सीतांशु यशश्चंद्र मेहता यांना सरस्वती सन्मान जाहीर
गुजराती प्रयोगशील कवी सीतांशु यशश्चंद्र मेहता यांना त्यांचं ‘वखर’ या काव्यसंग्रहासाठी बिर्ला फाऊंडेशनकडून दिला जाणारा ‘सरस्वती सन्मान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कच्छमध्ये जन्मलेल्या सीतांशु यशश्चंद्र मेहता यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. मुंबई विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले आहे.
फुलब्राइट शिष्यवृत्तीतून त्यांनी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून सौंदर्यशास्त्र व तौलनिक साहित्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यांचे मोहेंजोदारो, ओदिसियास नु हालेसू, जटायू, अश्वत्थामा, वखर हे काव्यसंग्रह लोकप्रिय ठरले आहेत.
त्यांच्या जटायू या काव्यसंग्रहाला १९८७साली साहित्य अकादमी पुरस्कारही मिअला आहे.
कवितांबरोबरच त्यांचे नाटय़लेखनही गुजराती साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. त्यांच्या केम माकनजी क्या चाल्या, आ माणस मद्रासी लागे छे, ठोकर, वैशाखी कोयल आदी नाटकांनी गुजराती रंगभूमी समृद्ध झाली आहे.
मोजकेच पण सघन समीक्षालेखन, तसेच अनेक परदेशी भाषांतील साहित्याचे गुजराती अनुवादही त्यांनी केले आहेत.
साहित्य अकादमीच्या ‘एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर’चे ते एक संपादक आहेत.
यशश्चंद्र यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्राध्यापक व नंतर सौराष्ट्र विद्यापीठात कुलपती म्हणूनही काम केले आहे.
मराठा व कुणबी समाजाच्या विकासासाठी ‘सारथी’ची स्थापना
शेतीआधारित मराठा व कुणबी या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे पर्याय शोधण्यासाठी‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मराठा व कुणबी समाजाच्या प्रमुख समस्यांवर कायस्वरूपी शास्त्रोक्त व संशोधनात्मक पद्धतीने पर्यायी उपाययोजना आखण्याचे काम ही संस्था करणार आहे.
या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ७९ पानांचा सविस्तर अहवाल सरकारला सादर केला आहे.
यामध्ये ‘सारथी’ या संस्थेची कार्यपद्धती व विविध विकासाचा कार्यक्रम सखोल संशोधनानंतर नमूद केला आहे.
शेती, शेतकरी, रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात मराठा व कुणबी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या ‘सारथी’ या संस्थेचा आराखडा या अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे.
या संस्थेच्या माध्यमातून मराठा व इतर लक्षित गटांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणे शक्य असून, त्यातून समाजाच्या बहुतांश समस्यांवर मात करणे शक्य असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा