चालू घडामोडी : ३० मे

मूडीजकडून भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट

 • भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे.
 • यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी मूडीजकडून वर्तवण्यात आला होता.
 • मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजने वर्तवला आहे.
 • खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
 • अर्थात २०१९मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.
 • समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चांगला राहील.
 • येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटीचा परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात या पतनिर्धारण संस्थेने नमूद केले आहे.
 • जगभरातले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करताना पतनिर्धारण संस्थांच्या रेटिंगला महत्त्व देतात. त्यामुळे मूडीजसारख्या संस्थांच्या अहवालाकडे जगाचे लक्ष असते.
 • जर या संस्थांनी एखाद्या देशाचा पतदर्जा कमी केला तर त्या देशामध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओघ मंदावण्याची भीती असते.

भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त

  Vikas Gowda
 • भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा याने १५ वर्षाच्या कारकिर्दीनंतर वयाच्या ३५व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विकासने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
 • भारतातर्फे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१४मध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकणारा विकास हा एकमेव खेळाडू आहे. विकासने चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
 • विकासनेगेल्यावर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
 • म्हैसूरमध्ये जन्मलेला विकास ६ वर्षांचा असताना कुटुंबासमवेत अमेरिकेतील मेरीलँडमध्ये स्थायिक झाला. त्याचे वडील माजी खेळाडू आणि १९८८च्या ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक होते.
 • २०१२ मध्ये विकासने नोंदविलेला ६६.२८ मीटर थाळीफेकीचा राष्ट्रीय विक्रम अद्याप अबाधित आहे.
 • त्याने २०१३ आणि २०१५च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
 • तसेच त्याने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य व २०१४च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले.
 • २०१०च्या आशियाडमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१४च्या आशियाडमध्ये विकास रौप्याचा मानकरी ठरला.
 • २००४, २००८, २०१२ व २०१६ अशा ४ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा विकास २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये थाळीफेकीत अंतिम फेरीत पोहोचला होता.

प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते मुक्ता श्रीनिवासन यांचे निधन

 • ‘मुक्ता फिल्म्स’ कंपनीचे संस्थापक तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते व्यंकटचारी श्रीनिवासन उर्फ मुक्ता श्रीनिवासन यांचे ३० मे रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
 • १९५७साली श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेला पहिला ‘मुधलळ्ळी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ठरला होता.
 • ‘दयावान’ हा हिंदी चित्रपट ज्याची अनुवादित आवृत्ती होता, त्या ‘नायकन्’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचे मुक्ता श्रीनिवासन निर्माते होते.
 • १९५७पासून पुढली ६० वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी १९८४पासून चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासही सुरुवात केली.
 • त्याआधी त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित निबंध असे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते. ९०हून अधिक कथासंग्रह आणि सुमारे २५० पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.
 • जयललितांसह अनेक प्रख्यात अभिनेत्री-अभिनेते त्यांच्या दिग्दर्शनातून झळकले. श्रीनिवासन यांच्यामुळे अभिनेते जेमिनी गणेशन यांची सामाजिक चित्रपटांमधील अभिनेता म्हणून कारकीर्द घडली.
 • उग्र अभिनयाची दाक्षिणात्य शैली बदलण्यासही १९६५नंतरचा काळ आणि त्यातील श्रीनिवासन यांचे चित्रपट कारणीभूत ठरले होते.

पॅसिफिक कमांडचे इंडो-पॅसिफिक कमांड असे नामांतर

 • अमेरिकेच्या लष्कराने पॅसिफिक कमांडचे नाव बदलून इंडो-पॅसिफिक कमांड असे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
 • भारताचे दक्षिण आशियातील वाढते महत्त्व लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • पॅसिफिक कमांड हा विभाग पॅसिफिक महासागराच्या प्रदेशातील सर्व हालचालीं आणि कारवायांची जबाबदारी पाहातो. या प्रदेशात भारताचाही समावेश होतो.
 • सुमारे ३ लाख ७५ हजार नागरिक आणि सैनिकांची नेमणूक त्यासाठी करण्यात आलेली आहे.
 • या नामांतरामुळे या प्रदेशासाठी काही विशेष फायदा होणार नसला तरी भारताचे या प्रदेशातील वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे.
 • या कमांडची जबाबदारी अॅडमिरल हॅरी हॅरिस यांच्याकडून फिलिप डेव्हीडसन यांनी स्वीकारली. तर हॅरी हॅरीस यांची दक्षिण कोरियात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

रघुराम राजन यांना विश्व हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण

 • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सप्टेंबरमध्ये आयोजित केलेल्या ‘विश्व हिंदू काँग्रेस’मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
 • रघुराम राजन यांना विश्व हिंदू काँग्रेसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
 • स्वामी विवेकानंदांनी शिकागोमधील विश्व धर्म संसदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या विश्व हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.
 • सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.
 • या कार्यक्रमात आर्थिक, शैक्षणिक, माध्यम आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश असणार आहे.
 • विश्व हिंदू काँग्रेसची सुरुवात २०१४मध्ये दिल्लीतून झाली होती. या कार्यक्रमात ५० देशांमधून हिंदू धर्माच्या सुमारे १८०० लोकांनी सहभाग नोंदवला होता.
 • २०१६मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या राजन यांनी यापूर्वी संघाच्या धोरणांवर टीका केली होती. सध्या ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.
 • या कार्यक्रमासाठी राजन यांच्यासह आलावा विद्यापीठाच्या प्राध्यापिका कॅथरिन डुसेक, स्पाइसजेटचे प्रमुख अजय सिंह, पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल आणि केपीएमजी इंडियाचे प्रमुख अरुण कुमार यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा