चालू घडामोडी : ७ मे

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन

  • दर्जेदार नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे ४ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
  • अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी रंगभूमीवर त्यांनी ठसा उमटविला होता. मराठी रंगभूमीवर करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात होते.
  • त्यांनी पार्टी या हिंदी व चिमणराव गुंड्याभाऊ या मराठी चित्रपटात अभिनय केला होता. तसेच शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगड्या या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
  • प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले.
  • त्यांची कवडी चुंबक, राजाचा खेळ, मोरूची मावशी, बिघडले स्वर्गाचे दार, आई रिटायर होतेय, सोनचाफा, वय लग्नाचं ही नाटके प्रचंड गाजली होती.
  • त्यांनी बारावेळा नाट्यदर्पण पुरस्कारावर नाव कोरले होते. तसेच चारवेळा त्यांना महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा व्लादिमीर पुतिन

  • रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन यांचा चौथ्यांदा शपथविधी झाला असून त्यांची १८ वर्षांची सत्ता आणखी ६ वर्षे राहणार आहे.
  • १९९९पासून पुतिन सत्तेवर असून ते जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते ठरले आहेत.
  • २०२४नंतर मात्र पुतिन यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. कारण रशियाच्या राज्यघटनेने तशी परवानगी दिलेली नाही.
  • मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पुतिन यांनी एकूण ७७ टक्के मते मिळाली होती, पण या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बंदी घातली होती.
  • व्लादिमिर पुतीन पुर्वी केजीबी या संस्थेचे गुप्तहेर होते. त्यानंतर १९९९साली ते रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यानंतर केवळ ५ महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली.
  • ब्रिटनमधील दुहेरी माजी गुप्तहेरावर विषप्रयोग करण्याचे प्रकरण, अमेरिकी निवडणुकीतील हस्तक्षेप, सीरियातील लष्करी मोहीम, क्रीमियाचा तोडलेला लचका यामुळे पाश्चिमात्य देशांशी रशियाचे संबंध तणावाचे असताना ते पुन्हा अध्यक्ष झाले आहेत.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले असून, त्यांच्यासमोवर अनेक जटिल आंतरराष्ट्रीय पेच आहेत.

राज्य सरकारचा कार्यालयात मराठी सक्तीचा आदेश

  • कार्यालयात अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने काढला आहे.
  • प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
  • यापुढे योजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी मराठीचाच वापर करणे बंधनकारक असेल.
  • या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर लेखी ताकिद देणे, गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, एक वर्षासाठी बढती वा वेतनवाढ रोखणे अशी कारवाई केली जाणार आहे.
  • या कारवाईचा शासकीय आदेश आधीपासूनच आहे. आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.
  • या आदेशातील ठळक मुद्दे:
  • सरकारी योजनांची नावे मराठीतच असली पाहिजेत.
  • ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी भाषण करताना वा बैठकीत मराठीतच बोलले पाहिजे.
  • अभ्यास गट, समित्यांनी त्यांचे अहवाल मराठीतूनच द्यावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा