कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ रोजी तामिळनाडूमधील इरुलनीकी गावामध्ये झाला. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते.
मठाचे ६८वे शंकराचार्य चंद्रशेखरेंन्द्र सरस्वती यांनी १९५४साली जयेंद्र सरस्वती यांना कांची मठाच्या पीठाधीपती पदावर नियुक्त केले.
जयेंद्र सरस्वतींचे मूळ नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. चंद्रशेखरेंन्द्र यांनीच सुब्रमण्यन यांना जयेंद्र सरस्वती हे नाव दिले.
चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर १९९४पासून जयेंद्र सरस्वती यांनी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्यपद सांभाळले. ते या पीठाचे ६९वे शंकराचार्य होते.
जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे आता विजयेंद्र सरस्वती हे पद सांभाळतील. १९८३साली जयेंद्र सरस्वती यांनी विजयेंद्र सरस्वती यांना मठाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते.
देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाऱ्या विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते.
कांचीपुरम वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी २००५पर्यंत ते तुरुंगात होते.
नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आदी शंकराचार्य यांनी कांची कामकोटी पीठाची स्थापना केल्याचे मानले जाते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात.
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.
या प्रकरणी सीबीआयने मे २०१७मध्ये गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक करणे, बेकायदा पद्धतीने लाभ घेणे, सरकार अधिकाऱ्यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडिया या कंपनीला कार्ती यांनी मदत केली आणि त्या मोबदल्यात स्वतःच्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोप होता.
आयएनएक्स मीडिया ही कंपनी, शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीची आहे.
नियमबाह्य परकीय गुंतवणूक प्रकरणी या कंपनीला नोटीस बजावविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा गैरवापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली, असे सांगितले जाते.
सीबीआयने या प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा देखील टाकला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच कार्ती यांच्या सीएलाही सीबीआयने अटक केली होती.
अंमलबाजवणी संचालनालयाकडूनही कार्ती चिदंबरम यांची चौकशी होण्याची शक्यता असून जानेवारीमध्ये ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर छापे टाकले होते.
सध्या पी. चिंदबरम, त्यांची पत्नी नलिनी व मुलगा कार्ती चिंदबरम हे तिघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
तर कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहारप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारताची घसरण
‘द क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०१८’मध्ये प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक विषयांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) आणि आयआयटी खरगपूर या ‘अभियांत्रिकी-खनिज व खाणकाम’ या विषयात पहिल्या ५० क्रमांकातील स्थान राखण्यात यशस्वी झाल्या असल्या, तरी त्यांची क्रमवारी घसरली आहे.
या यादीत आयआयटी (आयएसएम) २९व्या, तर आयआयटी खरगपूर ४०व्या क्रमांकावर आहे.
गेल्या ४ वर्षांशी तुलना करता, विषयनिहाय श्रेणीच्या यादीत पहिल्या ५०मध्ये स्थान मिळवण्यात केवळ ३ भारतीय संस्था यशस्वी ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे यंदा केवळ २० भारतीय संस्था सर्वोच्च १००च्या यादीत आहेत.
‘इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी’ या विषयाने सर्वोत्तम कामगिरी केली असून, टॉप १०० मधील ३ विद्यापीठांसह १० विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
४८ विषयांतील आयआयटीच्या ८० विभागांनी क्यूएस रँकिंगमधे जागा मिळवली असली, तरी २५ प्रकरणांत त्यांचे स्थान घसरले आहे.
२०१८मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढेल : मूडीज
भारताची अर्थव्यवस्था २०१८मध्ये ७.६ टक्के दराने वाढेल असा अंदाज मूडीज या आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे.
नोटाबंदी आणि जीएसटी प्रणाली यांच्या धक्क्यातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असल्याचे व स्थिती सुधारत असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विदेशी गुतंवणूकदार गुंतवणूक करताना आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थांच्या रेटिंग्जना व अंदाजाला महत्त्व देत असल्यामुळे या अहवालाला महत्त्व आहे.
नोटाबंदीमुळे विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळ बसली होती. मात्र, बजटेमध्ये ग्रामीण भारतासाठी चांगल्या तरतुदी असून त्याचा अपेक्षित परिणाम दिसेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था रुळावर येईल असे मूडीजने ग्लोबल ग्रोथ फोरकास्टमध्ये नमूद केले आहे.
मूडीजच्या अंदाजानुसार २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी तर २०१९मध्ये ७.५ टक्क्यांनी वाढेल.
यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेत व यंत्रणांमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत १३ वर्षांमध्ये प्रथमच नोव्हेंबर २०१७मध्ये मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली होती.
जितनराम मांझी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर
बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडत, राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांच्या महाआघाडीत सामील झाले आहेत.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जद(यू) आणि राजद आघाडीला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती.
त्यानंतर संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झाल्यावर जितनराम मांझी यांनी ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ या पक्षाची स्थापना केली.
नितीशकुमार भाजपामध्ये आल्यापासून मांझींकडे भाजपाचे दुर्लक्षहोत असल्याचा आरोप मांझी समर्थकांकडून केला जात होता.
२०१५मध्ये विधानसभा निवडणुकीतही लालूप्रसाद यादव यांनी जितनराम मांझी यांना भाजपाविरोधी लढ्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते.
मांझींना महाआघाडीत घेण्यासाठी लालूंचे प्रयत्न सुरु होते. मात्र, नितीशकुमार व समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी मांझींना विरोध दर्शवला होता.
एनडीएतून बाहेर पडणारा मांझी यांचा दुसरा पक्ष आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर करत शिवसेनेने यापूर्वी भाजपला धक्का दिला होता.
तर आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील भाजपावर नाराज आहेत.
भारताच्या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यास मालदीवचा नकार
पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय ‘मीलन’ या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे.
यासाठी मालदीवमधील सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देश सोडून नौदल सरावास येणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण मालदीवच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
मालदीवचा हा नकार म्हणजे मालदीवचे विद्यमान सत्ताधारी अब्दुल्ला यामीन आणि भारत सरकारमधील मतभेदांची दरी रुंदावत चालल्याचे लक्षण मानले जात आहे.
भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या ८ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये एकूण १६ देश सहभागी होणार आहेत.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार द्विपसमूहावर या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
मीलनमध्ये विविध देशांचे नौदल प्रमुखही सहभागी होणार असून यावेळी दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीवरही चर्चा होईल.
यापूर्वी नौदल सराव कार्यक्रम १९९५साली पहिल्यांदा सहा नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझीलँड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता.
जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीला कांस्यपदक
ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुडा रेड्डीने कांस्यपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.
या स्पर्धेत स्लोव्हानियाच्या जासा कायससेल्फला सुवर्ण आणि ऑस्ट्रेलियाच्या इमायली व्हाइटहेडला रौप्यपदक मिळाले.
याच प्रकारातील अन्य भारतीय महिला स्पर्धक प्रणाती नायकला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
अरुणा रेड्डी कराटे प्रशिक्षक असून तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. २००५साली जिम्नॅस्टिक्समध्ये अरुणाने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले.
२०१४साली राष्ट्रकुल स्पर्धेच्या पात्रता फेरीत वॉल्ट अॅपराटसमध्ये अरुणाला १४वे तर आशियाई स्पर्धेत नववे स्थान मिळाले होते.
२०१७साली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अरुणाला वॉल्ट प्रकारात सहावे स्थान मिळाले होते.
नीरव मोदीचा आणखी एक घोटाळा उघडकीस
पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सीने १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली आहे.
यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर ११,४०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
त्यामुळे नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा आता २०४ मिलियन डॉलर म्हणजेच १२,६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे
बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत विकास कृष्णनला सुवर्णपदक
भारतीय बॉक्सर विकास कृष्णनने बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे झालेल्या स्ट्रँडजा स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
विकासला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले. एखाद्या भारतीय खेळाडूला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.
२६ वर्षीय विकासने अंतिम फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या ट्रॉय इस्लीचा पराभव केला.
गतवर्षीच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदकानंतर विकासचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले.
भारताच्या अमित पांघलनेही ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली
या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्यपदकांदसह एकूण ११ पदकांची कमाई केली. यापैकी ५ पदक पुरुषांनी व ६ पदक महिलांनी पटकावली.
पाकिस्तान FATFच्या ग्रे लिस्टमध्ये
दहशतवादी संघटनांना निधी पुरवणाऱ्या देशांवर नजर ठेवणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकले आहे.
दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर नजर ठेवली जाणार आहे.
प्रत्येक परिस्थितीत पाकिस्तानची साथ देणाऱ्या चीनने यावेळी मात्र पाकला समर्थन दिले नसून या मुद्द्यावर माघार घेतली आहे.
त्यामुळे पॅरिसमध्ये सुरु असलेल्या FATFच्या बैठकीत सर्वसहमतीने पाकला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानला याआधी पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात वर्ष २०१२ ते २०१५ दरम्यान वॉच लिस्टमध्ये टाकण्यात आले होते.
तसेच काही महिन्यांपूर्वी दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदतही रोखली आहे.
राशिद खान क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.
राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस असून, असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
अफगाणिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकतेच आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
राशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यात ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
तर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAIने आता बाल आधार कार्ड लाँच केले आहे.
५ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळया रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे. UIDAIने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली.
त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे बाल आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालेल. परंतु मान्यताप्राप्त शालेय संस्थेचे बालकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी UIDAIने निळया रंगाच्या आधार कार्डांची काही इन्फोग्राफीक्सही पोस्ट केली आहेत.
या बाल आधार कार्डासाठी बायोमेट्रीक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. परंतु मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा यांची बायोमेट्रीक चाचणी बंधनकारक असेल.
मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर पालक जवळच्या आधार केंद्रात जाऊन बाल आधार कार्ड अपडेट करु शकतात. वयाच्या ५व्या आणि १५वर्षी बायोमेट्रीक पद्धतीने अपडेट करणे बंधनकारक आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही ते पूर्णपणे मोफत असेल.
१ ते ५ वर्ष वयोगटासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही. मात्र परदेशातील शैक्षणिक कार्यक्रम आणि अन्य सरकारी स्कॉलरशिपसाठी बाल आधारकार्ड उपयुक्त ठरु शकते.
वांद्रे येथे मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ
वाचक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे मुंबई महापालिकेच्या जागेत सुरू होणार आहे.
यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनात होणार आहे.
वांद्रे पश्चिम येथे हे विद्यापीठ सुरू व्हावे याकरिता भाजपाचे आमदार आशिष शेलार या विषयावर दीड वर्षापासून काम करत आहेत.
वांद्रेमधील बँडस्टँड येथील जागा मुंबई महापालिकेने विद्यापीठाला देण्याचे मान्य केले आहे.
राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे.
महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनातूनही करण्यात आली. मात्र गेल्या साठ वर्षांत त्याला मूर्त रुप आलेले नाही.
ग्रंथालीचे संस्थापक : दिनकर गांगल
अनुभवी सनदी अधिकारी टीएसआर सुब्रमणियन यांचे निधन
देशातील अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर आपल्या प्रशासकीय कौशल्याची नाममुद्रा उमटवणारे अनुभवी व अभ्यासू सनदी अधिकारी टीएसआर सुब्रमणियन यांचे २६ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
त्यांचा जन्म १९३८साली मद्रासमध्ये झाला. कोलकात्याच्या सेंट झेवियर्समधून त्यांनी गणितात पदवी तसेच स्नातकोत्तर पदवी घेतली. तर लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधुन पदविका घेतली.
उत्तर प्रदेश केडरचे सनदी अधिकारी म्हणून १९६१मध्ये त्यांची कारकीर्द सुरू झाली. गॅट कराराच्या काळात देशाचे व्यापार धोरण ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
एच डी देवेगौडा, आय के गुजराल, अटलबिहारी वाजपेयी या तीन पंतप्रधानांच्या काळात त्यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम केले.
संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचे सल्लागार असताना त्यांनी आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका भागातील विकसनशील देशांच्या हिताचे निर्णय घेतले.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव असताना वाहतूक, वीज, दूरसंचार या क्षेत्रांत पायाभूत सुविधा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय ठरला.
२०१६मध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अहवाल दिला होता, त्यात इंडियन एज्युकेशन सर्व्हिस सुरू करण्याची शिफारस होती.
माहिती अधिकार कायद्याचा पहिला मसुदा टीएसआर यांनीच तयार केला होता. त्यांनी सरकारच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी नागरी संहिता तयार केली. दूरसंचार सुधारणांचे पर्व त्यांच्याच काळात सुरू झाले.
जवळपास ३६ वर्षांच्या सनदी सेवा कारकीर्दीत त्यांनी गृह, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, माहिती व प्रसारण, खाण व खनिज, महसूल, पर्यटन अशा अनेक खात्यांत काम केले. निवृत्तीनंतर अनेक कंपन्यांचे ते सल्लागार होते.
त्यांनी ‘जर्नीज थ्रू बाबूलँड’ या पुस्तकात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याशी त्यांचे मुख्य सचिव असताना झालेले मतभेद व इतर अनेक बाबींचा उल्लेख केला आहे.
विकीपिडीयाच्या स्पर्धेमध्ये जेजुरीच्या फोटोला पहिला क्रमांक
जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकीपिडीयाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्येखंडेरायाची जेजुरीच्या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे.
जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो २०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो ठरला आहे.
विकीपीडीयाने #WikiLovesMonuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते.
यामध्ये ४५ हून अधिक देशांमधील नागरिकांनी त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले.
त्यापैकी प्रशांत खारोटे यांनी टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे.
विकी लव्ह मॉन्यूमेन्ट्स ही स्पर्धा २०१०मध्ये नेदरलॅण्डमध्ये स्थानिक स्तरावर सुरु करण्यात आली होती.
२०११साली ही स्पर्धा सर्व युरोप देशांमध्ये तर २०१२पासून जगभरातील छायाचित्रकारांसाठी आयोजित करण्यात येत आहे.
सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री
संस्मरणीय अशा महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवने सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला.
जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या महेंद्र चव्हाण, माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने विजेतेपद पटकावले.
फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुरूषांमध्ये पुण्याचा रोहन पाटणकर तर महिलांमध्ये पुण्याचीच स्टेला गौडे अजिंक्य ठरली.
संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपद तर उपनगरने सांघिक उपविजेतेपद पटकावले.
बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रीश्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधनझाले.
श्रीदेवी यांनी मद्यपान केल्यामुळे त्यांचा तोल गेल्याने बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे दुबई पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीतून उघड झाले आहे.
श्रीदेवी उर्फ अम्मा यंगर अय्यपन यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूतील शिवकाशी येथे झाला.
त्या १९९६साली निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे.
त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी तमिळ चित्रपट ‘थुनैवन’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
१९७१साली ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.
वयाच्या १२व्या वर्षी ‘ज्युली’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले. तर १५व्या वर्षी ‘सोलवा सावन’ हा त्यांचा प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट ठरला.
त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. १९८३मध्ये ‘हिम्मतवाला’ हा त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. तर मॉम हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला.
लग्नानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर ६ वर्षानंतर त्यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केली.
त्यानंतर २०१२साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्या पारुपल्ली कश्यपने ऑस्ट्रियन खुल्या आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकाविले.
त्याने मलेशियाच्या जून वेई चीमचा २३-२१, २१-१४ अशा फरकाने अवघ्या ३७ मिनिटांत पराभव केला.
यापूर्वी कश्यपने २०१५मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अखेरचे जेतेपद मिळवले होते. तर गतवर्षी कश्यपने अमेरिकन खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
जागतिक क्रमवारीत एकेकाळी सहाव्या क्रमांकावर असलेल्या कश्यपला मागील काही वर्षांत दुखापतींनी त्रस्त केले होते. त्यातून सावरत त्याने हे यशस्वी पुनरागमन केले.
नोबेलविजेते शास्त्रज्ञ रिचर्ड एडवर्ड टेलर यांचे निधन
भौतिकशास्त्रातील नोबेलविजेते शास्त्रज्ञ आणि स्टॅनफर्डचे मानद प्राध्यापक रिचर्ड एडवर्ड टेलर यांचे २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
नॅशनल ॲक्सिलरेटर लॅबोरेटरी या दोन किलोमीटर लांबीच्या रेषीय त्वरणक यंत्राच्या मदतीने त्यांनी बरेच प्रयोग केले होते.
अणूतील अनेक उपकण कालांतराने शोधले गेले, त्यात क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो.
या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते.
टेलर यांचा जन्म कॅनडामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते.
१९४५मध्ये अणुबॉम्बचा वापर झाला त्या वेळी टेलर यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले.
अल्बर्टा विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात एमएस केले. १९९२मध्ये ते स्टॅनफर्डला हाय एनर्जी फिजिक्स लॅबमध्ये काम करू लागले.
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सेस, नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थांचे ते मानद सदस्य होते.
नोबेलव्यतिरिक्त त्यांना ऑर्डर ऑफ कॅनडा, हुम्बोल्ट प्राइज असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते.
पीएनबी घोटाळ्याचे मूळ असलेली ‘स्विफ्ट’ प्रणाली ही बँकांच्या ‘कोअर बँकिंग प्रणाली (सीबीएस)’शी संलग्न करणे बंधनकारक करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला असून, त्यासाठी ३० एप्रिलची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून एकापेक्षा अधिक बँकांमधील व्यवहार करत हिरे व्यापारी नीरव मोदीने देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेला ११,४०० कोटी रुपयांना फसविले.
पीएनबीच्या हवाल्याने बनावट हमीपत्रे मिळवीत मोदीने अन्य बँकांमार्फतही पैसे उचलले आणि या घोटाळ्याचा तपास सात वर्षांनंतर लागला.
बँकांमध्ये ‘सीबीएस’ प्रणाली येण्याआधीपासून अस्तित्वात असलेली ‘स्विफ्ट’ ही यंत्रणा सीबीएसशी संलग्न केली गेली नसल्याने या व्यवहाराची पीएनबीच्या वरिष्ठ कार्यपालकांना माहितीच मिळू शकली नव्हती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकेच्या व्यवहाराबाबतचे निर्देश ‘स्विफ्ट’ (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स)द्वारे दिले जातात.
‘स्विफ्ट’ या यंत्रणेचा उदय १९७३मध्ये ब्रुसेल्स येथे ७ बँकांच्या समूहामार्फत झाला. त्यानंतर पुढील ४ वर्षे ही यंत्रणा कार्यरत राहिली.
त्यानंतर तिची जागा ‘टेलेक्स’ने घेतली. मात्र ‘स्विफ्ट’प्रमाणेच कार्यरत या यंत्रणेचा २००हून अधिक देशातील बँका, वित्त संस्था, दलाल पेढय़ा, म्युच्युअल फंड संस्था आदी उपयोग करत आहे.
सुरक्षित व्यवहारांकरिता ही यंत्रणा ‘कोअर बँकिंग’शी जोडणे आवश्यक आहे.
सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी
सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भात अमेरिकेतील अकमै टेक्नोलॉजी या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या स्थानी आहे.
अकमै टेक्नोलॉजीने जाहीर केलेल्या ‘स्टेट ऑफ द इंटरनेट’ अहवालामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी ४० टक्के म्हणजेच ५३ हजारहून अधिक सायबर हल्ले हे आर्थिक क्षेत्रांशी संबंधीत बेवसाईट्स आणि अॅप्लिकेशन्सवर झाले आहेत.
फिशिंग, वेब हॅक्स आणि मालवेअर प्रकारातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात २०१७ सालात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय बँकिंग क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डॉस) प्रकाराच्या सायबर हल्ल्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळेच भारताने डिजीटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बँक घोटाळे टाळण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून समिती स्थापन
बँकांमधील वाढती घोटाळ्याची प्रकरणे आणि बुडीत कर्जाच्या वर्गवारी करण्याबाबत बँकांमधील विविध पळवाटा वापरण्याची पद्धती याची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका तज्ज्ञ समितीच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाचे माजी सदस्य वाय एच मालेगाम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापण्यात आली आहे.
एकीकडे बँकेची पत गुणवत्ता ढासळत असताना, एनपीएचे वर्गीकरण करण्यात बँकांकडून हयगय होत आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये बँकिंग अग्रणी स्टेट बँकेसह काही बडय़ा बँकांमध्ये ही अपप्रवृत्ती आढळली आहे.
एनपीएच्या वर्गवारीतील या तफावतीच्या समस्येबाबतही मालेगाम समितीकडून उपाययोजना सुचविल्या जाणे अपेक्षित आहे.
त्याचप्रमाणे या संबंधाने निश्चित देखरेखीची पद्धत कशी असावी यावरही समिती शिफारस करेल.
नीरव मोदी घोटाळ्यातील गैरव्यवहाराचे मूळ असलेल्या स्विफ्ट प्रणालीचा दुरुपयोग शक्य असल्याचा आणि त्याबाबत सावधगिरी आवश्यक असल्याचा ऑगस्ट २०१६ पासून किमान तीन वेळा इशारा दिला गेला आहे, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे.
जगप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी के गोयल यांचे निधन
प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी के गोयल यांचे २० फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
हृदयविकारशास्त्रातील प्रगाढ अभ्यास आणि अनुभवामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गोयल यांच्याकडे रुग्णांचा ओघ असे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारत दौऱ्यावर
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांच्या भारत दौऱ्यात २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सहा करार झाले.
कॅनडाशी सहकार्य वाढवण्यावर भारत भर देत असून दोन्ही देशांमधील संबंध हे लोकशाही, सर्वश्रेष्ठ कायदा यावर आधारित आहे, असे मोदींनी नमूद केले.
भारतातून उच्च शिक्षणासाठी कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताने कॅनडाशी उच्च शिक्षणासाठी करार केला आहे.
कॅनडा सुपरपॉवर असून उर्जाक्षेत्रात भारताला कॅनडाची गरज असल्याचे मोदींनी नमूद केले.
कृष्णा लाल कोहली पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला
पाकिस्तानमध्ये कृष्णा लाल कोहली पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाची (सिनेट) निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत.
किशू बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहली यांना सिनेटसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
कृष्णा यांचे बंधू वीरजी कोहली यांची अपक्ष उमेदवार म्हणून बेरानोच्या युनियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
ते कृष्णा यांची साथ देत आहेत. त्यामुळे जर वीरजी सिनेटर पदी नियुक्त झाले तर, अल्पसंख्याक हिंदू समाज आणि ग्रामीण सिंध प्रांतातून पाकिस्तानच्या संसदेत पोहोचणाऱ्या आणि राजकीय सूत्र हातात घेणाऱ्या कृष्णा या पहिल्या महिला ठरणार आहेत.
मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कृष्णा यांचा जन्म १९७९मध्ये सिंध प्रांताजवळ असणाऱ्या नगरपारकर येथे झाला होता.
त्या पाकिस्तानातील ‘कोहली’ या हिंदू अल्पसंख्यांक समुदायातून आल्या आहेत. पाकिस्तानातील महिलांचे आणि अल्पसंख्यांकांचे सबलीकरण हे त्यांचे ध्येय आहे.
त्यांचे कुटुंबिय सुरुवातीच्या काळात बंधुआ मजूर म्हणून काम करत होते. त्यामुळे इयत्ता तिसरीत असल्यापासून त्यांनाही मजूरी करावी लागली होती.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी सिंध कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या लाल चंद यांच्याशी विवाह केला होता.
लग्नानंतर त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयातील पदवी घेतली. कुटुंब आणि पतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.
२००५पासून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००७मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहेरगढ ह्युमन राइट्स युथ लिडरशिप ट्रेनिंग कॅम्प’साठी त्यांनी निवड झाली होती.
कामाच्या ठाकाणी होणारे लैंगिक शोषण, महिलांचे मुलभूत हक्क आणि बंधुआ मजूर यांच्याविषयी काही महत्त्वाची पावले उचलण्यात आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांमध्ये हातभार लावण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
पाकिस्तानच्या युथ सिविल अॅक्शन प्रोग्राममध्येही त्यांनी आपले योगदान दिले आहे.
भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताला ८१वे स्थान
ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१७ या अहवालानुसार भ्रष्टाचारी देशांच्या यादीत ४० गुणासह भारताने ८१वे स्थान मिळविले आहे.
२०१६मध्ये भारत एकूण १७६ देशांमध्ये ७९व्या (गुण ४०) क्रमांकावर होता. तर २०१५मध्ये भारत या यादीत ३८व्या क्रमांकावर होता.
यावर्षी या यादीत एकूण १८० देशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार क्रमीत करण्यात आले आहे.
हा निर्देशांक ० ते १०० गुणांमध्ये देशांना मापतो. निर्देशकानुसार ० गुण हे अति भ्रष्टाचाराचे तर १०० गुण स्वछ व्यवस्थेचे सूचक आहे.
या यादीत न्यूझीलँड आणि डेन्मार्क अनुक्रमे ८९ आणि ८८ या गुणांसह अग्रस्थानी आहेत. तर सीरिया, दक्षिण सूदान आणि सोमालिया अनुक्रमे १४, १२ आणि ९ गुणांसह तळाशी आहेत.
यादीत चीन ४१ गुणांसह ७७व्या क्रमांकावर आहे. तसेच ब्राझील ९६व्या, पाकिस्तान ११७व्या आणि रशिया २९ गुणांसह १३५व्या क्रमांकावर आहे.
भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करणारे पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते तसेच तपास यंत्रणांचे अधिकारी यांना जीव गमवावा लागल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकारांच्या संरक्षणार्थ असलेल्या समितीच्या अहवालातही गेल्या सहा वर्षांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात लिखाण करणाऱ्या १५ पत्रकारांचा खून झाल्याचे म्हटले आहे.
आशियाई देशांमध्ये भूतान देश चांगल्या स्थानावर आहे, तर बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचे स्थान बिकट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अवनी चतुर्वेदी : लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक
फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी या भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत.
१९ फेब्रुलारीला गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन अवनी यांनी ‘फाइटर एअरक्राफ्ट मिग २१’च्या साथीने उड्डाण घेतले आणि यशस्वीपणे मिशन पूर्णही केले.
जगभरात ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तान अशा निवडक देशांमध्येच महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते.
भारतात ऑक्टोबर २०१५मध्ये केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली.
महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी २०१६मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात सामील केले होते.
अवनी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील आहे. तिने आपले प्रशिक्षण हैदराबाद एअरफोर्स अकॅडमीतून पूर्ण केले आहे.
भारताचे हवाईदल प्रमुख : एअर चीफ मार्शल बी एस धनोआ
नवाज शरीफ पीएमएल-एन पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अपात्र
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना तेथील सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या (पीएमएल-एन) अध्यक्षपदासाठी अपात्र ठरविले आहे.
त्यामुळे पंतप्रधान पदानंतर शरीफ यांना आता पक्षाध्यक्ष पदावरूनही पायउतार व्हावे लागणार आहे.
गेल्या वर्षी पनामा पेपर लिक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना दोषी ठरवत पंतप्रधानपदावरून हटवले होते.
पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचे सिद्ध झाले होते.
दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता साम्राज्याला उतरती कळा
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पदत्याग केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे.
गेले अनेक महिने गुप्ता बंधुंवर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. मात्र केवळ तपास चालू आहे असे सांगत तपास यंत्रणांनी कोणतीही प्रत्यक्ष कारवाई त्यांच्यावर केली नव्हती.
मात्र १४ फेब्रुवारीला राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली.
गुप्तांच्या जोहान्सबर्गमधील सॅक्झनवर्ल्ड येथील आलिशान अशा संकुलावर छापा टाकण्यात आला तसेच त्यांच्या अनेक सहकार्यांना अटक झाली. तसेच गुप्ता बंधूंमधील ज्येष्ठ बंधू अजयला फरारही घोषित करण्यात आले.
मुंबईत पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४,१०६ सामंजस्य करार झाले.
उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्रासाठी हा एक मैलाचा दगड ठरला.
या परिषदेला उद्योजकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला आहे.
या परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी झाले.
तर २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.
जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी २०१६मध्ये मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. या परिषदेत ८ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते.
अभिनेते कमल हसन यांचा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश
दाक्षिणात्य अभिनेते कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला असून, त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
कमल हसन यांनी मदुराईत घेतलेल्या एका सभेत आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचेही अनावरण केले.
एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असे हसन यांच्या नवीन पक्षांचे चिन्ह असणार आहे.
या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हसन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली.
कोळसा खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्याचा निर्णय
कोळसा खाणी खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी खुल्या करण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
१९७३साली कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्यात येत आहेत.
या निर्णयाकडे अत्यंत महत्त्वाची सुधारणा म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कोल इंडिया या कंपनीची कोळसा खाणी क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.
आजपर्यंत कॅप्टिव्ह वीज निर्मितीसाठीच खासगी कंपन्यांना कोळसा खाणी दिल्या जात होत्या. आता ई-लिलावाद्वारे देशातील खासगी व जागतिक कंपन्यांनाही खाणपट्टे दिले जातील. या कंपन्या कोळसा काढून विकू शकतील.
भारताने २० फेब्रुवारी रोजी अग्नी-२ या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या मोबाइल लाँचरच्या माध्यमातून ही चाचणी घेण्यात आली आहे.
जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे अग्नी-२ क्षेपणास्त्र २० मीटर लांबीचे असून त्याचे वजन १७ टन आहे.
तसेच १ टन इतकी अण्वस्त्र वहनक्षमता असलेल्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-२चा माऱ्याचा पल्ला २,००० किमी इतका आहे.
भारताचे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अग्नी या मालिकेतील हे क्षेपणास्त्र आहे.
या मालिकेत अग्नी-१ (७०० किमी पल्ला), अग्नी-३ (३,००० किमी पल्ला), अग्नी-४ (४,००० किमी पल्ला) व अग्नी-५ (५,००० किमीपेक्षा जास्त पल्ला) यांचा समावेश आहे.
हे क्षेपणास्त्र याआधीच लष्करामध्ये सामील झाले असून अत्यंत अत्याधुनिक अशा नॅव्हीगेशन सिस्टीमने (दिशादर्शन यंत्रणा) ते सज्ज आहे.
आयुष्मान भारत योजनेच्या संचालकपदी डॉ. दिनेश अरोरा
निती आयोगाचे आरोग्य संचालक डॉ. दिनेश अरोरा यांची नुकतीच ‘आयुष्मान भारत’ या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
आयुष्मान भारत अमेरिकेतील ओबामा केअरएवढीच मोठी आरोग्य योजना असून, या योजनेची प्राथमिक आखणी अरोरा यांनी केली होती.
अरोरा हे एमबीबीएस डॉक्टर होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत आले. मूळ चंदिगढचे असलेले डॉ. अरोरा केरळ केडरचे २००२च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पंजाबी, मल्याळम, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील ओट्टापल्लम येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्द सुरू केली.
त्यांनी सार्वजनिक आरोग्य योजनेत केरळमध्ये २००६-२००९ दरम्यान काम केले आहे. त्यांच्या काळात केरळने आरोग्य क्षेत्रातील अनेक निर्देशांकांत बाजी मारली होती.
विम्यातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला पैसा मिळेल व तो पैसा पुन्हा याच व्यवस्थेसाठी वापरल्याने ही योजना बळकट होईल, असे त्यांचे मत आहे.
त्यांनी केरळात बेकायदा खाणींवर बंदी, बंदिस्त हत्तींच्या समस्या, वाहतूक अशा अनेक प्रश्नांत लक्ष घालून शिस्त आणली. त्यामुळे बेधडक अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक आहे.
प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा अर्थशास्त्र व राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
ग्रामीण विद्युतीकरण महामंडळात काम करताना त्यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य) यात चमकदार कामगिरी केली आहे.
सिंगापूर सरकारकडून नागरीकांना बोनस
सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला ‘बोनस’ देण्याची घोषणा केली आहे.
नागरिकांना त्यांच्या करपात्र उत्पन्नानुसार १०० ते ३०० सिंगापूर डॉलर (४,९०० रुपये ते १४.७०० रुपये) एवढी रक्कम बोनस म्हणून मिळेल.
या बोनसचे वर्णन मंडारियन भाषेत ‘हाँगबाओ’ असे केले आहे. याचा अर्थ विशेष आनंदाप्रसंगी दिली जाणारी रोख बक्षीस रक्कम.
सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीत प्रत्येक नागरिकास सहभागी करून घेण्याची सरकारची प्रतिबद्धता यातून दिसून येते.
वित्तमंत्री हेंग स्वी किएत यांनी १० अब्ज सिंगापुरी डॉलर शिलकीचा अर्थसंकल्प मांडताना सुमारे ७०० दशलक्ष सिंगापुरी डॉलर २७ लाख नागरिकांना ‘बोनस’ म्हणून वाटण्याची घोषणा केली.
यानंतरही उरलेली रक्कम रेल्वे सुधारणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा संरक्षण योजनांसारख्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.
देशातील वैधानिक मंडळाने अर्थव्यवस्थेत दिलेले योगदान आणि मुद्रांक शुल्क म्हणून जमा झालेली रक्कम यामुळे यंदा इतका नफा असणारा अर्थसंकल्प सादर झाल्याचे वृत्त आहे.
नोट : जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget) असे म्हणतात.
पाकिस्तानकडून मँडरिनला अधिकृत भाषेचा दर्जा
पाकिस्तानमधील सिनेटने चीनमधील मँडरिन या भाषेचा पाकिस्तानमधील अधिकृत भाषांच्या यादीत समावेश केला आहे.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये इंग्रजी, अरबी, उर्दुसह मँडरिनचाही अधिकृत भाषांच्या यादीत समावेश झाला आहे.
मँडरिनला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरअंतर्गत जनतेमधील संवाद वाढण्यास हातभार लागेल, असा दावा केला जात आहे.
पाकिस्तानमध्ये पंजाबी, पश्तू या भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, अजूनही या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
पाकिस्तानमधील बोली भाषांना डावलून परदेशी भाषेला अधिकृत भाषांच्या यादीत स्थान देण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
पाकिस्तान-चीनमधील वाढते व्यापारी संबंध पाहता पाकमधील अनेक जण मँडरिन ही भाषा शिकत आहेत.
चीनमधील शैक्षणिक संस्थांनीही पाकमध्ये मँडरिन भाषा वर्ग सुरु केले आहेत. तर पाकिस्तानमधील काही शाळांमध्येही ही भाषा शिकवली जाते.
पश्चिमेकडील देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे पाकमधील तरुणाईचा कल आता चीनकडे वाढत असल्याचे सांगितले जाते.
शिया इस्माईली समाजाचे ४९वे धर्मगुरू आगा खान भारत दौऱ्यावर
जगभर पसरलेल्या शिया इस्माईली समाजाचे ४९वे धर्मगुरू प्रिन्स आगा खान भारत दौऱ्यावर आले आहेत.
धर्मगुरूपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतल्याला ६० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत.
प्रिन्स आगा खान शिया समाजाच्या लोकांची भेट घेतील. तसेच ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.
प्रिन्स आगाखान यांच्या हस्ते २१ फेब्रुवारीला दिल्लीत सुंदर नर्सरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
सुंदर नर्सरी हा १६व्या शतकातील उद्यानांचा समूह असून, तो हुमायूनच्या कबरीला लागून आहे. या नर्सरीला युनेस्कोने जागतिक वारसा बहाल केला आहे.
२०१५मध्ये भारत सरकारने आगा खान यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
प्रमोद नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार
अशोक लेलँडचे कर्मचारी प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार घोषीत झाला असून, येत्या २६ फेब्रुवारीला दिल्ली येथील विज्ञान भवनात त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या श्रम व रोजगार मंत्रालय दिल्लीतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
कामगार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईतर्फे केला जाणारा गुणवंत कामगार २००८ या पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.
मुंबई-पुणे हायपर लूप ट्रेनसाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी करार
मुंबई-पुणे दरम्यान हायपर लूप ट्रेन मार्ग उभारण्यासंदर्भात महाराष्ट्राशी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीने ईच्छा करार केला आहे.
मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटसाठी हायपरलुपचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन आले असून, मुंबई-पुणे हे अंतर हायपरलूप ट्रेनने अवघ्या २० मिनिटात पार करता येईल असे त्यांनी सांगितले.
ब्रॅन्सन यांच्यानुसार हायपरलूपमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. या प्रकल्पासाठी २० हजार कोटीं रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरवर्षी १५ कोटी प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता या हायपरलूप ट्रेनची असेल. हायपरलूप ट्रेनमुळे दरवर्षी प्रवाशांच्या ९ कोटी तासांच्या वेळेची बचत होईल.
तसेच पर्यावरण प्रदुषित करणाऱ्या वायुंचे उत्सर्जनही दरवर्षाला दीड लाख टन इतके कमी होईल असा दावा करण्यात आला आहे.
या तंत्रज्ञानांतर्गत हवाविरहित ट्यूबमधून चुंबकीय क्षेत्राच्या सहाय्याने ध्वनीच्या गतीने ट्रेनसारख्या डब्यांचा प्रवास केला जातो.
अजूनतरी हे तंत्रज्ञान जगात कुठेही व्यावसायिक वापरात आलेले नाही. दुबईमधे हायपरलूपचे काम वेगाने सुरू असून तेथे ती लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे.
ही यंत्रणा संपूर्णपणे वीजेवर चालणारी असून हा मार्ग वापरात आला तर मुंबई पुणे रस्त्यावरील ताणही कमी होईल असे सांगण्यात येत आहे.
गणितज्ञ व्लादिमीर ड्रिनफेल्ड यांना प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार
प्रसिध्द गणितज्ञ व्लादिमीर गेरशोनोविच ड्रिनफेल्ड यांना गणितातील प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार मिळाला आहे.
एक लाख डॉलर्सचा हा पुरस्कार इस्रायलच्या वुल्फ फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जातो. ज्यांना आधी वुल्फ पुरस्कार मिळाला अशा अनेकांना नंतर नोबेलही मिळाले आहे.
ड्रिनफेल्ड यांचे गणितातील संशोधन हे अंकीय सिद्धांत, थिअरी ऑफ अॅटॉमॉर्फिक फॉम्र्स, बीजगणितीय भूमिती, एलिप्टिक मोडय़ुल, थिअरी ऑफ लँग्लांड्स कॉरस्पाँडन्स या विषयांमध्ये आहे.
पुंज समूहाची संकल्पना त्यांनी व मिशियो जिंबो यांनी एकाच वेळी मांडली. त्यातून गणितीय भौतिकशास्त्रात मोठी भर पडली. थिअरी ऑफ सॉलिटॉन्समध्ये ड्रिनफेल्ड-सोकोलोव्ह यांनी अनेक सुधारणा केल्या.
युक्रेनमध्ये जन्मलेल्या ड्रिनफेल्ड यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी बुखारेस्ट येथे गणित ऑलिम्पियाडमध्ये रशियाचे प्रतिनिधित्व केले होते.
१९७८मध्ये मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. स्टेकलोव इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथॅमेटिक्स या संस्थेतून त्यांनी विज्ञानातील डॉक्टरेट मिळवली.
१९८१ ते १९९९ या काळात त्यांनी व्हेरकिन इन्स्टिटय़ूट फॉर लो टेम्परेचर फिजिक्स अँड इंजिनीअरिंग या संस्थेत काम केले. १९९९मध्ये त्यांनी शिकागो विद्यापीठात काम सुरू केले.
वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लँग्लांड्स काँजेक्सर्स फॉर जीएल २ हा कूटप्रश्न सोडवला. एलिप्टिक मोडय़ुल्स म्हणजे ड्रिनफेल्ड मॉडय़ुल्सची कल्पना त्यांनी मांडली होती.
गणितात युरी मॅनिन हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी यांग-मिल्स इन्स्टँटनच्या मॉडय़ुलाय स्पेसची संकल्पना मांडली. ती नंतर मिखाइल अतिया व निगेल हिचीन यांनी स्वतंत्रपणे सिद्ध केली.
क्वांटम ग्रूप हा शब्दप्रयोगही त्यांनीच प्रथम वापरला. त्यांचा संबंध यांग बॅक्सटर समीकरणाशी जोडून त्यांनी या संशोधनास नवी दिशा दिली.
व्हर्टेक्स बीजगणितीय सिद्धांत त्यांनी अॅलेक्झांडर बेलीनसन यांच्यासमवेत नव्याने विकसित केला.
ड्रिनफेल्ड यांनी समकालीन गणिताच्या विकासात मोठा हातभार लावला असून अनेक नवीन सिद्धांतांना त्यांचे नाव नंतर देण्यात आले.
सूत्र सिद्धांतासह, भौतिकशास्त्राच्या अभ्यासात पायाभूत असलेले अनेक गणिती सिद्धांत त्यांनी विकसित केले आहेत.
पाकचे विरोधी पक्ष नेते इमरान खान यांचा तिसरा विवाह
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इमरान खान यांनी तिसऱ्यांदा निकाह केला असून, बुशरा मनेका असे त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव आहे.
मनेका या अध्यात्मिक गुरु असून, मनशांतीसाठी काही तंत्र शिकून घेण्यासाठी इम्रान खान मनेका यांच्याकडे जात होते.
४०वर्षीय बुशरा मनेका यांचा यापूर्वी वरिष्ठ कस्टम अधिकारी म्हणून कार्यरत असलेले खवर फरीद मनेका यांच्याशी निकाह झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
इमरान खान यांचे यापूर्वी दोनदा निकाह झाले आहेत. पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत त्यांनी १९९५ साली निकाह केला होता. २००४मध्ये त्यांनी जेमिमा यांना घटस्फोट दिला.
यानंतर दुसरी पत्नी पत्रकार रेहम खानसोबत २०१५मध्ये त्यांनी निकाह केला. मात्र १० महिन्यांनंतर रेहम व इमरान यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.
‘न्यू वर्ल्ड हेल्थ’तर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार भारताची आर्थिक राजधानी मुंबईने जगातील श्रीमंत शहराच्या यादीत १२वे स्थान मिळविले आहे.
मुंबईची एकूण संपत्ती ९५० बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे ६१,१२,७७५ कोटी रुपये आहे.
या यादीत एकूण १५ श्रीमंत शहरांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
यामध्ये न्यूयॉर्कने पहिला क्रमांक पटकावला असून या शहराची संपत्ती ३ ट्रिलियन डॉलर म्हणजे अंदाजे १९३ लाख कोटी रुपये आहे.
तर दुसऱ्या स्थानावर लंडनने आणि तिसऱ्या स्थानावर जपानने बाजी मारली आहे.
याशिवाय यामध्ये कॅलिफोर्नियातील शहरे, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रांस या देशातील शहरांचाही समावेश आहे.
शहराच्या संपत्तीमध्ये त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक संपत्ती ग्राह्य धरण्यात आली आहे.
यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी यासारख्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. सरकारी निधीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता मुंबई पहिल्या १०मध्ये आहे. १ बिलियनपेक्षा जास्त संपत्ती असलेले एकूण २८ अब्जाधीश मुंबईत आहेत.
त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे.
जगातील १५ श्रीमंत शहरांची यादी
क्र.
शहर
संपत्ती
१.
न्यूयॉर्क (अमेरिका)
३ ट्रिलियन डॉलर
२.
लंडन (यूके)
२.७ ट्रिलियन डॉलर
३.
टोकियो (जपान)
२.५ ट्रिलियन डॉलर
४.
सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया)
२.३ ट्रिलियन डॉलर
५.
बीजिंग (चीन)
२.२ ट्रिलियन डॉलर
६.
शांघाय (चीन)
२ ट्रिलियन डॉलर
७.
लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया)
१.४ ट्रिलियन डॉलर
८.
हाँग काँग
१.३ ट्रिलियन डॉलर
९.
सिडनी (ऑस्ट्रेलिया)
१ ट्रिलियन डॉलर
१०.
सिंगापूर (मलेशिया)
१ ट्रिलियन डॉलर
११.
शिकागो (अमेरिका)
९८८ बिलियन डॉलर
१२.
मुंबई (भारत)
९५० बिलियन डॉलर
१३.
टोरंटो (कॅनडा)
९४४ बिलियन डॉलर
१४.
फ्रँकफर्ट (जर्मनी)
९१२ बिलियन डॉलर
१५.
पॅरिस (फ्रान्स)
८६० बिलियन डॉलर
रोटोमॅक कर्ज घोटाळा
रोटोमॅक पेन्सचे उत्पादन करणाऱ्या रोटोमॅक ग्लोबल प्रा लि या कंपनीचे प्रमुख विक्रम कोठारी यांनी ७ सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ३,७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली असल्याचे उघड झाले आहे.
बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकांकडून विक्रम कोठारीने कर्ज घेतले होते. मात्र ते परत करण्यात आले नाही.
केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) यासंदर्भात विक्रम कोठारी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे.
सीबीआयने विक्रम कोठारींच्या तीन ठिकाणांवर छापे मारून या घोटाळ्याशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत ज्यावरून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आले आहे.
कोठारी यांच्या कंपनीकडील थकित कर्जांचा आकडा ८०० कोटी रुपयांच्या घरात असावा, असा ‘सीबीआय’चा प्राथमिक अंदाज होता.
मात्र कागदपत्रांची पाहणी केली असता ही थकित कर्जे सुमारे ३,७०० कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात मूळ कर्जांची रक्कम २,९१९ कोटी रुपये आहे. व्याज व दंडासह ती ३,६९५ कोटी रुपये होते.
कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी कर्जे घेतली. परंतु प्रत्यक्षात ते पैसे अन्यत्र वळवून त्यांनी बँकांची फसवणूक केली, असा सीबीआयचा दावा आहे.
सीबीआयच्या एफआयआर पाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कोठारी व त्यांच्या कंपनीविरुद्ध मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
या कंपनीने करचोरी केल्याचेही समोर आले असून, याप्रकरणी आयकर खात्याकडून १४ बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
याप्रकरणी विक्रम कोठारी यांनी घोटाळा केल्याचे अमान्य केले असून, लवकरच कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन दिले आहे.
विक्रम कोठारी हे ‘पान पराग’ या पान मसाला कंपनीचे संस्थापक एम एम कोठारी यांचे चिरंजीव आहेत.
वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारी यांनी स्टेशनरीचा व्यवसाय सुरु केला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते विक्रम कोठारींना गौरवण्यात आले होते.
भारतात बालमृत्यूंमध्ये घट : युनिसेफ अहवाल
दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या २८ दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या ६ लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगातील एकूण १८४ देशांची आकडेवारी या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये भारताचा ३१वा क्रमांक आहे.
भारतात अर्भक मृत्यूचे प्रमाण २५.४ (प्रति १००० जन्म) असल्याचे त्यात म्हटले आहे.
बाळाच्या जगण्याच्या दृष्टीने त्याच्या जन्मानंतरचे पहिले २८ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या महिन्याभरात बाळाचा मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते.
जगभराच्या सरासरीनुसार जन्मलेल्या प्रत्येक १००० बाळांमागे १९ बालके दगावतात. संपूर्ण जगाचा विचार केल्यास २०१६ साली जन्मल्यावर पहिल्याच आठवड्यात २६ लाख अर्भकांचा मृत्यू झाला.
त्यातील १० लाख बालके जन्माच्या पहिल्याच दिवशी दगावली तर जवळपास १० लाख बालके जन्मल्यावर एका आठवड्याच्या कालावधीत दगावली.
या बालकांचा मृत्यू विविध आजारांमुळे, अकाली जन्म, बाळंतपणाच्या वेळेस निर्माण होणार प्रश्न, संसर्ग अशा विविध कारणांमुळे झाला.
० ते ५ वर्षे या कालावधीत होणाऱ्या मृत्यूमध्ये १९९० ते २०१५ या कालावधीत ६६ टक्के घट झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेल्या आरोग्य सेवा आणि राहणीमान यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे.