केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सुमारे ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने हाय अलर्ट जाहीर केला आहे.
तसेच रूग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी याप्रश्नी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)चे उच्चस्तरीय डॉक्टरांचे पथक केरळमध्ये पाठविले आहे.
ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने २१ मे रोजी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी १० ते १५ वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता.
ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून मोबाइल लाँचरवरून या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. सुमारे १० ते १५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्राह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे.
ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार आहे.
भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरात ब्राह्मोसचा तीन रेजिमेंटमध्ये यापूर्वी समावेश केला आहे. सर्व क्षेपणास्त्रे ही ब्लॉक-III यंत्रणेने सज्ज आहेत.
भारतीय लष्कराकडून ब्राह्मोसचा जमिनीवरून हल्ला करणाऱ्या श्रेणीचा २००७पासून वापर केला जातो.
या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर स्वत: वर आणि खाली उड्डाण करून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे. त्याचबरोबर शत्रूच्या हवाई रक्षा प्रणालीपासूनही हे सुरक्षित राहू शकेल.
नौदलाच्या सहा महिला विश्व सागरपरिक्रमा करून भारतात परत
४ खंड, ३ महासागर आणि सुमारे २१,६०० नॉटिकल मैल अंतर पार करत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कर्तबगारी बजावणाऱ्या नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांचे पथक २१ मे रोजी भारतात परतले.
या सागरी परिक्रमेबरोबरच त्या समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करणाऱ्या पहिल्याच आशियाई महिला ठरल्या आहेत.
हे पथक आठ महिन्यांपूर्वी १० सप्टेंबर २०१७ रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघाले होते.
या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव देण्यात आले होते. देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा या अभियानाचा उद्देश होता.
लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता.
पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिकाऱ्यांनी समुद्रात घालवले.
या प्रवासादरम्यान या महिलांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रिकेत चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले.
जगभ्रमंती करताना अनेकवेळा त्यांच्या शिडाला ७ मीटर उंची पर्यंतच्या लाटा आणि ताशी ६० किलोमीटर वाऱ्याच्या प्रचंड वेगाचा सामना करावा लागला.
सागरी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करुन परतलेले नौदल महिला अधिकाऱ्यांचे हे पथक २३ मे रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.
यापूर्वी कमांडर दिलीप दोंदे यांनी भारताची पहिली विश्व सागरपरिक्रमा आयएनएसव्ही म्हादेई या शिडाच्या नौकेच्या साह्याने केली.
नंतर त्याच नौकेवर स्वार होत लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी याने विनाथांबा सागरपरिक्रमा केली.
आता तिसरी विश्व सागरपरिक्रमा ही महिला चमूची पार पडली असून त्यासाठी आयएनएसव्ही तारिणी ही नवी शिडाची नौका बांधण्यात आली होती.
लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन गोल्डन बूट पुरस्कार
बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पाचव्यांदा युरोपियन ‘गोल्डन बूट’ पटकावण्याचा मान मिळवला आहे.
ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत मेस्सीने सर्वाधिक ३४ गोल केल्यामुळे त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद सलाह आणि हॅरी केन हे दोन नामवंत फुटबॉलपटूही होते.
गेल्यावर्षीही मेस्सीने या पुरस्काराला गवसणी घातली होती. त्यापूर्वी २०१०, २०१२ आणि २०१३ या वर्षांमध्येही मेस्सी या पुरस्काराचा मानकरी ठरला होता.
यावर्षी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावत मेस्सीने ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे. रोनाल्डोने आतापर्यंत चारवेळा हा पुरस्कार पटकावला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा