवाडा विल्सन हे मूळचे कर्नाटकमधील असून दलित कुटुंबात जन्मले आहेत. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी ते सातत्याने लढत असतात.
  • त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी मैला साफ करणाऱ्या दलित, अस्पृश्य कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद केला.
  • कायद्याने मानवी मैला डोक्यावर वाहून नेण्यासाठी बंदी असताना सरकारकडूनच याचे उल्लंघन होत असल्याची बाब विल्सन यांनी उघड केली होती.
  • मानवी प्रतिष्ठेच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला.
 इतर पुरस्कार विजेते 
  • फिलिपिन्समधील कोकिंथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियातील डॉम्पेट दुआफा यांनाही हा सन्मान जाहीर झाला आहे.
  • लोकांच्या मनात कायद्याप्रती विश्वास निर्माण केल्याबद्दल कारपिओ-मोरालेस यांना सन्मानित केले जाणार आहे.
  • तर मुस्लिमांमधील धार्मिक कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जकात’मध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलाबद्दल दुआफा यांचा गौरव केला जाईल.
  • संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या लाओस येथील ‘व्हिएतियन रेस्क्यु’ आणि ‘जपान ओव्हरसीज कोऑपरेशन’या दोन संस्थांनादेखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 रॅमन मॅगसेसे पुरस्कार 
  • आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे ॲवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो.
  • फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
  • सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • आतापर्यंत विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अरूणा रॉय यांसारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

इरोम शर्मिला निवडणूक लढविणार

  • ईशान्य भारतात लागू असलेला अफ्स्पा कायदा हटविण्याची मागणी करत मागील १६ वर्षांपासून उपोषण करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला या ९ ऑगस्टला उपोषण सोडणार आहेत.
  • आपल्या लढ्याला वेगळे वळण देत २०१७मध्ये मणिपूरमध्ये होणारी विधानसभा निवडणूकही लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
  • उपोषण करून आत्महत्या केल्याच्या आरोपावरून गेल्या काही वर्षांत शर्मिला यांना अनेकदा अटक होऊन सुटकाही झाली आहे. दर पंधरा दिवसांनी शर्मिला यांना न्यायालयात हजेरी द्यावी लागते.
  • उपोषणाच्या मार्गाने ‘अफ्स्पा’ हटवून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे शर्मिला यांचे म्हणणे आहे.
  • पुढील वर्षी मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार आहेत. 
 अफ्स्पा 
  • १९५८मध्ये आर्म्ड फोर्सेस (स्पेशल पॉवर) ॲक्ट (अफ्स्पा) संमत केला गेला. हा कायदा ईशान्येतील सात राज्यांसह आणि जम्मू-काश्मीरमध्ये लागू आहे.
  • या कायद्यांतर्गत लष्कराला विशेषाधिकार मिळून ते कोणत्याही घराची झडती घेऊन संशयावरून व्यक्तीला अटक करू शकतात.
  • दहशतवाद आणि बंडखोरी मोडून काढण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.
  • मात्र, हा कायदा नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात असल्याचे सांगत शर्मिला यांनी ४ नोव्हेंबर २०००पासून उपोषण सुरू केले आहे.
 मणिपूरची लोहमहिला 
  • पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ उपोषण करून जगातील सर्वाधिक उपोषण करणारी व्यक्ती ठरलेल्या इरोम चानू शर्मिलाला ‘मणिपूरची लोहमहिला’ संबोधले जाते.
  • त्यांचा जन्म १४ मार्च १९७२ रोजी झाला. नागरी हक्कांसाठीची लढवय्यी, राजकीय कार्यकर्ती, कवी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.
  • त्यांना मानवी हक्कासाठीच्या आशियाई मानवी हक्क आयोग, ऍमनेस्टी इंटरनॅशनलच्या पारितोषिकांनी गौरवले आहे. 
  • २०१४मधील निवडणुकीत देऊ केलेली उमेदवारीही त्यांनी नाकारली होती.

बालकामगार प्रतिबंध विधेयक मंजूर

  • कुठल्याही उद्योग-व्यवसायात १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवल्यास संबंधित उद्योग-व्यवसायाच्या मालकास यापुढे दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार आहे.
  • मात्र, १४ वर्षांखालील मुलांनी कौटुंबिक उद्योग-व्यवसायात मदत केल्यास ती कृती शिक्षेच्या कक्षेत येणार नाही. 
  • १४ वर्षांखालील मुलांना कामावर जुंपणे हा दखलपात्र गुन्हा ठरवणारे ‘बालकामगार प्रतिबंध व नियंत्रण दुरुस्ती विधेयक’ लोकसभेने २६ जुलै रोजी मंजूर केले.
  • यामध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना धोकादायक क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत कामावर ठेवण्यासही बंदी घातली आहे.
  • नियमभंग करणाऱ्यांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा २० हजार ते ५० हजार रु. दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाचवेळी होतील.
  • मात्र, १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास सरसकट बंदी घालून केंद्र सरकारने दोन पावले पुढे टाकली असली तरी ‘कौटुंबिक उद्योगा’तील कामाची मुभा देऊन त्यांचे पाय पुन्हा एकदा 'मजुरीत' अडकवले आहेत.
  • शाळेच्या वेळेआधी आणि नंतर कुटुंबातील उद्योगात काम करण्याची मुभा मुलांना देण्यात आली असून, त्यासाठी 'धोकादायक'ची अटही नाही. 

चिरंतन विकास निर्देशांकात भारत ११०वा

  • चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११०वे आहे. स्वीडन जगात सर्वोच्च स्थानी आहे.
  • चिरंतन विकास समाधान नेटवर्क (एसडीएसएन) आणि बर्टल्समॅन स्टिफगंग यांनी संयुक्तरीत्या ‘चिरंतन विकास निर्देशांक’ सादर केला आहे.
  • या क्षेत्रात प्रत्येक देशाने केलेली प्रगती आणि उत्तरदायित्व निश्चित करणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे.
  • १४९ देशांची आकडेवारी तपासून हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. २०१६मधील कामगिरीचा आढावा त्यात घेण्यात आला आहे.
  • जागतिक पातळीवर १७ उद्दिष्टांना श्रेणी देऊन विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. या उद्दिष्टांत आर्थिक विकास, सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणपूरकता आदींचा समावेश आहे.
  • या यादीत स्वीडन पहिल्या स्थानावर असून, दुसऱ्या स्थानी डेन्मार्क आणि तिसऱ्या स्थानी नॉर्वे हे देश आहेत.
  • जर्मनी ६व्या स्थानी, ब्रिटन १०व्या स्थानी आहे. अमेरिका २५व्या स्थानावर, रशिया ४७ व्या, तर चीन ७६व्या स्थानावर आहे. 
  • भारत ११०व्या स्थानी, पाकिस्तान ११५व्या स्थानी, म्यानमार ११७व्या स्थानी, बांगलादेश ११८व्या स्थानी, तर अफगाणिस्तान १३९व्या स्थानी आहे.
  • गरीब आणि विकसनशील देश या निर्देशांकात सर्वांत खालच्या पातळीवर आहेत. सर्वांत शेवटच्या स्थानावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि लायबेरिया हे देश आहेत.

‘सोलर इम्पल्स-२’ची जगप्रदक्षिणा पूर्ण

  • सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलर इम्पल्स-२ या विमानाने २७ जुलै रोजी इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • मागील वर्षी ९ मार्च रोजी या विमानाने उड्डाण करताच संपूर्ण जगाचे लक्ष आकाशाकडे लागले होते. अपारंपरिक ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला होता. 
  • सोलर इम्पल्स-२चा प्रवास १७ टप्प्यांत झाला. या विमानाने जवळपास ४२ हजार किलोमीटरचे अंतर पार करत चार खंड, तीन समुद्र आणि दोन महासागरांना गवसणी घातली.
  • या विमानाने जपानमधील नागोया ते हवाईदरम्यानचे ८,९२४ किमी अंतर ११८ तासांत पूर्ण केले. यामुळे वैमानिक आंद्रे बोर्शबर्ग यांच्या नावे सर्वाधिक काळ ‘सोलो फ्लाइट’चा विक्रम नोंदविला गेला. 
  • पिक्कार्ड आणि बोर्शबर्ग हे दशकभरापेक्षाही अधिक काळपासून ‘सोलर इम्पल्स’च्या प्रकल्पावर काम करत होते. या अनोख्या प्रवासामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात १९ विश्वविक्रमांची नोंद झाली.
  • हे विमान मोटारीपेक्षा जास्त जड नसून त्याचे पंख मात्र बोईंग ७४७ विमानाएवढे आहेत. त्याला चार इंजिने असून त्याच्या पंखात १७००० सौर घट बसवलेले आहेत.
  • ताशी ८० किलोमीटर वेगाने हे विमान जाते. त्यात वैमानिक श्वसनासाठी ऑक्सिजन टाकीचा वापर करतात.
  • सोलर इम्पल्स-२ बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘व्हेरिझॉन’कडून ‘याहू’चे अधिग्रहण

  • अमेरिकेची व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनी ४.८३ अब्ज डॉलर्स मोजून इंटरनेट विश्वातील महत्त्वाची कंपनी असलेली ‘याहू’ची खरेदी करणार आहे.
  • त्याद्वारे डिजिटल जाहिरात आणि माध्यम व्यवसायात मोठी वाढ होण्याची आशा व्हेरिझॉन कम्युनिकेशन्सने व्यक्त केली आहे.
  • व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनीने गेल्या वर्षी ‘एओएल’ची ४.४ अब्ज डॉलर्सना खरेदी केली होती. ‘एओएल’च्या इंटरनेट व्यवसायाला चालना देण्यासाठी याहू आणि एओएल यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
  • व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स आणि याहू यांचा हा व्यवहार २०१७च्या सुरुवातीला पूर्ण होईल. या व्यवहाराला समभागधारक आणि नियामक संस्थेची मंजुरी मिळेपर्यंत याहू ही स्वतंत्र कंपनी म्हणून कायम राहील.
  • याहूच्या खरेदीसाठी एटी अ‍ॅण्ड टी कंपनी, टीपीजी कॅपिटल आणि अन्य कंपन्या उत्सुक होत्या. मात्र व्हेरिझॉनने या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत याहूच्या खरेदीवर शिक्कामोर्तब केले.
  • याहूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी : मेरिसा मेयर

एचडीएफसी बँक व बँक ऑफ बडोदाला दंड

  • ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) अंतर्गत कायदेशीर बाबींची पूर्तता न केले प्रकरणात रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला २ कोटी तर बँक ऑफ बडोदाला ५ कोटी रुपयांचा दंड जाहीर झाला आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदातील ६,१०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर, बँकेच्या ताळेबंदाचा हिशेब केल्यानंतर बँकेवर ५ कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली आहे.
  • ‘केवायसी’चे पालन न होता अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. याबाबत खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांना याबाबत रिझर्व्ह बँकेने सूचित केले होते.

हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार

  • डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे.
  • हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध दर्शवला होता. परंतु नंतर त्यांचा विरोध मावळला.
  • हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री होत्या. अमेरिकेतल्या प्रभावी व्यक्तीमत्वांपैकी त्या एक आहेत. जगातील प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
  • नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन विरूद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी चुरस रंगणार आहे.

चालू घडामोडी : २६ जुलै

दिनविशेष : कारगिल विजय दिवस

आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांना विमा संरक्षण

  • ऑनलाइन तिकिट बुकिंग करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आयआरसीटीसी १ रुपयात १० लाख रुपयांच्या विम्याचे कवच देणार आहे.
  • यासाठी आयआरसीटीसीने तीन विमा कंपन्यासोबत करार केला असून या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या १ सप्टेंबरपासून मिळणार आहे. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना तिकिटाऐवजी एक रुपया अतिरिक्त द्यावा लागणार आहे. ऑनलाइन तिकिट बुकिंग केल्यानंतर प्रवाशाला या योजनेचा लाभ घ्यायचा की नाही असे दोन पर्याय असतील.
  • या योजनेंतर्गत जर प्रवाशांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू, हिंसेत मृत्यू, चोरट्यांच्या हल्ल्यात मृत्यू, तसेच चढताना किंवा उतरताना अपघातात मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ प्रवाशांना मिळू शकणार आहे. 
  • रेल्वे अपघातात जर पूर्णतः अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपये, तर जखमी झाल्यास उपचारासाठी २ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.
  • आयआरसीटीसीने या योजनेसाठी रॉयल सुंदरम, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इश्योंरेंस आणि श्रीराम जनरल इंश्योंरेंस कंपनीची निवड केली आहे.

काश्मीरमधील संचारबंदी समाप्त

  • हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वणी याला ठार केल्यावर उसळलेल्या हिंसाचारावर काबू मिळविण्यासाठी काश्मीरच्या विविध भागांत लागू केलेली संचारबंदी सतराव्या दिवशी उठविण्यात आली.
  • गेले काही दिवस बंद असलेली श्रीनगर मुझफ्फराबाद बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. पाकिस्तान आणिभारत यांच्यात एप्रिल २००५पासून ही बससेवा सुरू करण्यात आली होती.
  • बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात आतापर्यंत ४०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
  • वणी लष्कराशी उडालेल्या धुमश्चक्रीत ठार झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरातील फुटीरतावादी संघटनांनी नऊ जुलैपासून बंद पुकारला आहे.
  • फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स (एचसी) संघटनेचे अध्यक्ष सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 
  • हुरियत कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दोन संघटनांनी ‘अनंतनाग चलो’ची हाक दिली होती. या सभेला जाण्यासाठी गिलानी घराबाहेर पडताच पोलिसांनी त्याला अटक केली.
  • किश्तवार येथे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळाफेकपटू इंदरजीत सिंग उत्तेजक सेवनात दोषी

  • रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय खेळाडू व गोळाफेक प्रकारातील आशियाई विजेता इंदरजीत सिंग उत्तेजक सेवनात दोषी ठरला आहे.
  • राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) २२ जून रोजी इंदरजीतच्या नमुन्याची चाचणी घेतली होती. त्यापैकी ‘अ’ नमुन्यात तो दोषी आढळला. यामुळे त्याच्या रिओला जाण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • ‘नाडा’ने इंदरजीतला येत्या काही दिवसांत ‘ब’ नमुन्याची चाचणी करण्यास सांगितले आहे. त्यातही तो दोषी आढळला, तर जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या (वाडा) नवीन नियमानुसार त्याच्यावर चार वर्षांची बंदी येऊ शकते.
  • एशियन चॅम्पिअनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा इंद्रजित सिंह रिओ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला खेळाडू होता.

फ्लिपकार्टच्या ‘मिंत्रा’कडून जबाँगचे अधिग्रहण

  • फ्लिपकार्टचा मालकी हक्क असलेल्या मिंत्रा कंपनीने ऑनलाइन फॅशन संकेतस्थळ जबाँगचे अधिग्रहण आहे.
  • मिंत्रा आणि जबोंगचे एकत्रितपणे सुमारे दीड कोटी युझर्स आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ऑनलाईन मंचावर अनेक बड्या फॅशन ब्रँड्सची उत्पादने उपलब्ध आहेत.
  • २०१२मध्ये सुरू झालेली जबाँग आर्थिक कामगिरी खालावल्याने गेल्या काही काळापासून खरेदीदाराच्या शोधात होती. 
  • जबोंगची खरेदी करण्यासाठी फ्युचर समुह, स्नॅपडील, आदित्य बिर्ला समूह अशा अनेक कंपन्या शर्यतीत होत्या.
  • २०१४मध्ये फ्लिपकार्टने जवळजवळ २००० कोटी रुपयांत मिंत्राची खरेदी केली होती. जबाँगच्या अधिग्रहणाने भारतातील फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रात फ्लिपकार्ट ग्रुप निर्विवादपणे अग्रणी राहाणार आहे.

शरद पवार यांना लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक

  • माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’चे ‘लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक’ जाहीर झाले आहे.
  • लोकमान्य टिळक यांची ९६वी पुण्यतिथी आणि त्यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या सिंहगर्जनेचे शताब्दी वर्ष या निमित्ताने या पारितोषिकाचे वितरण १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
  • पारितोषिकाचे हे ३४वे वर्ष असून एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
  • या आधी इंदिरा गांधी, एस. एम. जोशी, डॉ. शंकरदयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी, डॉ. वर्गिस कुरियन, नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा अशा मान्यवरांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.
  • कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांत देशाची प्रगती घडविण्यात शरद पवार यांनी साकारलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांची यंदाच्या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.

नीता अंबानी यांना ‘वाय’ दर्जाची ‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना सरकारकडून आता ‘वाय’ दर्जाची ‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा देण्यात आली आहे.
  • केंद्रीय सुरक्षा पथकाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात नीता अंबांनी यांना विशेष सुरक्षा देण्याची  शिफारस करण्यात आली होती.
  • मुकेश अंबानी यांना देखील बऱ्याच वर्षांपासून ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी १० सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
  • झेड दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत ४० सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येतात. सीआरपीएफकडून झेड आणि वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते.
  • झेड सुरक्षा ही झेड प्लसनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सुरक्षा आहे. सध्या भारतात ५८ व्हीव्हीआयपी व्यक्तींना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे.

आयटी क्षेत्रात टीसीएस सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी

  • नवी दिल्ली देशातील माहिती तंत्रज्ञान अर्था आयटी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांमध्ये मुंबईस्थित टीसीएस अग्रेसर ठरली आहे.
  • त्याखालोखाल इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो व कॅपेजेमिनी या कंपन्यांचे क्रमांक लागले आहेत. ही माहिती आयटी उद्योगाची संघटना असलेल्या नॅसकॉमने आपल्या निवेदनात दिली आहे. 
  • यापैकी कॉग्निझंट ही अमेरिकास्थित कंपनी असली तरी तिचे सर्वाधिक कर्मचारी भारतात आहेत. चेन्नई, बंगळूरु व हैदराबाद येथे कंपनीची विकासकेंद्रे आहेत.
  • जून २०१६अखेर टीसीएसमध्ये ३.६२ लाख कर्मचारी नोंदवले गेले आहेत. त्याखालोखाल इन्फोसिसमध्ये १.९७ लाख आणि विप्रोमध्ये १.७३ लाख कर्मचारी असल्याचे आढळले आहे.
  • पहिल्या १० कंपन्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजिज, टेक महिंद्र, जेनपॅक्ट, इंटेलनेट ग्लोबल सर्व्हिसेस व एजिज या कंपन्यांचाही समावेश आहे. 

अरुंधती घोष यांचे निधन 

  • अमेरिकेतील भारताच्या माजी राजदूत अरुंधती घोष यांचे निधन झाले.
  • घोष यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला असला, तरी त्यांची जडणघडण मुंबईत झाली.
  • कोलकात्यातील लेडी ब्रेबोर्न महाविद्यालय आणि विश्व-भारती विद्यापीठात शिक्षण झाल्यानंतर १९६३मध्ये त्या भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या होत्या.
  • भारताच्या मुत्सद्दी म्हणून त्यांनी अनेक युरोपीय देशांमध्ये काम केले. यामध्ये ऑस्ट्रिया, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि नेदरलॅंड आदी देशांचा समावेश आहे.
  • जिनिव्हातील अमेरिकेच्या कार्यालयात स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या अधिकारी होत्या. जिनिव्हा येथे आण्विक चाचणीबंदी करारासंबंधी परिषदेत मांडलेल्या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
  • १९९७मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर १९९८ ते २००४ या काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्या म्हणून काम पाहिले होते.

सलमान खानची चिंकारा शिकार आरोपातून मुक्तता

  • अभिनेता सलमान खान याला राजस्थान उच्च न्यायालयाने चिंकारा शिकारप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या दोन आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.
  • सलमान आणि त्याच्या सहकारी कलाकारांनी १९९८मध्ये जोधपूरमध्ये चिंकाराची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल झाले होते.
  • स्थानिक न्यायालयाने या दोन्हीप्रकरणी सलमानला दोषी ठरवत अनुक्रमे एक आणि पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात सलमानने वरिष्ठ न्यायालयात अपील केले होते.
  • दुर्मिळ चिंकाराची शिकार केल्याच्या या प्रकरणात सलमानला २००७मध्ये सात दिवस तुरुंगातही काढावे लागले होते. 
  • चिंकाराच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या सलमान खानच्या बंदुकीतून मारल्या गेल्या नव्हत्या, हा मुद्दा मान्य करत न्यायालयाने सलमानची आरोपातून मुक्तता केली.

चालू घडामोडी : २५ जुलै

ग्रीन रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन

  • पहिल्या ‘ग्रीन रेल्वे कॉरिडॉर’ प्रकल्पाचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उद्घाटन केले. या प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे गाडीतून मानवी मलमूत्र रेल्वे मार्गावर टाकण्याचा प्रकार बंद करण्यात आला आहे.
  • या योजेनेंतर्गत यावर्षी सुमारे ३०,००० जैव-शौचालये (बायो-टॉयलेट) रेल्वे गाड्यांमध्ये बसविण्यात येणार आहेत. रेल्वेच्या सर्वच बोगींमध्ये बायो-टॉयलेट बसविण्याची रेल्वेची योजना आहे.
  • त्यामुळे स्वच्छतेचे प्रमाण वाढण्यास हातभार लावणार असून, रेल्वे रुळांची गंजण्याची समस्याही कमी होणार आहे. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत या रेल्वे मार्गावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

नक्षलवादाविरोधातील सीआरपीएफच्या १३ नवीन तुकड्या

  • नक्षलवादाविरोधातील लढा आणखी बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने राखीव दलाच्या १३ नवीन तुकड्या तयार करण्यास संमती दिली आहे.
  • छत्तीसगड येथे चार, झारखंड, ओडिशा येथे प्रत्येकी तीन, आणि महाराष्ट्रात दोन तुकड्या तयार केल्या जाणार आहेत.
  • या व्यतिरिक्त छत्तीसगडमधील बस्तर येथे सीआरपीएफची एक स्वतंत्र तुकडी तयार केली जाणार असून, यामध्ये ७५ टक्के स्थानिक युवकांना संधी दिली जाणार आहे.
  • या तुकड्यांमध्ये स्थानिक युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे नक्षलवाद्यांसमोर कडवे आव्हान निर्माण होईल. 
  • कित्येकदा भाषा व पुरेशा माहितीअभावी नक्षलवादविरोधी मोहिमा अपयशी ठरतात. स्थानिक युवकांना तेथील भौगोलिक स्थिती व अन्य बाबींचा अंदाज असतो.
  • यामुळे नक्षलवादविरोधी कारवायांना आवर घालण्यासाठी त्यांची मोठी मदत मिळू शकते. तसेच, स्थानिकांना यातून रोजगारही उपलब्ध होईल.

युवा भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक

  • युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले.
  • यापूर्वी २० वर्षांखालील गटात ८४.६९ मीटर अंतरावर भाला फेकण्याचा विक्रम लॅटेवियाच्या जिगिमुंडस सिर्यमसच्या नावावर होता.
  • या विक्रमापेक्षा जवळपास २ मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकत नीरजने नवा विश्वविक्रम रचला आहे.
  • नीरज वरिष्ठ तसेच कनिष्ठ प्रकारात जागतिक विक्रम नावावर करणारा पहिला भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे.
  • तसेच कनिष्ठ गटाच्या जागतिक मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू आहे.
  • जागतिक विक्रम नोंदवतानाच नीरजने वरिष्ठ प्रकारात राजिंदर सिंग यांचा ८२.२३ मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रमही मोडला. 
  • सीमा पुनियाने २००० साली २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत थाळी फेकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने तिचे पदक काढून घेण्यात आले होते.
  • रिओ ऑलिम्पिकसाठी नीरज पात्र ठरू शकला नाही, मात्र या कामगिरीमुळे यंदाच्या हंगामातील वरिष्ठ गटातील सर्वोत्तम आठ कामगिरींमध्ये नीरजच्या प्रदर्शनाचा समावेश झाला आहे.
  • रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भालाफेकीत निर्धारित अंतर ८३ मीटर होते. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची शेवटची तारीख ११ जुलै असल्याने नीरजची संधी हुकली.

के. पी. ओली यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

  • अल्पमतात आल्याने अडचणीत सापडलेले नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच २५ जुलै रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
  • नेते प्रचंड यांच्या सीपीएन-माओवादी पक्षाने आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर केला होता.
  • त्यांनी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी कॉंग्रेसने ओली यांच्याविरोधात संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला होता. मागील दोन दिवसांपासून या ठरावावर चर्चा सुरू होती.
  • मधेशी पीपल्स राइट फोरम आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या दोन सहकारी पक्षांनी या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओली नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
  • बहुमतासाठी २९९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असताना ओली यांच्याकडे केवळ १७५ सदस्यांचेच पाठबळ असल्याने हा अविश्वासदर्शक ठराव मंजूरच झाला असता. 
  • राजीनामा देण्यापूर्वी ओली यांच्या मंत्रिमंडळाने देशात कलम ३०५ लागू करावे, अशी शिफारस अध्यक्षा भंडारी यांच्याकडे केली होती. यानुसार, नवे सरकार स्थापण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचा अधिकार अध्यक्षांना मिळतो.
  • के. पी. ओली यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर नेपाळमध्ये गेल्या दहा वर्षांत सत्तेवर आलेले हे आठवे सरकार होते.
  • गेल्या वर्षी आधी भूकंप आणि नंतर मधेशी आंदोलन यामुळे हे सरकार आधीच अडचणीत सापडले होते.
  • नेपाळने नवी राज्यघटना स्वीकारल्यानंतर मधेशी यांनी यातील तरतुदींविरोधात सुमारे पाच महिने आंदोलन केले होते. 
  • आता सहकारी पक्षांनी पाठिंबा काढल्याने नऊ महिन्यांतच राजीनामा देण्याची वेळ या सरकारवर आल्याने नेपाळ पुन्हा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आला आहे.

भगवंत मान तात्पुरते निलंबित

  • लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आम आदमी पक्षाचे लोकसभेतील खासदार भगवंत मान यांना सत्र संपत नाही तोपर्यंत संसदेत उपस्थित राहू नये अशी सूचना केली आहे.
  • आपल्या मोबाईलच्या माध्यमातून संसदेच्या आवारातील दृश्ये त्यांनी फेसबुकवर लाईव्ह केली होती. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते.
  • या सर्व प्रकारामुळे २२ जुलै रोजी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.
  • हा प्रकार संसदेच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्यामुळे मान यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी सर्व पक्षांनी मागणी केली होती.
  • त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल पुढच्या महिन्यात सादर करण्यात येणार आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

फराज हुसैनचा ट्यूनिशियाकडून विशेष सन्मान

  • बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता मित्रांचे प्राण वाचवणारा फराज हुसैन हा २० वर्षीय विद्यार्थी मानवतेचे उदाहरण बनला आहे.
  • मानवतेसाठी शहीद झालेल्या या अमर सैनिकाचे बलिदान लक्षात घेत उत्तर आफ्रिकेतील ट्यूनिशियाच्या ‘गार्डन ऑफ रायटस वर्ल्डवाइड’तर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे.
 द गार्डन ऑफ रायटस वर्ल्डवाइड 
  • ‘द गार्डन ऑफ रायटस वर्ल्डवाइड’ ही इटलीतील मिलानमधील एक ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालणारी संघटना आहे. 
  • या संघटनेने जगभरात अनेक ठिकाणी आपल्या शाखा स्थापन केल्या आहेत. ट्यूनिशियाची राजधानी ट्यूनिश येथील शाखेचे गेल्यावर्षी जुलैमध्ये उद्घाटन करण्यात आले होते.
  • ट्यूनिश मधील इटलीच्या दूतावासातील ही मानवतेसाठी काम करणाऱ्या अरबी आणि मुस्लिम लोकांसाठी वाहिलेली संघटना आहे.
  • जे लोक इतरांचा जीव वाचवतात अशा परोपकारी लोकांसाठी वापरण्यात येणारी ‘रायटस’ (सदाचारी) ही संकल्पना आहे. 
  • ‘रायटस’ ही संकल्पना बायबलवर आधारित आहे. ‘जे इतरांचा जीव वाचवतात ते संपूर्ण जगालाच वाचवतात’, असा या संकल्पनेचा बायबलप्रणित अर्थ आहे.

भाजप आमदार टुन्ना पांडे निलंबित

  • धावत्या गाडीत एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी भाजपने आमदार टुन्ना पांडे याला निलंबित केले आहे.
  • आपल्याच पक्षाच्या विधान परिषद सदस्यावर कारवाई करताना भाजपने पांडे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 
  • पांडे पूर्वांचल एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांनी एका मुलीची छेड काढत तिच्याशी गैरवर्तन केले. हाजीपूर पोलिसांनी पांडे याना अटक केली असून, पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे.
  • टुन्ना पांडे याची ओळख दारू माफिया अशी आहे. उत्तर प्रदेशात त्यांचा दारूचा मोठा व्यवसाय आहे, बिहारमध्ये दारूबंदी झाल्यानंतर अन्य राज्यांत त्यांनी व्यवसाय वाढवला आहे.

चालू घडामोडी : २४ जुलै

सीसीटीएनएस कार्यान्वित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

  • क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस) पूर्णतः कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  • या यंत्रणेमुळे नागरिकांना आता घरबसल्या पोलिस ठाण्यात ऑनलाइन तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी ‘ई-कम्प्लेंट’ हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करण्यात येणार आहे.
  • प्रायोगिक तत्वावर पुणे शहरात सीसीटीएनएसची सुरवात करण्यात येत आहे. त्यातील अडचणी, त्रुटी दूर करून लवकरच ती संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल.
  • नागरिकांना www.mhpolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना आपली ई-तक्रार नोंदविता येईल. 

सय्यद हैदर रझा कालवश

  • विलक्षण प्रतिभेचे धनी असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सय्यद हैदर रझा उर्फ एस.एच. रझा (वय ९४) यांचे २३ जुलै रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 
  • भारतात आधुनिक व बंडखोर विचारांच्या चित्रकलेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रुप’च्या अध्वर्यूंपैकी रझा एक होते.
 रझा यांचा जीवनप्रवास 
  • सय्यद यांचा जन्म सन १९२२मध्ये मध्यप्रदेशमधील मंडला जिल्ह्यातील बाबरिया या ठिकाणी झाला. रझा यांचे वडील वनाधिकारी होते.
  • महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधील नागपूर कला विद्यालयामध्ये १९३९ ते १९४३ मध्ये कलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. 
  • पुढील कलेच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील जे. जे. कला विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. मुंबईमध्ये त्यांनी १९४३ ते १९४७ या काळात शिक्षण घेतले.
  • त्यानंतर त्यांनी पॅरिसमध्ये पुढील चित्रकला शिक्षण घेतले. त्यांनी जवळपास ६० वर्षे फ्रान्समध्ये वास्तव्य केले. युरोपमध्ये भ्रमंती केल्यावर सन २०११ मध्ये ते भारतात परतले. 
  • १९८३ साली ललित कला अकादमीमध्ये रझा यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. भारत सरकारने  १९८१ मध्ये पद्मश्री तर २००७ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांच्या कलेचा गौरव केला होता.
  • २०१० साली भारताचे आधुनिक आणि सर्वाधिक महागडे कलाकार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. सौराष्ट्र नावाच्या त्यांच्या चित्र संग्रहाला १६.४२ कोटी एवढी किंमत मिळाली होती.

काबुलमध्ये दहशतवादी हल्ला

  • अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहरातील मध्यवर्ती भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ८० जण ठार, तर २३१ जण जखमी झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
  • काबुलमधील देह मझांग चौकात हजारा समूदायाचे लोक आंदोलन करत होते. तेव्हा ३ आत्मघाती हल्लेखोरांनी स्वतःला उडवून घेतले.
 ‘तुतॉप पॉवरलाइन’चा तिढा 
  • तुर्कमेनिस्तानहून काबुलला जोडण्यात येणारी ५०० किलोव्हॅटची ‘तुतॉप पॉवरलाइन’ बामियान प्रांतातून अन्यत्र हलविण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात हजारा शिया समूदायातील लोक आंदोलन करत होते.
  • तुतॉप पॉवरलाइन तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तानसह ऊर्जा संकटास सामोरे जाणाऱ्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या मध्य आशियाई देशांना जोडणार आहे.
  • ही पॉवरलाइन अफगाणिस्तानच्या मध्य प्रांतातून जाणार होती; पण नंतर सरकारने ती सलांग या डोंगराळ भागातून नेण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
 हजारा कोण? 
  • पर्शियन भाषा बोलणाऱ्या शिया हजारा समुदायातील लोकांची संख्या नऊ टक्के एवढी असून अफगाणिस्तानातील तो तिसरा सर्वांत मोठा समुदाय म्हणून ओळखला जातो.
  • हजारांना अफगाणिस्तानात पूर्वीपासून दुय्यम स्थान देण्यात आले असून तालिबानींच्या राजवटीमध्ये हजारो शिया हजारांना ठार मारण्यात आले होते. त्यामुळे या समुदायात असुरक्षिततेची भावना दिसून येते.

२९ वर्षांच्या सेवेनंतर आयएनएस विराट निवृत्त

  • जगातील सर्वांत जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ‘गिनिज बुक’मध्ये नोंद असलेली ‘आयएनएस विराट’ २९ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे.
  • नौदलात विराट कामगिरी बजावलेल्या या युद्धनौकेवरील सगळा भार आता २०१३मध्ये नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर गेला आहे.
  • विशाखापट्टणम येथे याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमध्ये भाग घेतल्यानंतर विराट नौदलाच्या पश्चिम विभागाच्या गोदीत नांगर टाकून उभी होती.
  • कोचिन शिपयार्डमध्ये तिच्यात काही महत्त्वाची दुरुस्ती करून नंतर ती वर्षाच्या अखेरीस पुन्हा मुंबईत आणली जाईल आणि तिला समारंभपूर्वक निवृत्त केले जाईल.
  • व्हाईट टायगर म्हणून नावाजली गेलेली ‘सी हॅरिअर फायटर एअरक्राफ्ट’ या युद्धनौकेवर होती. गोव्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनाही निवृत्ती देण्यात आली. 
  • भारतीय नौदलात १२ मे १९८७ मध्ये दाखल झालेली ‘आयएनएस विराट’ त्या वेळी देशातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती.
  • २,२५० दिवस गस्तीवर असलेल्या या युद्धनौकेने ५,८८,२८८ समुद्री मैल अंतर प्रवास केला. विराटने संपूर्ण पृथ्वीची २७ वेळा प्रदक्षिणा होईल एवढा जलप्रवास सहा वर्षांत केला.
  • भारतीय नौदलापूर्वी २७ वर्षे तिने युनायटेड किंगडमच्या ‘रॉयल नेव्ही’साठी एचएमएस हर्मेस नावाने कामगिरी बजावली होती. १९८२च्या फाल्कच्या भू अभियानाच्या वेळी रॉयल नेव्हीची ‘फ्लॅगशिप’ म्हणूनही तिने कामगिरी बजावली होती.

तीन चिनी पत्रकारांना देश सोडण्याचा इशारा

  • गुप्तचर खात्याने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेसाठी भारतात काम करणाऱ्या तीन पत्रकारांचा भारतातील मुक्काम वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
  • या तीन पत्रकारांना ३१ जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे. 
  • हे तीन पत्रकार फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांना भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले आहे.
  • वू किआंग, तांग लू आणि मी किआंग या तीन पत्रकारांचा व्हिसा महिनाअखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यांनी उत्तराध‌किारी येईपर्यंत मुक्काम वाढवण्याची परवानगी मागितली होती.

चालू घडामोडी : २३ जुलै

चिलकॉट अहवालात टोनी ब्लेअर यांच्यावर ठपका

  • इराक युद्धातील ब्रिटनच्या सहभागाची चौकशी करणाऱ्या चिलकॉट अहवालात टोनी ब्लेअर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ब्लेअर यांनी जनतेची माफी मागितली आहे. 
  • इराक युद्धाची आणि त्यातील ब्रिटनच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्यावर जनतेचा दबाव वाढत होता.
  • त्याला उत्तर म्हणून १५ जून २००९ रोजी सर जॉन चिलकॉट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. त्या समितीचा अहवाल नुकताच सादर झाला.
 चिलकॉट अहवाल व पार्श्वभूमी 
  • अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराककडे विनाशकारी शस्त्रास्त्रे आहेत, असा कांगावा करत मित्रराष्ट्रांना आपल्यासोबत इराक युद्धात उतरविण्याचा चंग बांधला.
  • त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अमेरिका, ब्रिटन व इतर काही सहकारी देशांनी २० मार्च २००३ रोजी इराकवर हल्ला केला. सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवली व त्यांना फाशी दिली.
  • इराकमध्ये परकी हल्ल्याचा विरोध दीर्घ काळ चालूच राहिला आणि हे युद्ध खूपच लांबले. अमेरिकेने आपले सैन्य इराकमधून काढून घेण्यास २००७-०८मध्ये सुरवात केली आणि ही कार्यवाही डिसेंबर २०११मध्ये पूर्ण झाली.
  • २००३ ते २०१३ या युद्धकाळात सुमारे १.७४ लाख इराकी मृतांमध्ये १.१२ लाख सामान्य नागरिक होते, तर २००३ ते २०१४ या काळात तेथे अमेरिकेचे ४४९१ सैनिक ठार झाले.
  • अशा या इराकी युद्धात तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ब्रिटनला उतरविले. या युद्धातील ब्रिटनच्या सहभागाची तपासणी चिलकॉट अहवाल करतो.
  • या अहवालावर प्रतिक्रिया देताना ब्लेअर यांनी झालेल्या चुकांची कबुली देत ब्रिटिश नागरिकांची माफी मागितली आहे. 
  • चिलकॉट अहवालावर प्रतिक्रिया देताना जॉर्ज बुश यांनी मात्र इराकवर हल्ला करणे योग्यच होते, असे ठामपणे सांगितले. 

फेसबुकच्या ‘ऍक्विला’ ड्रोनचे यशस्वी उड्डाण

  • फेसबुकच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘ऍक्विला’ या ड्रोनने २१ जुलै रोजी यशस्वी उड्डाण केले.
  • ऍरिजोनातील युमा येथे चाचणीसाठी करण्यात आलेल्या या उड्डाणावेळी ऍक्विला १००० फुटांपर्यंत सुमारे ९६ मिनिटे उडत होते.
  • या ड्रोनमुले जगभर इंटरनेट पोचविणे शक्य होणार आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागांत इंटरनेट पोचविण्यात याचा मोठा फायदा होणार आहे.
 ‘ऍक्विला’ची वैशिष्ट्ये 
  • ऍक्विलाची निर्मिती ब्रिटनच्या फेसबुक एरोस्पेस चमूने केली आहे. याचे पंख बोइंग-७३७ या विमानाएवढे मोठे म्हणजेच १४० फूट लांब आहेत 
  • संपूर्ण कार्बन फायबरपासून निर्मिती असल्याने याचे वजन फक्त ४५० किलो ग्रॅम असून, हे ६० हजार फुटांपर्यंत उड्डाण करू शकते.
  • ५० किलोमीटरच्या क्षेत्रात इंटरनेट सेवा देण्याची या ड्रोनची क्षमता आहे.

अडवानींवरील पुस्तक वादात

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावर लिहिलेल्या ‘अडवानी के साथ ३२ साल’ या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच त्यावरून वाद सुरू झाले आहेत.
  • या पुस्तकाच्या लेखनापूर्वी अडवानींची परवानगीच घेतलेली नव्हती, असे अडवानी यांच्या वतीने अधिकृतरीत्या स्पष्ट केले गेले आहे. 
  • विश्वंभर श्रीवास्तव यांचे हे पुस्तक अनिल प्रकाशनातर्फे काढण्यात आले आहे. तथापि हे पुस्तक आपल्या इच्छेच्या किंवा परवानगीविरुद्ध लिहीले गेल्याचे अडवानी यांनी स्पष्ट केले.

अफगणिस्तानातून अपहरण झालेल्या भारतीय तरुणीची सुटका

  • अफगणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या कोलकाता येथील ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
  • आगाखान फाउंडेशन या संस्थेमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ज्युडिथ डिसूझा हिचे ९ जूनला काबूलमधून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
  • अतिशय धाडसी व उमदी असलेली ज्युडिथ अफगणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करीत होती. 
  • ज्युडिथच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या सुटकेसाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती.

तनिष खोतने केले माउंट एल्ब्रस सर

  • कोल्हापूरच्या तनिष सुधीर खोतने वयाच्या तेराव्या वर्षीच युरोपातील माउंट एल्ब्रस हे सर्वोच्च हिमशिखर सर केले. एव्हरेस्टवीर चेतन केतकर यांच्या नेतृत्वाखाली त्याने ही किमया साधली.
  • १२ जुलै रोजी त्याने एल्ब्रस शिखरावर तिरंगा फडकवला. या शिखराची उंची ५६४२ मीटर असून सात खंडांमध्ये हे पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
  • तनिषने माउंट एल्ब्रस सर करणारा आशियातील युवा गिर्यारोहक म्हणून मान मिळविला. डेन्मार्कचा टाइलर आर्मस्ट्रॉंग हा एल्ब्रस शिखर सर करणारा जगातील सर्वात युवा गिर्यारोहक आहे. 
  • या मोहिमेमध्ये सुधीर खोत, निगडीची ऋतुजा शहा यांनीही हे शिखर सर केले.

चालू घडामोडी : २२ जुलै

भारतीय वायूदलाचे विमान बेपत्ता

  • चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे विमान २२ जुलै रोजी सकाळी बेपत्ता झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • तंबरम हवाई तळावरून सकाळी आठच्या सुमारास उड्डाण केल्यानंतर बंगालच्या उपसागरादरम्यान विमानाचा रडारशी संपर्क तुटला.
  • एएन-३२ हे द्विइंजिनचे विमान भारतीय सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येते. विमानाच्या शोधासाठी हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलाने मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.
  • नौदलाने कार्मुख, घडियाल, ज्योती आणि कुठर या चार नौकांना शोधासाठी वळविले असून, डॉर्निअर श्रेणीतील एक विमानही हरविलेल्या विमानाचा शोध घेत आहे.
  • एएन ३२ श्रेणीतील सुमारे १००हून अधिक विमाने भारतीय हवाई दलात कार्यरत आहेत. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान तब्बल चार तास उड्डाण करू शकते.

आदर्श इमारत ताब्यात घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

  • वादग्रस्त आदर्श इमारत राज्य सरकारने पाच ऑगस्टपूर्वी ताब्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इमारतीचे पाडकाम करु नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
  • मुंबई उच्च न्यायालयाने ही वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालायने त्याला स्थगिती देताना, इमारत लष्कराला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
  • आदर्श इमारत ही नियमांचे उल्लंघन करुन लष्कराच्या जागेवर बांधल्याचा आरोप आहे. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांना या इमारतीत घरे देणे आवश्यक होते.
  • आदर्श सोसायटीतील आरोपांवरुन काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तिबेटमध्ये पन्नास वर्षांनंतर कालचक्र विधी

  • तिबेटमध्ये चीन सरकारने नियुक्ती केलेले ११वे पंचेन लामा ग्याल्तसन नोर्बू यांनी बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कालचक्र विधीला सुरवात केली. गेल्या पन्नास वर्षांत तिबेटमध्ये प्रथमच हा विधी होत आहे.
  • पंचेन लामा हे तिबेटमधील बौद्ध धर्मातील दुसऱ्या क्रमांकाचे पद समजले जाते. चीन सरकारने तिबेटी नागरिकांचे मन जिंकण्यासाठी नोर्बू यांची १९९५मध्ये या पदावर नियुक्ती केली होती.
  • मात्र, चीन विरोधात असलेल्या तिबेटी जनतेने नोर्बू यांना पंचेन लामा समजण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे.
 कालचक्र विधी 
  • कालचक्र हा विधी विशिष्ट व्यक्तींनीच करायचा असतो. ज्ञानप्राप्तीच्या हेतूने अंतस्थ शक्ती जागृत करण्यासाठी हा विधी केला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
  • चीन सरकारने गेल्या पन्नास वर्षांमध्ये हा विधी तिबेटमध्ये होऊ दिला नव्हता. चीन सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर १९५९पासून भारतात आश्रय घेतलेल्या दलाई लामा यांनी हा विधी तिबेटबाहेर केला आहे.
  • तिबेटच्या नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे.
  • चीनने मात्र हा दावा फेटाळला असून, आपल्यामुळे तिबेटचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दलाई लामा हे धोकादायक व्यक्ती असल्याचे चीनचे म्हणणे आहे.

दयाशंकर सिंह सहा वर्षांसाठी भाजपामधून निलंबित

  • बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची तुलना वारांगनेशी केल्यामुळे दयाशंकर सिंह यांना सहा वर्षांसाठी भाजप पक्षामधून निलंबित करण्यात आले.
  • उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या तिकीट वाटप पद्धतीवर दयाशंकर सिंह यांनी टीका केली होती. त्याच वेळी मायावती यांची तुलना त्यांनी वारांगनेशी केली. 
  • तसेच दयाशंकर यांना भाजपचे उपाध्यक्ष आणि राज्याच्या युवा शाखेचे प्रभारी या पदांवरूनही हटविण्यात आले आहे.
  • दयाशंकर सिंह यांच्याविरुद्ध १५३ ए, ५०४, ५०९ आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

चालू घडामोडी : २१ जुलै

फॉर्च्युन-५०० मध्ये सात भारतीय कंपन्या

  • जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी असलेल्या फॉर्च्युन-५००मध्ये यंदा सात भारतीय कंपन्यांची वर्णी लागली आहे. 
  • या यादीत रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
  • भारतीय कंपन्यांमध्ये इंडियन ऑईलने १६१वे स्थान पटकावत आघाडी मिळवली आहे. तर २०१६ या वर्षासाठीच्या या यादीतून ओएनजीसी बाहेर फेकली गेली आहे.
  • खासगी जेम्स अँड ज्वेलरी कंपनी असलेल्या राजेश एक्स्पोर्टने या यादीत प्रथमच प्रवेश केला असून त्याचा क्रमांक ४२३वा आहे.
  • एकूण सात भारतीय कंपन्यांपैकी इंडियन ऑइल, भारतीय स्टेट बँक, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या चार कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत.
  • खासगी कंपन्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. त्यानंतर टाटा मोटर्स व राजेश एक्स्पोर्ट यांचे क्रमांक लागले आहेत.
फॉर्च्युन-५०० मधील भारतीय कंपन्या
कंपनी क्रमांक
इंडियन ऑइल १६१
रिलायन्स इंडस्ट्रीज २१५
टाटा मोटर्स २२६
भारतीय स्टेट बँक २३२
भारत पेट्रोलियम ३५८
हिंदुस्थान पेट्रोलियम ३६७
राजेश एक्स्पोर्ट ४२३

जागतिक निवृत्ती निर्देशांकात भारताला ८८वे स्थान

  • नॅटिक्सिस ग्लोबल ऍसेट मॅनेजमेंटच्या चौथ्या जागतिक निवृत्ती निर्देशांकात (जीआरआय) भारताला ८८वे स्थान मिळाले आहे. ब्रिक्स देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वांत वाईट ठरली आहे.
  • भारतात नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य इतर देशांच्या तुलनेत सर्वांत अवघड असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
  • निवृत्तीनंतरचे दिवस सुखात घालविता येतील अशा देशांच्या यादीत स्वित्झर्लंडने पहिला क्रमांक मिळविला आहे. या खालोखाल नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, आइसलॅंड आणि नेदरलॅंड या देशांनी क्रमांक पटकाविला आहे.
  • या अहवालात जगातील एकूण ४३ देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला.
  • निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी त्या देशांतील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात आला.
  • याआधारे निवृत्तीनंतर लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि विश्वासाला पात्र ठरणाऱ्या देशांच्यामध्ये तुलना करून हे निष्कर्ष काढण्यात आले.
  • २०१४मध्ये या यादीत भारताचा क्रमांक १०४वा होता. या तुलनेत भारताची थोडी सुधारणा असली तरी अद्यापही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्याचेच हा अहवाल सांगत आहे. 

भारतामध्ये १०.९६ लाख नागरिकांना ‘एचआयव्ही’ची लागण

  • भारतामध्ये गेल्या वर्षात सुमारे १०.९६ लाख नागरिकांना नव्याने ‘एचआयव्ही’ची लागण झाली आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
  • ‘दी न्यू ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१५’ (जीबीडी : २०१५) हा अहवाल ‘दी लॅन्सेट’ या एचआयव्ही जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
  • या अहवालात देशात एकूण २८.८१ लाख जण एचआयव्हीने बाधित असल्याचे समोर आले आहे. जगभरात ‘एचआयव्ही’ची लागण होण्याचा वेग संथ गतीने मंदावत आहे.
  • गेल्या दहा वर्षांत (२००५-२०१५) नव्याने लागण प्रमाण केवळ ०.७ टक्के आहे. हेच प्रमाण १९९७ ते २००५ दरम्यान २.७ टक्के होते.
  • जगभरात एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण वाढत चालले असून, सन २०००मध्ये २.७९ कोटी जण एचआयव्हीने बाधित होत्या. २०१५मध्ये हाच आकडा ३.८८ कोटी इतका झाला.
  • एड्सने वर्षाला मृत्यू झालेल्यांच्या संख्येत घट होत चालली आहे. २००५मध्ये १८ लाख तर २०१५मध्ये १२ लाख जणांचा या आजाराने मृत्यू झाला होता. अँटीरिट्रोव्हायरल थेरपीमुळे (एआरटी) मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
  • मात्र, गेल्या दहा वर्षांत नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये फारसा फरक पडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे.

खलिदा जिया यांच्या मुलाला सात वर्षांची शिक्षा

  • बांगलादेशच्या मुख्य विरोधी पक्षनेत्या खलिदा जिया यांच्या मोठ्या मुलाला सात वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. आर्थिक गैरव्यवहाराचा त्याच्या मुलावर आरोप ठेवण्यात आला आहे.
  • आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तारिक रेहमान याच्यावर २०१३मध्ये गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.
  • या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आपिल करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही रेहमान यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.
  • दोन वेळा पंतप्रधान झालेल्या खलिदा जिया यांचा तारिक हा मोठा मुलगा आहे. खलिदा जिया यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात आहे.

तुर्कस्तानचे तीन महिन्यांची आणीबाणी

  • लष्करी बंडामागे असलेल्या दहशतवादी गटांचा शोध घेण्यासाठी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
  • तुर्कस्तानच्या लष्करातील नाराज सैनिकांच्या एका गटाने सत्तापालटाचा प्रयत्न केला होता. लष्कराच्या बंडामुळे २५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
  • आतापर्यंत या बंडात सहभागी २८३९ सैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  • यापूर्वी १९८७ मध्ये तुर्कीमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.