चालू घडामोडी : ३ फेब्रुवारी

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत विजेता

 • न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करत चौथ्यांदा विश्वचषक जिंकला.
 • याआधी मोहम्मद कैफ (२०००), विराट कोहली (२००८), उन्मुक्त चंद (२०१२) यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे.
 • ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले २१७ धावांचे आव्हान टीम इंडियाने आठ गडी राखून दहाहून अधिक षटके शिल्लक असतानाच पूर्ण केले.
 • या सामन्यात भारताकडून इशार पोरेल, शिवा सिंग, कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी २ तर शिवम मावीने १ बळी घेतला.
 • तुलनात्मक रित्या सोप्प्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मनजोत कालराने अवघ्या १०२ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
 • त्याला हार्वीक देसाई (नाबाद ४७), कर्णधार पृथ्वी शॉ (२९) आणि शुभम गील (३१) या खेळाडूंनी मोलाची साथ दिली.
 • संपूर्ण स्पर्धेत धावांचा पाउस पाडणाऱ्या शुभमन गिलला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले.
 • या विजयाबरोबरच विक्रमी ४ वेळा १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
 • बीसीसीआयने विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला ३० लाख, प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख तर सपोर्ट स्टाफला २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 • मॅन ऑफ द मॅच : मनजोत कालरा
 • मॅन ऑफ द सिरीज : शुभमन गिल

बीएचयूच्या कुलगुरुपदी बाळू आनंद चोपडे

 • औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बाळू आनंद चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • गेल्यावर्षी बीएचयूमध्ये मुलींची छेडछाड झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होते.
 • ही परिस्थिती हाताळण्यात बीएचयूचे कुलगुरू प्रा. जी एस त्रिपाठी यांना अपयश आल्यामुळे त्यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठविण्यात आले होते. त्यामुळे सध्या बीएचयूमधील कुलगुरुपद रिक्त होते.
 • त्यानंतर कोणतेही आरोप नसलेले आणि पदासाठी पात्र ठरणारे कुलगुरू शोधण्याचे प्रक्रिया राष्ट्रपतींनी सुरू केली होती.
 • बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडे यांची मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ४ जून २०१४ रोजी नियुक्ती करण्यात आली होती.

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या शिक्षेला स्थगिती

 • मालदीव येथील सर्वोच्च न्यायालयाने तेथे लोकशाही पद्धतीने बनलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधातील शिक्षेला स्थगिती देत त्यांच्यावर नव्याने दहशतवादविरोधी खटला चालविण्याचा निर्णय दिला.
 • तसेच अटकेत असलेले मोहम्मद नशीद यांच्या १२ समर्थक नेत्यांच्या सुटकेचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 • हे खटले ज्या पद्धतीने चालवण्यात आले त्यात देशाची घटना आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली झाली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 • या निर्णयानंतर मालदीव लोकशाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात जल्लोष केला. या वेळी पोलिसांशी झटापट झाल्याने काही ठिकाणी दंगलीचे स्वरूप आले होते.
 • या निकालामुळे ८५ सदस्यांच्या संसदेमध्ये गय्यूम पुरोगामी पक्षाचे मताधिक्य कमी होणार असून विरोधी पक्षाचे संख्याबळ १२ने वाढणार आहे.
 • अद्याप या नेत्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आलेले नाही. या नेत्यांना त्यांचे सदस्यत्व पुन्हा मिळणार आहे.
 • मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष : अब्दुल्ला यामीन
पार्श्वभूमी
 • मोहम्मद नशीद हे २००८मध्ये लोकशाहीच्या मार्गाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष बनले. २०१२साली त्यांना राजीनामा दिला.
 • मोहम्मद नशीद यांनी सत्ताकाळात तेथील मुख्य न्यायमूर्ती अब्दुल्ला मुहम्मद यांना अटक केली होती.
 • या प्रकरणात नशीद यांच्यासह इतर १२ नेत्यांवर दहशतवादविरोधी गुन्हे दाखल करून २०१५मध्ये १३ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
 • यानंतर नशीद यांनी वैद्यकीय उपचाराचे कारण देत ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता. तर त्यांच्या पक्षाचे १२ नेते कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
 • नशीद यांचा २०१३मध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी निसटत्या मताधिक्क्याने पराभव केला होता.
भारताकडून निर्णयाचे स्वागत
 • मालदीवच्या नेत्यांना सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले आहे.
 • हा लोकशाहीचा विजय असून तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा