चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी

५ वर्षाखालील मुलांसाठी आता बाल आधार कार्ड

 • युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAIने आता बाल आधार कार्ड लाँच केले आहे.
 • ५ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळया रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे. UIDAIने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली.
 • त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे बाल आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालेल. परंतु मान्यताप्राप्त शालेय संस्थेचे बालकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
 • सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी UIDAIने निळया रंगाच्या आधार कार्डांची काही इन्फोग्राफीक्सही पोस्ट केली आहेत.
 • या बाल आधार कार्डासाठी बायोमेट्रीक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. परंतु मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा यांची बायोमेट्रीक चाचणी बंधनकारक असेल.
 • मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर पालक जवळच्या आधार केंद्रात जाऊन बाल आधार कार्ड अपडेट करु शकतात. वयाच्या ५व्या आणि १५वर्षी बायोमेट्रीक पद्धतीने अपडेट करणे बंधनकारक आहे.
 • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही ते पूर्णपणे मोफत असेल.
 • १ ते ५ वर्ष वयोगटासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही. मात्र परदेशातील शैक्षणिक कार्यक्रम आणि अन्य सरकारी स्कॉलरशिपसाठी बाल आधारकार्ड उपयुक्त ठरु शकते.
 चेहरा बनणार आधार 
 • UIDAIने ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी लोकांची चेहऱ्याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे.
 • बऱ्याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते.
 • यासाठी सरकारने ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली असून, १ जुलै २०१८ पासून ती लागू होणार आहे.

वांद्रे येथे मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ

 • वाचक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे देशातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे मुंबई महापालिकेच्या जागेत सुरू होणार आहे.
 • यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनात होणार आहे.
 • वांद्रे पश्चिम येथे हे विद्यापीठ सुरू व्हावे याकरिता भाजपाचे आमदार आशिष शेलार या विषयावर दीड वर्षापासून काम करत आहेत.
 • वांद्रेमधील बँडस्टँड येथील जागा मुंबई महापालिकेने विद्यापीठाला देण्याचे मान्य केले आहे.
 • राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे.
 • महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनातूनही करण्यात आली. मात्र गेल्या साठ वर्षांत त्याला मूर्त रुप आलेले नाही.
 • ग्रंथालीचे संस्थापक : दिनकर गांगल
 विद्यापीठाची रचना 
 • मराठी भाषेतील सर्व ग्रंथ व पुस्तकांनी सज्ज असे अद्ययावत ग्रंथालय असेल.
 • मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.
 • परीक्षा, संशोधन, लेखन असे उपक्रम विद्यापीठामार्फत राबविण्यात येतील.
 अन्य भाषांची विद्यापीठे 
 • केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (२००४), संस्कृत (२००५), तेलुगू व कन्नड (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
 • त्यांपैकी तमीळ (१९८१), तेलुगू (१९८५), कन्नड (१९९१), मल्याळम (२०१२) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत.
 • संस्कृत भाषेचीही केंद्रीय, अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत आहेत.
 • शिवाय ऊर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकीय भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठ (१९९८) हे हैद्राबादला आहे, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (१९९७) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे.

अनुभवी सनदी अधिकारी टीएसआर सुब्रमणियन यांचे निधन

 • देशातील अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर आपल्या प्रशासकीय कौशल्याची नाममुद्रा उमटवणारे अनुभवी व अभ्यासू सनदी अधिकारी टीएसआर सुब्रमणियन यांचे २६ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 • त्यांचा जन्म १९३८साली मद्रासमध्ये झाला. कोलकात्याच्या सेंट झेवियर्समधून त्यांनी गणितात पदवी तसेच स्नातकोत्तर पदवी घेतली. तर लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधुन पदविका घेतली.
 • उत्तर प्रदेश केडरचे सनदी अधिकारी म्हणून १९६१मध्ये त्यांची कारकीर्द सुरू झाली. गॅट कराराच्या काळात देशाचे व्यापार धोरण ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
 • एच डी देवेगौडा, आय के गुजराल, अटलबिहारी वाजपेयी या तीन पंतप्रधानांच्या काळात त्यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम केले.
 • संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचे सल्लागार असताना त्यांनी आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका भागातील विकसनशील देशांच्या हिताचे निर्णय घेतले.
 • केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव असताना वाहतूक, वीज, दूरसंचार या क्षेत्रांत पायाभूत सुविधा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय ठरला.
 • २०१६मध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत अहवाल दिला होता, त्यात इंडियन एज्युकेशन सर्व्हिस सुरू करण्याची शिफारस होती.
 • माहिती अधिकार कायद्याचा पहिला मसुदा टीएसआर यांनीच तयार केला होता. त्यांनी सरकारच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी नागरी संहिता तयार केली. दूरसंचार सुधारणांचे पर्व त्यांच्याच काळात सुरू झाले.
 • जवळपास ३६ वर्षांच्या सनदी सेवा कारकीर्दीत त्यांनी गृह, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, माहिती व प्रसारण, खाण व खनिज, महसूल, पर्यटन अशा अनेक खात्यांत काम केले. निवृत्तीनंतर अनेक कंपन्यांचे ते सल्लागार होते.
 • त्यांनी ‘जर्नीज थ्रू बाबूलँड’ या पुस्तकात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याशी त्यांचे मुख्य सचिव असताना झालेले मतभेद व इतर अनेक बाबींचा उल्लेख केला आहे.

विकीपिडीयाच्या स्पर्धेमध्ये जेजुरीच्या फोटोला पहिला क्रमांक

 • जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकीपिडीयाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खंडेरायाची जेजुरीच्या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे.
 • जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो २०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो ठरला आहे.
 • विकीपीडीयाने #WikiLovesMonuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते.
 • यामध्ये ४५ हून अधिक देशांमधील नागरिकांनी त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले.
 • त्यापैकी प्रशांत खारोटे यांनी टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे.
 • विकी लव्ह मॉन्यूमेन्ट्स ही स्पर्धा २०१०मध्ये नेदरलॅण्डमध्ये स्थानिक स्तरावर सुरु करण्यात आली होती.
 • २०११साली ही स्पर्धा सर्व युरोप देशांमध्ये तर २०१२पासून जगभरातील छायाचित्रकारांसाठी आयोजित करण्यात येत आहे.

सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री

 • संस्मरणीय अशा महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवने सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला.
 • जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या महेंद्र चव्हाण, माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने विजेतेपद पटकावले.
 • फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुरूषांमध्ये पुण्याचा रोहन पाटणकर तर महिलांमध्ये पुण्याचीच स्टेला गौडे अजिंक्य ठरली.
 • संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपद तर उपनगरने सांघिक उपविजेतेपद पटकावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा