चालू घडामोडी : ८ फेब्रुवारी
स्पेसएक्सद्वारे ‘फाल्कन हेवी’ अवकाश यानाचे प्रक्षेपण
- अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या कंपनीने ‘फाल्कन हेवी’ हे प्रचंड शक्तीशाली अवकाश यान अवकाशात सोडले.
- फ्लोरिडातील केनडी स्पेस सेंटर तळावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावले. फाल्कन हेवीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. याच फ्लोरिडातील तळावरुन नासाच्या चंद्र मोहिमेला सुरुवात झाली होती.
- फाल्कन रॉकेटचे वजन दोन अवकाश यानांइतके (सुमारे ६३.८ टन) आहे. २३० फूट लांबीच्या या यानात २७ मर्लिन इंजिन बसवण्यात आले आहे.
- या २३ मजली जंबो रॉकेटमध्ये पेलोड म्हणून ‘टेस्ला रोडस्टर’ ही स्पोर्ट्स कार ठेवण्यात आली होती.
- अवकाशयानातून निघाल्यानंतर टेस्ला कारने पृथ्वी आणि मंगळाच्या कक्षेत जाणे अपेक्षित होते पण ही कार आपला मार्ग भरकटली.
- या कारला अवकाशात तिच्या निश्चित मार्गाकडे पाठवण्यासाठी इंधनाचा स्फोट ज्या तीव्रतेने व्हायला हवा होता, तो झाला नाही त्यामुळे ही कार मार्ग भरकटली आहे.
- ही कार मंगळाची कक्षा ओलांडून सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या उल्का व अशनींच्या पट्ट्यात शिरली आहे.
- आता ती कुठवर पोहोचेल, कुठे जाऊन स्थिरावेल, बाह्य अवकाशाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किती काळ टिकेल, याविषयी अनिश्चितता आहे.
- मंगळावर मानवी वस्ती करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून मस्क यांच्या मोहिमेकडे पाहिले जात आहे.
- जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीने अंतराळ उड्डाण यशस्वी केले आहे.
प्रसिद्ध कथकली नर्तक मदावूर वासुदेवन नायर यांचे निधन
- केरळचे प्रसिद्ध कथकली नर्तक मदावूर वासुदेवन नायर यांचे आंचल येथील अगस्त्यकोड महादेव मंदिरात कथकली नृत्य सादर करीत असताना ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
- कथकली नृत्याची अजोड समर्पणाने आराधना केलेल्या नायर यांना आपल्या आवडत्या कलेची आराधना करीत असतानाच मृत्यू आला.
- तिरुअनंतपुरम येथे ७ एप्रिल १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामा कुरूप हे लोकनर्तक होते तर आई शास्त्रीय गायिका.
- सुरुवातीला त्यांचा ओढा कर्नाटकी शास्त्रीय संगीत व भक्तिगीतांकडे होता. पण नंतर ते नृत्याकडे वळले.
- त्यांना कंबडीकाली व कुथीयोत्तम या लोकनृत्यप्रकारात विशेष प्रावीण्य होते. वयाच्या तेराव्या वर्षी नायर यांनी कथकलीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
- मदावूर परमेश्वरन पिल्ले हे त्यांचे कथकलीतील पहिले गुरू. नंतर ते कुरिची कुंजन पणिक्कर यांनी सुरू केलेल्या कथकली कलारी या संस्थेत दाखल झाले. नंतर ते पद्मश्री चेंगानूर रामन पिल्ले यांचे शिष्य बनले.
- ते काठी, पाचा, वेलाथाडी, मिनुकू पात्रांच्या आविष्करणात तरबेज होते. तसेच त्यांनी हनुमान, हंसम, रावण, दुर्योधन, कीचक, जरासंध, हिरण्यकश्यपू, नरकासुर ही पौराणिकपात्रेही साकारली.
- भारताशिवाय सिंगापूर, हाँगकाँग, फिजी, इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका या देशात त्यांचे कार्यक्रम झाले होते.
- थुलासीवनम पुरस्कार, अल्लापुझा क्लब पुरस्कार, केरळीय कलाक्षेत्र पुरस्कार, तपस्या अभिनंदन पत्र, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण (२०११) असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना ५ वर्षांचा तुरुंगवास
- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश राष्ट्रवादी पार्टी (बीएनपी) या विरोधी पक्षाच्या प्रमुख प्रमुख बेगम खालेदा झिया यांना भ्रष्टाचारप्रकरणी ढाक्यातील न्यायालयाने ५ वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
- झिया ऑर्फनेज ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांच्या नावे परदेशांतून मिळालेल्या २१ दशलक्ष टका (सुमारे २.५२ लाख डॉलर) देणग्यांच्या रकमांचा खासगी वापरासाठी अपहार केल्याप्रकरणी त्या दोषी ठरल्या आहेत.
- या प्रकरणात झिया यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर चार जणांना १० वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
- २००१-२००६ या काळात बेगम झिया यांच्या नेतृत्वाखाली ‘बीएनपी’चे सरकार सत्तेवर असताना या दोन स्वयंसेवी संस्था केवळ कागदावर स्थापन केल्या गेल्या व त्यांच्या देणग्यांचा अपहार केला गेला, या आरोपावरून भ्रष्टाचार विरोधी आयोगाने हा खटला दाखल केला होता.
- हा खटला रद्द केला जावा यासाठी झिया यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात दोनदा याचिका केल्या होत्या. परंतु त्या फेटाळल्या गेल्या होत्या.
- या निर्णयाविरोधात झिया वरच्या न्यायालयात अपील करु शकतात. मात्र, येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणूका त्यांना लढवता येणार नाही.
- न्यायालयाने झिया यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर झिया समर्थकांनी न्यायालयाच्या परिसरात धुडगूस घातला.
- यामध्ये कमीत कमी ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर दोन मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या.
- बेगम खालेदा झिया या १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ अशा दोन वेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा