चालू घडामोडी : १६ फेब्रुवारी
बडोद्यात ९१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ
- महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे, गुजरात) येथे १६ फेब्रुवारी रोजी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले.
- ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विजेते ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
- यावेळी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आहेत.
- आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले महाराज सयाजीराव गायकवाड यांची बडोदे ही कर्मभूमी आहे.
- सुमारे ८३ वर्षानंतर बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी १९०९साली येथे साहित्य संमेलन पार पडले होते.
- महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या भाषणाची ध्वनिफित उद्घाटन प्रसंगी ऐकवण्यात आली.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
- या साहित्यनगरीतील मुख्य व्यासपीठाला ‘विंदा करंदीकर विचारपीठ’ असे नाव देण्यात आले आहे.
भारतात प्रथमच थिएटर ऑलिम्पिक्सचे आयोजन
- राजधानी दिल्लीमध्ये १७ फेब्रुवारीपासून ‘थिएटर ऑलिम्पिक्स’ सुरु होत असून भारत प्रथमच ‘थिएटर ऑलिम्पिक्स’चे यजमानपद भूषवित आहे.
- हे आठवे थिएटर ऑलिम्पिक्स असून, ग्रीसमधील डेल्फीमध्ये १९९३साली पहिल्यांदा थिएटर ऑलिम्पिक्सचे आयोजन करण्यात आले होते.
- जगभरातील नाटककारांना वैचारिक-सांस्कृतिक आदानप्रदानासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा उद्देश यामागे आहे.
- जपान, रशिया, तुर्कस्तान, दक्षिण कोरिया, चीन, पोलंड येथे याआधी थिएटर ऑलिम्पिक्स झाली होती.
- ‘फ्लॅग ऑफ फ्रेंडशिप’ अशी या ‘थिएटर ऑलिम्पिक्स’ची संकल्पना आहे. यामध्ये भारतीय प्रेक्षकांना जागतिक स्तरावरील नाटक पाहायला मिळणार आहेत.
- ३० देशांतून येणारे २५ हजारांहून अधिक कलाकार देशातील १७ शहरांमध्ये नाटकांचे ४५० प्रयोग, ६०० अँबियन्स परफॉर्मन्सेस, २५० यूथ फोरम असे कार्यक्रम सादर करणार आहेत.
- लाल किल्ल्याच्या प्रांगणात १७ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता थिएटर ऑलिम्पिक्सला सुरुवात होईल तर ८ एप्रिल रोजी मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे या महोत्सवाची सांगता होईल.
- यंदाच्या थिएटर ऑलिम्पिक्समध्ये दिल्लीमध्ये पंधरा मराठी नाटके सादर होणार आहेत. बंगाली नाटकेही मोठ्या संख्येने सादर होणार आहेत.
आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचा राजीनामा
- अनेक घोटाळ्यांनी प्रतिमा कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी १४ फेब्रुवारी रोजी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- देशवासियांना उद्देशून टीव्हीवर केलेल्या भाषणात झुमा यांनी पदत्यागाची घोषणा केल्याने आफ्रिका खंडातील या सर्वाधिक विकसित देशातील राजकीय अस्थिरता संपली आहे.
- यानंतर लगेचच संसदेने सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेले सिरिल रामपोसा यांची नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली.
- सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने (एएनसी) झुमा यांना पद सोडण्याचे आदेश दिले होते. परंतु झुमा यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत आपण पदत्याग करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
- विरोधी पक्षांनी झुमा यांच्याविरुद्ध संसदेत मांडलेला अविश्वास ठराव १५ फेब्रुवारी रोजी चर्चा व मतदानासाठी येणार होता.
- झुमा स्वत:हून पदावरून दूर झाले नाहीत तर या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून त्यांची हकालपट्टी करण्याचे संकेत एएनसीने दिले होते.
- तसे झाले तर गच्छंती अटळ आहे याची जाणीव ठेवून झुमा यांनी बदनाम होऊन पदावरून जाण्यापेक्षा स्वत:हून पायउतार होण्याचा पर्याय निवडला.
- २००९मध्ये एएनसीचे प्रमुख या नात्याने झुमा यांनी त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष एन्केबी यांना अशाच पद्धतीने पदत्याग करायला लावून स्वत: राष्ट्राध्यक्षपद पटकविले होते.
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना अटक होण्याची शक्यता
- भ्रष्टाचाराच्या २ वेगवेगळया प्रकरणात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- नेतान्याहू यांच्याविरोधात लाच स्वीकारणे, घोटाळा आणि विश्वासघात केल्याचे सबळ पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
- दुसरीकडे आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असून काहीही हाती लागणार नाही असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
- नेतान्याहू यांच्यावर परदेशातील उद्योजकांकडून सिगारेट, शॅम्पेन, ज्वेलरी अशा महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे.
- २००७ ते २०१६ दरम्यान नेतान्याहू यांनी स्वीकारलेल्या या भेटवस्तूंची एकूण किंमत अंदाजे २ लाख ८० हजार डॉलर्स आहे.
- अब्जोपती आणि हॉलिवूडचा निर्माता अरनॉन मिलचान याच्याबरोबर नेतान्याहू यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याचाही आरोप आहे.
- या भेटवस्तूंच्या मोबदल्यात नेतान्याहू यांनी मिलचानला करात सवलत देण्याचा प्रयत्न केला असा आरोप पोलिसांनी केला आहे.
डॉ. यशवंत मनोहर यांना कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार
- मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे.
- २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
- याआधी हा पुरस्कार विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, नाराणय सुर्वे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ यांना मिळाला आहे.
- डॉ. यशवंत मनोहर यांचे आजवर उत्थानगुंफा, मूर्तिभंजन, जीवनायन असे १० कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
- त्यांना महाराष्ट्र शासनाचा केसवसूत काव्य पुरस्कार, उत्थानगुंफाला शासनाचा उत्कृष्ट कवितासंग्रह असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा