मुंबईत पार पडलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४,१०६ सामंजस्य करार झाले.
उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्रासाठी हा एक मैलाचा दगड ठरला.
या परिषदेला उद्योजकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला आहे.
या परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले होते.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी झाले.
तर २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.
जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी २०१६मध्ये मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. या परिषदेत ८ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते.
अभिनेते कमल हसन यांचा तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश
दाक्षिणात्य अभिनेते कमल हसनने तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला असून, त्यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
कमल हसन यांनी मदुराईत घेतलेल्या एका सभेत आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचेही अनावरण केले.
एका ताऱ्याभोवती सहा हातांनी केलेली गुंफण असे हसन यांच्या नवीन पक्षांचे चिन्ह असणार आहे.
या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हसन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली.
कोळसा खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्याचा निर्णय
कोळसा खाणी खासगी क्षेत्राला व्यावसायिक वापरासाठी खुल्या करण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
१९७३साली कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच खाणी खासगी क्षेत्रासाठी खुल्या करण्यात येत आहेत.
या निर्णयाकडे अत्यंत महत्त्वाची सुधारणा म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कोल इंडिया या कंपनीची कोळसा खाणी क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.
आजपर्यंत कॅप्टिव्ह वीज निर्मितीसाठीच खासगी कंपन्यांना कोळसा खाणी दिल्या जात होत्या. आता ई-लिलावाद्वारे देशातील खासगी व जागतिक कंपन्यांनाही खाणपट्टे दिले जातील. या कंपन्या कोळसा काढून विकू शकतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा