चालू घडामोडी : २२ मे
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे जी परमेश्वर उपमुख्यमंत्री
- कर्नाटकमधील सत्तासंघर्षानंतर जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री म्हणून तर काँग्रेसचे जी परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
- त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के आर रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील.
- काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत एकूण ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसला तर मुख्यमंत्रीपदासह १२ खाती जेडीएसला देण्याबाबत निर्णय झाला.
- २४ मे रोजी विधानसभेत बहुमत चाचणी होणार असून त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप केले जाईल.
- परमेश्वर हे काँग्रेसचे दलित नेते असून काँग्रेसचेच रोशन बेग यांच्या नावाची यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होती.
- तत्पूर्वी उपमुख्यमंत्रीपद हे लिंगायत समाजाच्या आमदाराला देण्यात यावे अशी मागणी लिंगायत संघटनांनी केली होती.
- त्यानंतर काही मुस्लिम संघटनांनी हे पद मुस्लिम समाजाच्या आमदाराला देण्याची मागणी केली होती.
- अखेर काँग्रेस आणि जेडीएस नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसने ही जबाबदारी दलित नेते पी. परमेश्वर यांच्याकडे देण्याचे निश्चित केले. परमेश्वर हे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
मलेशियातील सरकारमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्ती
- मलेशियात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये भारतीय वंशाचे गोविंद सिंग देव यांची निवड झाली आहे.
- त्यांच्याकडे कम्युनिकेशन आणि मल्टिमीडिया हे खाते देण्यात आले असून, मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातील ते पहिलेच मंत्री आहेत.
- देव यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पंजाबी समुदायाने आनंद व्यक्त केला आहे. मलेशियात साधारणपणे १ लाख शीख लोक राहातात.
- त्यांच्याबरोबरच नव्या सरकारमध्ये एम. कुलसेहरन या भारतीय वंशाच्या आणखी एका व्यक्तीची मंत्रिमंडळात निवड झाली आहे.
- ते डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे सदस्य असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे.
- ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद यांची मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाली असून, जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले ते सर्वात वयोवृद्ध नेते आहेत.
चंद्राच्या अभ्यासासाठी चीनकडून उपग्रह प्रक्षेपित
- आतापर्यंत फारशी माहिती न मिळालेल्या चंद्राच्या दुसऱ्या बाजूचा अभ्यास करण्यासाठी चीनने २१ मे रोजी उपग्रह प्रक्षेपित केला.
- ‘क्वेकियाओ’ असे या उपग्रहाचे नाव असून, त्याचे वजन ४०० किलो आहे. त्याचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.
- या उपग्रहावर अनेक अँटेना असून, त्यातील एका अँटेनाचा व्यास ५ मीटर आहे. दूरवरच्या अवकाश मोहिमांमध्ये संदेशांसाठी वापरण्यात आलेला हा सर्वात मोठा अँटेना असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे.
- या मोहिमेमध्ये चंद्रावर रोव्हर उतरविण्यात येणार आहे. चंद्राच्या दुसऱ्या बाजूवर एखादे उपकरण उतरविणारा चीन हा पहिला देश ठरणार आहे.
राजा राम मोहन राय यांची २४६वी जयंती
- भारतातील महान समाज सुधारक आणि विद्वान राजा राम मोहन राय यांची २२ मे रोजी २४६वी जयंती आहे.
- ‘आधुनिक भारतीय समाजाचे जनक’ अशी त्यांची ओळख होती. देशातील सामाजिक आणि धार्मिक रचनेतील सुधारणा त्यांनी सुचवली.
- मुघल सम्राज्याविषयी त्यांनी ब्रिटीश राजवटीसमोर जो पक्ष मांडला होता त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना राजा ही पदवी बहाल केली होती.
- राजा राम मोहन राय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजीबंगाल मधील राधानगर गावात एका ब्राह्मण कुटूंबात झाला.
- अरबी, फारसी, इंग्रजी, ग्रीक, हिब्रू इत्यादी भाषांचे ज्ञान त्यांना होते. हिंदू, मुस्लिम, ईसाई आणि सूफी या धर्मांचाही त्यांचा अभ्यास होता.
- १५ वर्षाच्या वयात त्यांनी मुर्ती पुजेला विरोध करणारे पुस्तक लिहिले होते. त्यांच्या समाजसुधारणेची किंमतही त्यांना मोजावी लागली होती.
- त्यांनी दूरदूरच्या यात्रा केल्या आणि विविध ठिकाणचे ज्ञान आणि अनुभव प्राप्त केले.
- समाजातील कुप्रथांविरोधात त्यांनी २० ऑगस्ट १८२८ला ब्राम्हो समाजाची स्थापना केली. हे पहिले सामाजिक-धार्मिक सुधार आंदोलन होते.
- सती प्रथेला भारतात खुप पाळले जात होते पण १८२९मध्ये या सतीप्रथेला संपविण्याचे श्रेय राजा राम मोहन राय यांना जाते.
- शिवाय भारतीय शिक्षण पध्दतीतील बदलांना त्यांचे समर्थन होते. त्यांनी इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य विज्ञानाचे शिक्षण भारतीय शिक्षणात आणले.
- त्यासाठी त्यांनी हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. जी त्या काळातील सर्वात आधुनिक संस्था होती.
- २७ सप्टेंबर १८३३ रोजी मेंदूज्वराने राजा राम मोहन राय यांचे निधन झाले. ब्रिटनमधील ब्रिस्टल नगरच्या आरनोस वेल स्मशान येथे त्यांची समाधी आहे.
एलजी कंपनीचे अध्यक्ष कु बोन मु यांचे निधन
- इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात नावाजलेल्या दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनीचे अध्यक्ष कु बोन मु यांचे २० मे रोजी निधन झाले.
- सुरूवातीला अगदी छोट्या असलेल्या एलजी कंपनीला नावारूपाला आणण्याचे काम कु बोन मु यांनी केले.
- कु यांचा जन्म साउथ गेआँगसाँग प्रांतात जिंजू येथे झाला. त्यांचे शिक्षण योनसेई विद्यापीठात झाले व नंतर त्यांनी अॅशलँड विद्यापीठातून पदवी घेतली.
- क्लीव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी उद्योग व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली होती. १९७५मध्ये त्यांनी एलजी कंपनीत प्रवेश केला.
- नंतर ते एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक झाले आणि १९८५मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले.
- त्यांच्या काळात कंपनीची आर्थिक वाढ मोठय़ा प्रमाणात झाली. एलजी समूहाचे मागोक डॉग या पश्चिम सेऊलमधील भागात ४२ एकरांवर सायन्स पार्क असून तेथे कंपनीच्या प्रयोगशाळा आहेत.
- एकूणच २३ वर्षे नेतृत्व करून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात कंपनीला पुढे नेण्यात कु यांचा मोठा वाटा होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा