चालू घडामोडी : १४ मे

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल : पियुष गोयल नवे अर्थमंत्री

  • केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले असून, अरूण जेटलींकडून अर्थ खाते तात्पुरते काढण्यात आले असून या खात्याची जबाबदारी पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आली आहे.
  • मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेले जेटली यांची प्रकृती सुधारेपर्यंत रेल्वेमंत्री पियुष गोयल अर्थ खात्याचा पदभार सांभाळतील.
  • याशिवाय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी राज्यवर्धन राठोड यांची वर्णी लागली आहे.
  • राज्यवर्धन राठोड हे केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत. त्यांच्याकडे क्रीडा खात्यासह माहिती आणि प्रसारण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.
  • तर स्मृती इराणींकडे आता केवळ वस्त्रोद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते उरले आहे.
  • मंत्रिमंडळातले फेरबदल हा स्मृती इराणींसाठी मोठा झटका आहे. कारण याआधीही त्यांच्याकडे असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाही काढून घेण्यात आले होते.
  • केंद्रीय जल व स्वच्छता मंत्री एस एस अहुवालिया यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

चीनमध्ये फक्त भारतात गुंतवणुकीसाठी विशेष फंडाची निर्मिती

  • चीनमधल्या सरकारी बँकेने फक्त भारतात सार्वजनिक गुंतवणुक करण्यासाठी एका विशेष फंडाची (निधी) निर्मिती केली आहे. केवळ भारतात गुंतवणूक करण्यासाठी वाहिलेला हा पहिलाच फंड आहे.
  • चीनची सरकारी बँक क्रेडिट इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाने ‘क्रेडिट सूस इंडिया मार्केट फंड’ या नावाने हा फंड दाखल केला आहे.
  • या माध्यमातून चिनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीची संधी प्राप्त होणार आहे. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा फायदा चिनी गुंतवणूकदारांना मिळवून देण्यासाठी या फंडाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • या फंडच्या माध्यमातून युरोप व अमेरिकेत नोंदणीकृत व भारतीय बाजारपेठेवर आधारित असलेल्या २० पेक्षा जास्त एक्स्चेंजेसमध्ये बँक गुंतवणूक करील.
  • विशेषत: आर्थिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याचा या फंडाच्या व्यवस्थापकांचा विचार आहे.
  • त्याखेरीज भारतीय आयटी कंपन्यास ऊर्जा क्षेत्र, फार्मा कंपन्या, आरोग्य व अन्य उद्योगांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीस प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार असल्याचे प्रशस्तीपत्रक बँकेने आपल्या अहवालात दिले आहे.
  • जगामध्ये विकसनशील देशांमध्ये भारतीय शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टीने सकारात्मक वातावरण असल्याचे मतही तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांची अनौपचारीक भेट घेतल्याला पंधरा दिवस होत नाहीत तोच हा निर्णय समोर आला आहे.

देना बॅंकेवर नव्याने कर्ज वितरण करण्यास निर्बंध

  • बुडीत कर्जांचा डोंगर आणि तोटा झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर नव्याने कर्ज वितरण करण्यास निर्बंध लादले आहेत.
  • रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर ‘प्रॉम्प्ट करेरेक्टीव्ह ऍक्शन’ घेतली असून, यापुढे बॅंकेला कर्ज वितरण आणि नोकरभरती करता येणार नाही.
  • सहा महिन्यांपासून देना बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. तसेच बॅंकेला ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत १,२२५ कोटींचा तोटा झाला.
  • सलग तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जांत आणि तोट्यात वाढ नोंदवण्यात आली. यामुळे आरबीआयने देना बॅंकेवर ही कारवाई केली आहे.
  • देना बॅंकेने कॉर्पोरेटमध्ये कर्जे दिलेली आहेत. मात्र, अनेक कर्ज खाती बुडीत कर्जांमध्ये परावर्तित झाल्याने बॅंकेला भरीव तरतूद करावी लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा