चालू घडामोडी : २ मे

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरे

 • ‘जागतिक आरोग्य संघटने’ने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरांच्या यादीत सर्वाधिक भारतीय शहरांचा समावेश आहे.
 • या यादीतील २० पैकी १४ प्रदूषित शहरे ही केवळ भारतात आहे. या शहरात प्रदूषणाची पातळी ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
 • दिल्ली, मुंबई, कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत.
 • भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास २४ लाख अकाली मृत्यू हे केवळ प्रदूषणामुळे झाले असल्याचीही बाब यात अधोरेखित करण्यात आली आहे.
 • हवेत असलेल्या सल्फेट, नायट्रेट , कार्बन यासारख्या घटकांमुळे आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका पोहोचत आहे.
 • हे घटक श्वासावाटे शरीरात जातात. यामुळे श्वसनाच्या विकारांसह, कॅन्सर, हृदयरोग, त्वचारोग असे अनेक आजार संभवतात.
 • ज्या देशांतील माणसांचे सरासरी आर्थिक उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रणाच्या योग्य उपाययोजना नाहीत अशा देशांना प्रदूषणाचा विळखा बसतोय यात भारतासह आफ्रीका खंडातील देशांचांही समावेश आहे.
 • ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार जगातील जवळपास ७० लाख लोकांच्या मृत्यूला वाढते प्रदूषण कारणीभूत आहे.
 • आग्नेय आशियातील देशांमध्ये २४ लाख मृत्यू दरवर्षी घरातील व घराबाहेरील हवा प्रदूषणाने होत आहेत.
 • जगात घरातील हवाप्रदूषणाने ३८ लाख मृत्यू दरवर्षी होतात. त्यात ४० टक्के म्हणजे १५ लाख घरगुती प्रदूषण मृत्यू हे आग्नेय आशियातील देशात होतात.
 • बाहेरील हवा प्रदूषणामुळे जगात ४२ लाख मृत्यू दरवर्षी होतात. त्यातील ३० टक्के म्हणजे १३ लाख मृत्यू हे आग्नेय आशियात होतात.

ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ अशोक मित्रा यांचे निधन

 • ज्येष्ठ विचारवंत आणि मार्क्सवादी अर्थतज्ज्ञ अशोक मित्रा यांचे ८ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
 • अशोक मित्रा हे पश्चिम बंगालचे अर्थमंत्री होते, त्याचप्रमाणे ते भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागारही होते.
 • मित्रा यांचा जन्म बांगलादेशात झाला. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि आयआयएम कोलकाता येथेही त्यांनी अध्यापन केले होते. नेदरलॅण्ड्समधून त्यांनी डॉक्टरेट मिळविली होती.
 • मित्रा १९७७ ते १९८७ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
 • तर १९९० च्या दशकात ते राज्यसभा सदस्य होते आणि संसदेच्या उद्योग आणि वाणिज्य स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
 • इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मित्रा १९७० ते १९७२ या कालावधीत भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. जागतिक बँकेसाठीही त्यांनी काम केले होते.
 • मित्रा यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून विविधांगी लिखाण केले होते. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झाली.
 • भारतीय संघराज्यवादाचे मित्रा कडवे पुरस्कर्ते होते. राज्यांना कर आकारणीचे अधिक अधिकार दिले पाहिजेत, या भूमिकेचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला होता.

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंह

 • राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांची भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
 • तर पुरुष संघाचे विद्यमान प्रशिक्षक जोर्द मरीन यांना पुन्हा एकदा महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
 • रोलंट ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हॉकी इंडियाने जोर्द मरीन यांची पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती.
 • मात्र आशिया चषकाचा अपवाद वगळता जोर्द मरीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
 • सुलतान अझलन शहा चषक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही भारतीय संघ पदक मिळवण्यात अयशस्वी ठरला.
 • हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. याशिवाय भारतीय संघातील अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा हरेंद्र सिंह यांच्याकडे अनुभव आहे.
 • आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्वचषक यांसारख्या स्पर्धांमध्ये हरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारतीय नेमबाज शाहझार रिझवी जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी

 • भारतीय नेमबाज शाहझार रिझवी याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी झेप घेतली आहे.
 • कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर पिस्टल प्रकारात त्याने रौप्यपदक पटकावले.
 • या कामगिरीमुळे १६५४ रेटिंग पॉईंट्ससह शाहझार जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला.
 • त्याने रशियाच्या आर्टम चेर्नोसोव्ह (१०४६) आणि जपानच्या टोमोयुकी मत्सुदा (८०३) यांना मागे टाकले.
 • शाहझारने या आधी मार्चमध्ये मेक्सिकोत झालेल्या विश्वचषकात विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावले होते.
 • शाहझार व्यतिरिक्त टॉप १०मध्ये जितू राय या भारतीय तिरंदाजाचा समावेश आहे. तर ओम प्रकाश मिठरवाल याला १२व्या स्थानावर आहे.
 • १० मीटर एअर रायफल प्रकारात टॉप १०मध्ये भारताचा रवी कुमार चौथ्या आणि दीपक कुमार नवव्या स्थानी पोहोचला आहे.
 • तर ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स या प्रकारात टॉप १०मध्ये भारताचा अखिल शेओरान चौथ्या आणि संजीव राजपूत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 • महिला तिरंदाजांच्या जागतिक क्रमवारीत टॉप १०मध्ये भारताची मनू भाकेर ही केवळ एकमेव खेळाडू आहे.
 • राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये मनूने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्या कामगिरीच्या जोरावर तिने क्रमवारीत चौथे स्थान पटकावले.
 • १० मीटर एअर रायफल प्रकारात टॉप १५मध्ये राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत रौप्यपदक पटकावलेली मेहुली घोष ७व्या, अपुर्वी चंडेला ११व्या तर अंजुम मौदगील १२व्या स्थानावर आहे. अंजुम ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स या प्रकारातही आठव्या स्थानी आहे.

जे.डे. हत्या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेप

 • संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पत्रकार जे.डे. हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह नऊ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 • या प्रकरणात अटक झालेल्या एशियन एजमधील महिला पत्रकार जिग्ना वोराला दिलासा मिळाला असून सबळ पुराव्यांअभावी तिची निर्दोष सुटका झाली आहे.
 • ११ जून २०११ रोजी पवई हिरानंदानी येथे दिवसाढवळया जे.डे यांची गोळया झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती.
 • त्यानंतर २५ नोव्हेंबर २०११ रोजी जिग्ना वोराला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात जिग्ना छोटा राजनसह मुख्य आरोपी होती.
 • जे. डे यांच्या बाईकची नंबर प्लेट, पत्ता ही माहिती तिने छोटा राजनला दिल्याचा तिच्यावर आरोप होता. जिग्नाविरोधात परिस्थितीजन्य पुरावे सापडले होते.
 • जिग्नाची २७ जुलै २०१२ रोजी जामिनावर सुटका झाली. जिग्ना सिंगल पॅरेंट होती. त्याच आधारावर तिला जामीन मंजूर झाला होता.

जगप्रसिद्ध स्वीडिश डीजे एविचीने केली आत्महत्या

 • जगप्रसिद्ध स्वीडिश डीजे एविची ओमानची राजधानी मस्कतमध्ये २१ एप्रिल रोजी आत्महत्या केली. एविची अवघा २८ वर्षांचा होता, त्याला काही प्रमाणात नैराश्य आले होते.
 • एविचीने नैराश्य आल्यामुळे वाईन बॉटलच्या काचांनी आपल्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून घेतल्या. यातून झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.
 • डीजे आणि रेकॉर्ड प्रोड्यूसर असलेल्या एविचीला लोक त्याच्या इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखतात. एविचीचे मूळ नाव टिम बर्जलिंग होते.
 • जगातल्या वेगवेगळया देशांमध्ये एविचीने कार्यक्रम केले होते. त्यामुळे जगभरात त्याचा चाहता वर्ग आहे.
 • एविचीला २ एमटीव्ही पुरस्कार, १ बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाला आहे. वेक मी अप, द डेज आणि यू मेक मी ही एविचीची गाणी बरीच गाजली आहेत.
 • निधनाच्या काही दिवस आधीच एविचीला इलेक्ट्रॉनिक अल्बमसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा