चालू घडामोडी : २० जून

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांचा राजीनामा

  • मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना दिशा देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • राजीनाम्यानंतर ते पुन्हा अमेरिकेला परतणार आहेत. अमेरिकेत त्यांचे कुटुंब असून, त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी हा राजीनामा दिला आहे.
  • सुब्रमणियन हे देशाच्या भविष्यासाठी उत्कृष्ट धोरणकर्ते असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांची नियुक्ती करताना व्यक्त केले होते.
  • अरविंद सुब्रमणियन यांची ऑक्टोबर १६ ऑक्टोबर २०१४ रोजी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • नियुक्तीच्या ३ वर्षांनंतर त्यांचा कार्यकाळ १६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपला होता. त्यानंतर १ वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.
  • सुब्रमणियन यांनी दिल्लीच्या स्टिफन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले.
  • त्यानंतर युकेमधील जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमफील आणि डीफील पूर्ण केले आहे. पिटरसन इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स येथे ते वरिष्ठ पदावर काम करीत होते.

अनुकृती वास बनली फेमिना मिस इंडिया २०१८

  • भारतातील सौंदर्याच्या जगतातील ‘फेमिना मिस इंडिया २०१८’ या सर्वोच्च स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने बाजी मारत मिस इंडियाचा किताब पटकावला.
  • मागील वर्षाची मिस इंडिया मानुषी छिल्लरने अनुकृतीच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट चढवला.
  • या स्पर्धेत हरयाणाची मीनाक्षी चौधरी ही दुसऱ्या आणि आंध्रप्रदेशची श्रेया राव तिसऱ्या स्थानी राहिली.
  • भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या ३० सौदर्यवतींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
  • अनुकृती व्यास ही १९ वर्षांची असून ती तामिळनाडूमधील एका महाविद्यालयातून फ्रेंच भाषेत बीए करत आहे.
  • तिला मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असून, ती मिस वर्ल्ड २०१८ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी बीव्हीआर सुब्रमणियन

  • जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बीव्हीआर सुब्रमणियन यांची नियुक्ती केली आहे.
  • याशिवाय निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी. बी. व्यास यांची राज्यपालांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुळचे आंध्रप्रदेशचे असलेले बीव्हीआर सुब्रमणियन हे १९८७च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या मुख्य सचिव असलेल्या बी. बी. व्यास यांची जागा ते घेतील.
  • जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पाठिंबा काढून घेतल्याने पीडीपी-भाजपाचे सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • राज्यातील इतर कोणत्याही प्रमुख पक्षाने पीडीपीसोबत युती करण्यास नकार दिल्याने या ठिकाणी नवे सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली.
  • या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख प्रशासकीय पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०१७

  • नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल संध्या पुरेचा यांचाही गौरव करण्यात येणार आहे. हिंदुस्थानी संगीतातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ललिथ जे. राव तसेच रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा बंधूंना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
  • याशिवाय ३४ कलाकारांची उस्ताद ‘बिस्मिला खाँ युवा पुरस्कार २०१७’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यात प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे हिचाही समावेश आहे.
  • संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो.
  • मणिपूर येथे ८ जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये २०१७च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी ४२ कलाकारांची निवड करण्यात आली.
  • संगीत क्षेत्रातील अन्य पुरस्कार : योगेश सामसी (तबला वादन), राजेंद्र प्रसन्न (शहनाई/बासरी वादन), एम. एस. शीला (कर्नाटक संगीत), सुमा सुधींद्र (कर्नाटक संगीत-वीणा वादन), तिरुवर वैद्यनाथन (कर्नाटक संगीत-मृदंगम वादन), शशांक सुब्रह्मण्यम (कर्नाटक संगीत-बासरी वादन), मधुराणी (सुगम संगीत), हेमंती शुक्ला (सुगम संगीत), गुरुनाम सिंग (सुगम संगीत)
  • नृत्य क्षेत्रातील पुरस्कार : रमा वैद्यनाथन (भरतनाट्यम), शोभा कोसेर (कथक), मादांबी सुब्रह्मण्यम (कथकली), एल. एन. ओईनाम देवी (मणिपुरी), दीपिका रेड्डी (कुचिपुडी), सुजाता मोहपात्रा (ओडिशी), रामकृष्ण तालुकदार (सत्रिय), जनमेजय साई बाबू (छाहू), असीत देसाई
  • नाट्य क्षेत्रातील पुरस्कार : बप्पी बोस (दिग्दर्शन), हेमा सिंह (अभिनय), दीपक तिवारी (अभिनय), अनिल टिक्कू (अभिनय), नुरुद्दीन अहमद (स्टेज क्राफ्ट), अवतार साहनी (प्रकाश योजना), एस. एच. सिंह
  • लोककला क्षेत्रातील पुरस्कार : अन्वर खान (मंगनियार, राजस्थान), जगन्नाथ बायान (आसामी लोकसंगीत), रामचंद्र मांझी (बिहारी लोकसंगीत), राकेश तिवारी (छत्तीसगढ, लोकनाट्य), पार्वती (बाऊल संगीत, पश्चिम बंगाल), सर्वजीत कौर (पंजाबी लोकसंगीत), मुकुंद नायक, सुदीप गुप्ता (पपेट्री, पश्चिम बंगाल)

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर

  • संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नसल्याचे कारण देत अमेरिकेने या परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.
  • ४७ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
  • अमेरिका तीन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचा सदस्य आहे. आता केवळ दीड वर्षाचाच कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे कालावधी पूर्ण होण्याच्या आताच अमेरिका बाहेर पडला आहे.
  • यापूर्वी अमेरिकेने माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळातही तीन वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता.
  • त्यानंतर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले आणि २००९मध्ये अमेरिका पुन्हा या परिषदेत सहभागी झाला होता.
  • आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा