चालू घडामोडी : १५ मे

अलाहाबाद बँकेवर आरबीआयकडून निर्बंध

  • राष्ट्रीयकृत पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) १३,००० कोटी रुपयांच्या निरव मोदी थकित कर्ज फसवणूक प्रकरणात तत्कालिन महिला मुख्याधिकाऱ्याचे नाव केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आरोपपत्रात आल्यानंतर अलाहाबाद बँकेवर रिझर्व्ह बँकेने १४ मे रोजी तातडीने निर्बंध लागू केले.
  • पीएनबीच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रमण्यन या सध्या अन्य राष्ट्रीयकृत अलाहाबाद बँकेच्या मुख्याधिकारी आहेत.
  • निरव प्रकरणात उषा यांच्यासह पीएनबीच्या दोन संचालकांसह तब्बल २० अधिकाऱ्यांचा तपास यंत्रणांनी आरोपपत्रात समावेश केला.
  • यानंतर केंद्रीय अर्थ खात्याच्या सेवा विभागाने उषा यांचे सर्व अधिकार काढून घेण्याच्या सूचना बँकेच्या संचालक मंडळाला केल्या आहेत.
  • केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पुढाकाराने निरव प्रकरणात पहिलेच आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने अलाहाबाद बँकेवर ठेवी, कर्जाबाबत मर्यादा आणल्या आहेत.
  • बँकेबरोबरच्या व्यवसायातील धोके लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.
  • उषा या २०१५ ते २०१७ दरम्यान पीएनबीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. पहिल्या भारतीय महिला बँकेचेही अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते.
  • पीएनबीचे कार्यकारी संचालक के. व्ही. ब्रह्माजी राव आणि संजीव शरण व सर व्यवस्थापक नेहाल आहाड यांची नावेही आरोपपत्रात आहेत.
  • गेल्याच आठवड्यात आरबीआयने देना बँकेवरही कर्ज वितरण आणि नोकरभरतीबाबत निर्बध घातले होते.

लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची नेमणूक

  • लोकपाल निवड समितीमध्ये मुकुल रोहतगी यांची ख्यातनाम विधिज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गेले काही महिने हे पद रिक्त असल्यामुळे लोकपाल निवडीसाठी विलंब होत होता.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकपाल समितीत मुकुल रोहतगी यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेत आल्यानंतर २०१४साली रोहतगी यांची नेमणूक महान्यायवादी (अॅटर्नी जनरल) पदावर करण्यात आली होती. मात्र जून २०१७मध्ये रोहतगी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
  • लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञाबरोबर, भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभेच्या सभापती अशा सदस्यांचा समावेश असतो.
  • यापुर्वी ख्यातनाम विधिज्ञ या पदावर असणारे पी. पी. राव यांचे ११ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाल्याने ते पद रिक्त होते.

सुप्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांचे निधन

  • सुप्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांचे १५ मे रोजी अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या १०२ वर्षांच्या होत्या.
  • मराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणाऱ्यांमध्ये यमुनाबाई वाईकर यांचे नाव घेतले जाते.
  • यमुनाबाई यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१५ रोजी वाई येथे झाला होता. वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी स्वत:चा तमाशा फड काढला होता.
  • ‘यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी’ अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र गाजवला.
  • तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केले आहे.
  • ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. त्याची दखल घेवून सुमारे बावीस राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
  • याशिवाय महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी अवॉर्ड या पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले.
  • यमुनाबाईंच्या कला क्षेत्रातील योगदानामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी भावबंधन, मानापमान आदी संगीत नाटके सादर केली.
  • त्यांनी धर्मवीर संभाजी, मोहित्यांची मंजुळा आणि महाराची पोर या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. महाराची पोर नाटक बघावयास साने गुरुजी आले होते.
  • त्यांची संशय कल्लोळ नाटकातली भूमिका रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती.
  • प्रभाकर ओव्हळ यांनी 'लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर' या नावाने लिहिलेल्या त्यांच्या चरित्राचा मुंबई विद्यापीठाने एमएच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

आयसीसी अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची फेरनिवड

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
  • २०१६मध्ये आयसीसीने प्रथमच स्वतंत्र कारभार असलेले कार्याध्यक्षपद तयार केले होते आणि त्या जागेवर शशांक मनोहर बिनविरोध नियुक्त झाले होते.
  • गेल्या काही वर्षांमध्ये मनोहर यांनी जगातिक क्रिकेटमध्ये बरेच बदल घडवून आणले, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा