ई-वे बिल प्रणाली ३ जूनपासून सर्व राज्यांसाठी अनिवार्य
आंतरराज्य मालवाहतुकीसाठी केंद्र सरकारने लागू केलेली ई-वे बिल प्रणाली ३ जूनपासून सर्व राज्यांसाठी अनिवार्य होणार आहे. ही प्रणाली १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
पन्नास हजार किंवा त्याहून अधिक किंमतीच्या मालाची ने-आण दोन किंवा अधिक राज्यांमधून होत असल्यास ही प्रणाली लागू होईल.
दुसऱ्या राज्यात प्रवेश करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकाला ई-माध्यमातून त्या देयकावरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरावा लागेल. या कराची पावती सादर केल्यानंतर संबंधित वाहनाला दुसऱ्या राज्यात प्रवेश मिळेल.
मालवाहतुकीतील जीएसटीमध्ये करचुकवेगिरी होऊ नये व हे कर संकलन सुलभ रीतीने व्हावे यासाठी सरकारने ही पद्धत सुरू केली आहे.
गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, हरयाणा आदी २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ही प्रणाली सुरू झाली आहे.
उर्वरित राज्यांत ही प्रणाली ३ जूनपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार ही प्रणाली महाराष्ट्रात ३१ मेपासून तर, पंजाब व गोवा येथे १ जूनपासून सुरू होईल.
सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे निधन
सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. द. रा. पेंडसे यांचे २२ मे रोजी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. टाटा समूहाचे वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
६ सप्टेंबर १९३० रोजी पुणे येथे जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली.
पुढे त्यांनी केंब्रिज विद्यापाठीतून बी.ए. (ऑनर्स) करून १९५७मध्ये याच विद्यापीठातून एम.ए. केले.
१९६७मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थसल्लागार म्हणून ते दाखल झाले होते. सुमारे २० वर्षे टाटा उद्योगसमूहाचे अर्थसल्लागार होते.
टाटा समूहात सामील होण्याआधी भारत सरकारच्या वित्त, व्यापार व उद्योग मंत्रालयामध्येही डॉ. पेंडसे यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या.
आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य गुणवत्तेमुळे अनेक शेअर बाजार व वायदेबाजारांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
डॉ. पेंडसे यांच्या अर्थशास्त्राची भाषा मात्र, सहज आणि प्रत्येकास सहज आकलन होईल एवढी सोपी होती.
डॉ. द. रा. पेंडसे यांची ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अॅडव्हाइस’ ही संस्था वित्तीय सल्लागार क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर होती.
एबी डिव्हीलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने २३ मे रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.
गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे क्रिकेट सामने खेळतो आहे, त्यामुळे थकलो असल्याचे सांगत डीव्हिलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
मैदानात ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज अशी ओळख असलेला डीव्हिलियर्स रिव्हर्स स्विप, पॅडल स्विप, अपर कट यासारखे एकाहून एक सरस फटके सहज खेळतो.
मैदानात स्वभावाने शांत असलेल्या डिव्हीलियर्सची फलंदाजीतली कारकिर्द मात्र चांगलीच आक्रमक राहिलेली आहे.
एबीडीने आतापर्यंत कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून २०,०१४ पटकावल्या आहेत.
एबीडीने २००४साली कसोटी क्रिकेटमध्ये, २००५साली वन-डे क्रिकेटमध्ये व २००६साली टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केले.
यानंतर आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपदही भूषविले. मात्र आपल्या संघाला विश्वचषक मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला.
एबी डिव्हीलियर्सची कारकीर्द
सामने
धावा
सर्वोच्च धावसंख्या
सरासरी
शतक
अर्धशतक
कसोटी
११४
८७६५
२७८*
५०.६६
२२
४६
वन-डे
२२८
९५७७
१७६
५३.५०
२५
५३
टी-२०
७८
१६७२
७९*
२६.१२
१०
-
आरोग्यसेवांच्या बाबतीत जगात भारत १४५व्या स्थानी
आरोग्यसेवेची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांचा दर्जा, या संदर्भात वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, १९५ देशांच्या यादीत भारताचा १४५वा क्रमांक लागतो.
या यादीत चीनसह बांगलादेश, श्रीलंका, भूतान यांसारख्या छोट्या शेजाऱ्यांनीही भारताला मागे टाकले आहे.
आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता याबाबतीत भारताला ४१.२ गुण देण्यात आले आहेत. १९९०मध्ये ते २४.७ इतकेच होते.
जरी भारताच्या एचएक्यू म्हणजे हेल्थकेअर अॅक्सेस अँड क्वालिटी निर्देशांकाने २००० ते २०१६ या काळामध्ये वेगाने झेप घेतली असली तरी सर्वात चांगल्या आणि सर्वात कमी गुणांमधील दरीही रुंदावल्याचे दिसून येते.
२०१६च्या आकडेवारीत गोवा आणि केरळ या राज्यांनी सर्वाधिक म्हणजे ६० पेक्षा जास्त गुण आहेत तर आसाम आणि उत्तरप्रदेशाला सर्वात कमी म्हणजे ४० पेक्षा कमी गुण आहेत.
भारतापेक्षा चीन (४८), श्रीलंका (७१), बांगलादेश (१३३), भूतान (१३४) यांची स्थिती चांगली आहे.
तर नेपाळ (१४९), पाकिस्तान (१५४), अफगाणिस्तान (१९१) यांच्यापेक्षा भारताची स्थिती चांगली असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
या यादीत आईसलँड, नॉर्वे, नेदरलँडस, लक्झेंबर्ग हे देश पहिल्या चार क्रमांकांवर आहेत. तर फिनलंड आणि ऑस्ट्रेलिया संयुक्तरीत्या ५व्या स्थानी आहेत.
जगातील सर्वात लहान वायरलेस रोबोचा शोध
अमेरिकेतील संशोधक योगेश चुकेवाड व त्यांच्या चमूने युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातील सर्वात लहान वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावला आहे.
किटकासारख्या दिसणाऱ्या या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन १९० मिलिग्राम आहे.
हे संशोधक ब्रिसबेन येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अॅण्ड ऑटोमेशन’मध्ये हा शोध सादर करणार आहेत.
संशोधक योगेश चुकेवाड हे भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत.
त्यांनी आयआयटी मुंबई येथे बी.टेक., तर अमेरिकेत एम.एस. केले आहे. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्टनमध्ये पी.एच.डी. करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा