चालू घडामोडी : २५ मे

कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारचे बहुमत सिद्ध

  • कुमारस्वामी सरकारने कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केले आहे.
  • भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर काँग्रेस-जेडीएस आणि बसपाच्या एकूण ११७ आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
  • भाजपाचे येडियुरप्पा सरकार अडीच दिवसात कोळसल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
  • कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३८ आमदार आहेत. तर १०४ आमदारांसह भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे.
  • पण बहुमतांसाठी आवश्यक ११२ आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यामुळे येडियुरप्पा यांना अडीच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • बहुमत सिध्द करण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्षपद मागणाऱ्या भाजपने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे रमेश कुमार यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

गुजराती ज्येष्ठ विनोदी लेखक विनोद भट्ट यांचे निधन

  • गुजराती भाषेतील ज्येष्ठ विनोदी लेखक विनोद भट्ट यांचे २३ मे रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
  • मूत्रपिंड निकामी झाल्याने दीर्घ काळापासून ते अंथरुणाला खिळून होते. भट्ट यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह वैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार आहे.
  • भट्ट यांचा जन्म १९३८मध्ये गांधीनगर जिल्ह्याच्या देहगाम तालुक्यातील नंदोल तालुक्यात झाला. कर सल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
  • विनोद भट्ट यांनी अनेक वर्षे गुजराती वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले. विनोदी लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांची४५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • ‘इदम तृतीयम’ व ‘माग नू नाम मारी’ या त्यांच्या विनोदी स्तंभाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. सन १९९६-१९९७ मध्ये ते गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते.
  • पेहलू सुख ना मुंगी नार, सुनो भाई साधो, विनोद भटना प्रेम पत्रो, हास्यायन, श्लील-अश्लील, नरो वा कुंजरो वा ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके.
  • त्यांनी चार्ली चॅप्लिन, स्वप्नद्रष्टा मुन्शी, हास्यमूर्ती ज्योतिंद्र दवे, ग्रेट शो-मन जॉर्ज बर्नार्ड शॉ, अँतोन चेकोव्ह यांची चरित्रेही लिहिली.
  • कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, रमणभाई निळकंठ पुरस्कार, ज्योतिंद्र दवे पुरस्कार असे मानसन्मान त्यांना लाभले होते.

प्रियांका मोहिते ल्होत्से सर करणारी सर्वात लहान भारतीय महिला

  • साताऱ्यात राहणाऱ्या २६ वर्षीय प्रियांका मोहितेने जगातील चौथ्या क्रमांकावर उंच असणारे ल्होत्से शिखर सर करत एक विक्रम घडवला आहे.
  • प्रियांका ही ल्होत्से शिखर सर करणारी पहिली तसेच सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.
  • प्रियांकाने याआधी वयाच्या एकविसाव्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आहे.
  • प्रियांका बंगळुरु येथे एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करते. तिने गिर्यारोहणातील शिक्षण नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिरिंग येथून घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा