चालू घडामोडी : १ मे
बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेस १ मेपासून सुरुवात
- शहीद जवानांच्या पत्नींना १ मेपासून (महाराष्ट्र दिन) एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत ही सवलत योजना सुरु करण्यात आली आहे.
- १ मे २०१८ रोजी प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते बस सवलतीचे ओळखपत्र ५१७ वीरपत्नींना देऊन या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
- शहीदांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. यापुढे शहीदांच्या वारसांना एसटीत नोकरीही देण्यात येणार आहे.
- या ओळखपत्रावर एका बाजूला शहीद जवानाचा फोटो आणि हुद्द्यासह संपूर्ण माहिती तर दुसऱ्या बाजूला वीरपत्नीचा फोटो, सवलत पास क्रमांक आणि संपूर्ण माहिती छापलेली असेल.
- या योजनेला हातभार लावण्यासाठी नागरिकांनी प्रामुख्याने एसटीनेच प्रवास करावा, असे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे.
- कारण, यामुळे नागरिकांकडून देशसेवेसाठी हातभार लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
डी. के. जैन यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
- वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्तझाल्यामुळे त्यांच्याजागी जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- जैन हे १९८३च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते ३१ जानेवारी २०१९ ला सेवानिवृत्त होतील. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे.
- तसेच राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्य माहिती आयुक्त या मानाच्या पदावर पुढील पाच वर्षांसाठी सेवानिवृत्त सुमित मलिक यांची नियुक्ती केली आहे.
भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख इद्रिस हसन लतीफ यांचे निधन
- भारतीय वायुसेनेचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ यांचे ३० एप्रिल रोजी एस्पिरेशन निमोनिया आजारामुळे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
- इद्रिस हसन लतीफ १९४२साली ब्रिटिशांच्या रॉयल एअर फोर्समध्ये वैमानिक झाले. हरिकेन आणि स्पिटफायरसारखी तेव्हाची अद्ययावत विमाने हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.
- फाळणी आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी पाकिस्तान ऐवजी भारतीय हवाई दलातच राहण्याचा निर्णय घेतला.
- १९७१पर्यंतची सर्व युद्धे, म्हणजे पाकिस्तानशी झालेली तिन्ही उघड युद्धे आणि चीनयुद्ध यांत लतीफ लढले.
- १९७१मध्ये एअर व्हाइस मार्शल म्हणजे हवाई दलात उपप्रमुख म्हणून योजनांची जबाबदारी सांभाळताना, लतीफ यांनी हवाई दलाच्या अद्ययावतीकरणासाठी प्रयत्न सुरू केले.
- हवाई दलाच्या प्रमुख पदाची (एअर चीफ मार्शल) सूत्रे त्यांनी सप्टेंबर १९७८मध्ये स्वीकारली आणि ऑगस्ट १९८१मध्ये ते निवृत्त झाले.
- या काळात मिग-२३ व मिग-२५ या तत्कालीन प्रगत लढाऊ विमानांचा अंतर्भाव हवाई दलात व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच.
- पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल (१९८२-१९८५) आणि फ्रान्समधील राजदूत (१९८५-८८) अशी पदे त्यांना सांभाळली.
- बांगलादेश मुक्तिसंग्रामानंतर ‘परम विशिष्ट सेवा पदका’चे मानकरी ठरलेल्यांमध्ये लतीफ यांचा समावेश होता.
आसामच्या पोलीस महासंचालकपदी कुलधर सैकिया
- आयपीएस अधिकारी कुलधर सैकिया यांची आसामच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती झाली आहे.
- ते १९८५च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून त्यांनी आयआयटी गुवाहाटी येथून गुन्हे व विकास या विषयात पीएचडी केली आहे.
- ते साहित्य अकादमी विजेते लेखक असून, पेनसिल्वानिया विद्यापीठाची फुलब्राइट फेलोशिपही त्यांना मिळाली आहे.
- त्यांना २०१५मध्ये ‘अक्षर छबी आरू अन्यन्या गाल्पा’ (पोट्रेट ऑफ दी स्काय अॅण्ड अदर स्टोरीज) या आसामी लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
- सैकिया यांनी काळ्या जादूच्या प्रकरणांचा मुकाबला करण्यासाठी ‘प्रहारी’ नावाची मोहीम पोलीस अधिकारी म्हणून राबवली होती. अनेक व्यवस्थापन संशोधन संस्थांत प्रहारी योजना हा अभ्यासाचा विषय ठरला आहे.
- ऑपरेशन बजरंग, ऑपरेशन ऱ्हाइनो अशा अनेक मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
- नियोजन आयोगात भारतीय आर्थिक सेवेत अधिकारी, भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत अधिकारी व नंतर आयपीएस सेवेत प्रवेश असा त्यांचा प्रवास आहे.
- आसाममध्ये काम करताना त्यांनी आर्थिक इकॉनॉमिक पॉलिसी रीसर्च ग्रूपच्या स्थापनेत मोठी भूमिका पार पाडली. गुवाहाटी येथे सोशल पोलिसिंगचा प्रयोग त्यांनी राबवला.
- एकूणच त्यांनी निवडलेले पोलीस क्षेत्र व दुसरीकडे साहित्यिक असणे या दोन्ही बाबी त्यांना पूरक ठरल्या आहेत. त्यातून दोन्ही क्षेत्रांतील कामगिरी परिपूर्ण होण्यास त्यांना मदतच झाली आहे.
तेजस या लढाऊ विमानावरुन बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- तेजस या हलक्या लढाऊ विमानावरुन हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली आहे.
- या चाचणीच्या निमित्ताने तेजसने फायटर विमान म्हणून आपली परिणामकारकता आणि क्षमता सिद्ध केली आहे.
- तसेच फायनल ऑपरेशनल क्लियरन्स मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
- राफेल या इस्त्रायली कंपनीने बीव्हीआर मिसाईलची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलाने त्यांच्या निवृत्त झालेल्या सी हॅरीयर्स विमानांसाठी बीव्हीआर मिसाईलस विकत घेतली होती.
- इंडियन एअर फोर्सने तेजस मार्क-१ आवृत्तीच्या ४० फायटर जेटची ऑर्डर दिली आहे. एअर फोर्सला आणखी ८३ तेजस विमाने खरेदी करायची आहेत. त्यासाठी सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
- तेजस स्वदेशी बनावटीचे विमान असल्याने त्याची किंमत अन्य फायटर विमानांच्या तुलनेत कमी आहे.
- पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका लक्षात घेता तेजसच्या समावेशामुळे एअर फोर्सच्या मारक क्षमेतमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा