शेन वॉटसनने ८ षटकार आणि ११ चौकारांसह केलेल्या ११७ धावांच्या जबरदस्त नाबाद खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या तिसऱ्या विजेतेपदावर मोहोर उमटविली.
स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे गेली दोन वर्षे आयपीएल बंदीमुळे बाहेर असलेल्या या संघाने पुनरागमन करताच थेट विजेतेपदच पटकाविले.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या १७८ धावांना चेन्नईने चोख प्रत्युत्तर देत ८ विकेटस आणि ९ चेंडू राखून विजयाची नोंद केली.
चेन्नईचे हे तिसरे विजेतेपद ठरले. या कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ३ विजेतीपदे पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली.
आतापर्यंतच्या आयपीएल फायनलमध्ये शतकी खेळी करणारा वॉटसन हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ५७ चेंडूंत नाबाद ११७ धावा केल्या. २००८मध्ये पार पडलेल्या पहिल्या आयपीएलमध्ये शेन वॉटसन मालिकावीर ठरला होता.
अंतिम सामन्यात हैदराबादला नमवत चेन्नईने एकाच स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला चारवेळा नमवण्याचा विक्रम केला.
ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी उत्तम पाचारणे
ललित कलांच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी देशातील आघाडीचे शिल्पकार उत्तम पाचारणे यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे.
पाचारणे यांची प्रतिष्ठित कलासंस्थेवर निवड झाल्याने राजधानीतील कला दरबारात महाराष्ट्राचा दबदबा वाढला आहे. ते पुढील ३ वर्षे या पदावर कार्यरत असतील.
पाचरणे एक प्रख्यात कलाकार आणि शिल्पकार आहेत. त्यांनी कला क्षेत्राच्या विविध पदांवर काम केले आहे.
ते सर जे जे स्कूल ऑफ आर्टस मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून पदवीधारक आहेत. त्यांनी अंदमानातील स्वातंत्र्यज्योतीची साकारलेली प्रतिकृती प्रसिद्ध आहे.
त्यांनी तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किमान ८ पुतळे महाराष्ट्रात आहेत तर लखनौ विद्यापीठात १३ फुटी शिवपुतळा आहे.
याशिवाय शाहू महाराजांचा पुतळा, सावरकरांचा पुतळा, मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ अशी अनेक शिल्पे त्यांनी साकारली आहेत.
सध्या, ते गोवा कला अकादमीचे सदस्य आणि पु.ल देशपांडे राज्य ललित कला अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीचे ते माजी अध्यक्ष आहेत.
त्यांना राष्ट्रीय ललित कला पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
पतंजलीच्या स्वदेशी समृद्धी सिमकार्डचे अनावरण
बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करत आपली सिमकार्ड बाजारात आणली आहेत.
यासाठी कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)शी करार केला आहे.
हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण करण्यात असून, या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिमकार्ड असे नाव देण्यात आले आहे.
आता सुरुवातीच्या टप्प्यात या सिमकार्डचा वापर पतंजलीचे कर्मचारी आणि अधिकारी यांना करता येणार आहे.
त्यानंतर हे कार्ड देशभरात असणाऱ्या बीएसएनएलच्या ५ लाख काऊंटर्सवर सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
जनक्षोभानंतर वेदांता ग्रुपचा स्टरलाइट कॉपर प्रकल्प बंद
वेदांता ग्रुपच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर तामिळनाडू सरकारने हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुतिकोरिन येथील या प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेता प्रकल्प बंद करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
तुतिकोरिन येथे वेदांता स्टरलाइट कॉपर प्रकल्प असून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार होता. यासाठी काम देखील सुरु झाले होते.
गेल्या १०० दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक लढा देत होते. या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.
तसेच भूजल प्रदुषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचेही स्थानिकांनी म्हटले होते.
भारतीय विमानकंपन्या जगात किफायतशीर
किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे.
‘ग्लोबल फ्लाइट प्रायसिंग रिपोर्ट’च्या मते या यादीत एअर इंडिया एक्स्प्रेस दुसऱ्या तर, इंडिगो पाचव्या स्थानी आहे.
याशिवाय या यादीमध्ये जेट एअरवेज (१२व्या) आणि एअर इंडिया (१३व्या) या दोन भारतीय कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
हा अहवाल मेलबर्न येथील ‘रोम टू रियो’ या वेबसाइटने तयार केला आहे. यात प्रति किलोमीटर प्रवासाला येणाऱ्या खर्चाच्या आधारे जगभरातील २०० मोठ्या प्रवासी विमानकंपन्यांची तुलना करण्यात आली आहे.
एअर एशिया एक्स्प्रेस या विमानकंपनीने यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. या कंपनीचा प्रति किलोमीटरसाठी सरासरी प्रवासी खर्च ०.०८ डॉलर आहे.
या अहवालानुसार जगभरातील सर्वात स्वस्त पाच प्रवासी विमान कंपन्यांमध्ये चार कंपन्या आशिया खंडातील आहेत.
टॉप ५ कंपन्यांमध्ये इंडोनेशिया एअर एशिया आणि प्रायमेरा एअरलाइन्स या अन्य दोन कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या यादीतील टॉप १० मध्ये एकाही ब्रिटिश आणि अमेरिकन कंपनीचा समावेश झालेला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा