सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रिच कँडी शाखेमध्ये ११,४०० कोटी रुपयांचा देशातील सर्वांत मोठा बँक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
या घोटाळ्यात अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या काही कंपन्या तसेच अन्य नामांकित जवाहिरे कंपन्यांवर संशय आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी फसवणुकीच्याद्वारे बँकेच्या परदेशस्थ शाखांमधून नीरव मोदी व त्यांच्या कंपन्यांना कर्ज उभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली.
मात्र त्याविषयी बँकेच्या यंत्रणेत कोणतीच नोंद झाली नव्हती. या संशयाच्या आधारेच बँकेने कंपन्यांविरोधात गेल्या महिन्यात तक्रार दिली होती.
यावेळी नीरव मोदी यांची चौकशी करण्यात आली होती आणि २८२ कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते.
पंजाब नॅशनल बँकेकडून या घोटाळ्याप्रकरणी दोन तक्रारी दाखल झाल्या असून सीबीआय तसेच अंमलबजावणी संचालनालयाने याप्रकरणी नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी व कारवाईला सुरुवात केली आहे.
कारवाई होणार हे स्पष्ट होताच नीरव मोदी देशाबाहेर पलायन करून स्वित्झर्लंडमधील दावोस येथे गेल्याची शक्यता आहे.
सीबीआयने नीरव मोदी, त्यांची पत्नी अमि, भाऊ निशाल आणि आणखी एका नातेवाईकावर ३१ जानेवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील कलमांतर्गत सध्या मोदी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सीबीआयने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या गोकूलनाथ शेट्टी आणि मनोज खरात या बँकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे.
नीरव मोदी याच्या देशभरातील १७ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापे टाकले आहेत.
या कारवाईत मोदीच्या मालकीच्या गितांजली जेम्स या दुकानांतील ५१०० कोटी रुपयांचे हिरे जडजवाहीर आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर मोदीच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील ईडीने जप्त केल्या आहेत.
त्याचबरोबर ईडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून नीरव मोदी, त्याची पत्नी अमी मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.
नीरव मोदीच्या मुंबई, सुरत आणि नवी दिल्लीतील कार्यालये, शोरुम्स आणि वर्कशॉप्सवरही ईडीने छापे मारून तेथील मालमत्ता जप्त केली आहे.
याचसोबत सीबीआयने नीरव मोदी याच्या मुंबईतल्या कुर्ला परिसरातल्या घराला सील ठोकले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा