चालू घडामोडी : १५ फेब्रुवारी

हॉकी इंडियाला ओडीशा सरकारचे प्रायोजकत्व

  • ओडीशा सरकारने पुढील ५ वर्षांसाठी हॉकी इंडियाचे प्रायोजकत्व स्विकारले आहे.
  • ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या एका सोहळ्यात याची घोषणा करण्यात आली.
  • या सोहळ्याला भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघातले सर्व खेळाडू, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा हजर होते. या सोहळ्यादरम्यान भारतीय संघाच्या नवीन जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
  • २०१८साली होणारा हॉकी विश्वचषक हा ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे पार पडला जाणार आहे.

के पी शर्मा ओली नेपाळचे नवे पंतप्रधान

  • राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या नेपाळमध्ये युएमएल पक्षाचे अध्यक्ष के पी शर्मा ओली यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे.
  • चीनधार्जिण्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे ओली यांनी यापूर्वी ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ या कालावधीत देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते.
  • राजकीय अस्थिरतेमुळे सातच महिन्यातच शेर बहादूर देऊबा यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ते देशाचे ४०वे पंतप्रधान होते.
  • यापूर्वी मे २०१७मध्ये पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांच्या राजीनाम्यानंतर शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता.
  • प्रचंड यांनी अवघ्या नऊ महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते नेपाळचे ३९वे पंतप्रधान होते.
  • नेपाळच्या संसदीय आणि स्थानिक निवडणुकीत देबुआ यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सीपीएनच्या पाठिंब्याने देबुआ नेपाळचे पंतप्रधान झाले होते.
  • डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ओली नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-युएमएल आणि प्रचंड नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-माओवादी यांच्या आघाडीने संसदेतील २७५ पैकी १७४ जागा जिंकल्या.
  • ओली यांचा सीपीएन-यूएमएल पक्ष २७५ सदस्यांच्या संसदेत १२१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
  • नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ओली व सीपीएन- यूएमएलच्या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ओली हे नेपाळचे ४१ वे पंतप्रधान आहेत.
  • सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा आहे.

ज्येष्ठ पत्रकार व लेखक मुझफ्फर हुसेन यांचे निधन

  • इस्लामी देशांतील विविध घडामोडींवर मराठीतून अभ्यासपूर्ण लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन यांचे १३ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 
  • २० मार्च १९४० रोजी जन्मलेले मुझफ्फर हुसेन महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून सर्वांना सुपरिचित होते.
  • पाकिस्तान वा अरब देशांतील महत्त्वाच्या घटनांवर विविध वृत्तपत्रांचे संपादक त्यांना आवर्जून लिहायला सांगत.
  • कोणताही पूर्वग्रह न ठेवता एखाद्या विषयाचे नेमके विवेचन करणे, हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा पैलू होता.
  • मुझफ्फर हुसेन यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली. त्यापैकी इस्लाम व शाकाहार, मुस्लिममानसशास्त्र, दंगों में झुलसी मुंबई, अल्पसंख्याक वाद : एक धोका, इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन, लादेन, दहशतवाद आणि अफगाणिस्तान, समान नागरी कायदा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  • मुंबईतील विश्व संवाद केंद्राच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा जवळचा संबंध होता. परभणी येथे झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
  • २००२साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकाकिता पुरस्कार (२०१४) देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • याशिवाय राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कार त्यांना मिळाले होते.

निवडणूकीच्या प्रक्रियेसाठी सरकारचे ERONET अॅप्लिकेशन

  • सरकारने निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ERONET (Electoral Rolls Services Net) हे अॅप्लिकेशन तयार केले आहे.
  • यामुळे मतदारांना आता मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदार कार्डाची नोंदणी, पत्ता आणि नाव बदलणे या कामांसाठी मतदार केंद्रावर जाण्याची आवश्यकता उरणार नाही.
  • आतापर्यंत २२ राज्ये या अॅप्लिकेशनशी जोडण्यात आली आहेत. जून महिन्यापर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये जोडले जाणार आहेत.
  • या अॅप्लिकेशनमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने सुविधा करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा