भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी महिला वन-डे क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलनने वन-डे क्रिकेटमधला आपला २०० वा बळी टिपला.
२०११ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळताना झुलनने ३२ धावांत ६ बळी घेतले होते. ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे.
सध्या सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत झुलन गोस्वामी २०० बळींसह आघाडीवर आहे.
यानंतर ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रीक दुसऱ्या (१८० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचीच लिसा स्थळेकर (१४६ बळी) तिसऱ्या स्थानावर आहे.
त्याखालोखाल चौथा स्थानी वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद (१४५ बळी) आणि पाचव्या स्थानी भारताची नितू डेव्हीड (१४१ बळी) आहेत.
सुमिता मित्रा यांचा ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
भारतीय वंशाच्या कल्पक वैज्ञानिक सुमिता मित्रा यांचा अमेरिकेत ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
एकंदर ९८ पेटंट सुमिता मित्रा यांच्या नावावर आहेत. अमेरिकन केमिकल सोसायटीत त्या विज्ञान प्रशिक्षक होत्या.
गेली तीन दशके रसायनशास्त्रातील ज्ञानाचा वापर त्यांनी मानवी कल्याणासाठी केला आहे. दातांचे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांनी नॅनोकणांवर आधारित दंतभरण (नॅनो डेंटल फिलर्स) पदार्थ तयार केले.
त्यांनी जे दंतभरण तयार केले आहे त्याचे नाव फिलटेक असून, त्याचे रीतसर व्यापारचिन्हही घेण्यात आले आहे. थ्री एम ओरल केअरमध्ये काम करताना त्यांनी हे दंतभरण तयार करण्यात यश मिळवले.
त्यांनी अनेक दंत उत्पादने तयार केली असून, त्यांनी तयार केलेली दंतभरणे भक्कम असल्याने दंतरोगतज्ज्ञांकडे वारंवार जाण्याची वेळ येत नाही.
त्यांच्या या संशोधनाने थ्री एम कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा फायदा झाला हेही एक व्यावसायिक यश आहे.
मित्रा या मूळ पश्चिम बंगालच्या असून, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी घेतली. कार्बनी रसायनशास्त्रात त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली.
उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी मिशिगन विद्यापीठातून कार्बनी व बहुवारिक रसायनशास्त्रात पीएचडी केली.
थ्री एम कंपनीतील ३० वर्षांच्या सेवेनंतर २०१०मध्ये त्या निवृत्त झाल्या, आता त्या मित्रा केमिकल कन्सलटन्सी ही कंपनी त्यांच्या पतीसह चालवतात.
सुमिता यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. २००९मध्ये त्यांना हिरोज ऑफ केमिस्ट्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा