भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभव झाल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गेल्या वर्षी ग्लासगो येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनिशप तसेच दुबईत पार पडलेल्या सुपरसीरिजच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे.
इंडिया ओपनच्या उत्कंठापूर्ण अंतिम सामन्यात अमेरिकन खेळाडू झांग बेनवेईने तिचा २१-१८, ११-२१, २२-२० असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
बेनवेईचे हे पहिलेच सुपर सिरीज विजेतेपद ठरले. याआधी तिने २०१६मध्ये फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती.
पुरुष गटात चीनच्या शेई युकी याला विजेतेपद मिळाले. त्याने तृतीय मानांकित चोयू तिएनचेन याचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला.
मराठा लाइट इन्फन्ट्रीला २५० वर्षे पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाऱ्या ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास ३ फेब्रुवारी रोजी २५० वर्षे पूर्ण झाली.
या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात दिल्लीतून होणार आहे.
दिल्ली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठा लाइट इन्फन्ट्रीची अभिमानास्पद शौर्यगाथा विषद करणाऱ्या ‘व्हिक्टरी अँड व्हेलॉर’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन होईल.
विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींचे ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्लीत झाले.
या पुस्तकात परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा टाळावा याबाबत विद्यार्थ्यांना मौलीक सल्ले देण्यात आले आहेत.
पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अनेकदा विद्यार्थ्यांना सल्ले देत असतात. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी ते विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमही करतात.
यातूनच या पुस्तकाची कल्पना आकाराला आली आणि त्यांनी या विषयावरील आपल्या विचारांचे संकलन करण्याचे ठरवले.
२०८ पानांचे हे पुस्तक पेंग्विन रँडन हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले असून, ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित करून देशभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या पुस्तकात, कुठलाही तणाव किंवा चिंता याशिवाय परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी जवळजवळ २५ ‘मंत्र’ दिले आहेत.
परीक्षेशी संबंधित ताणाशी कसे जुळवून घ्यावे, परीक्षेच्या काळात शांत कसे राहावे, तसेच परीक्षा संपल्यानंतर काय करावे यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्यात भर देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा