चालू घडामोडी : १८ जून
आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी संदीप बक्षी
- व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
- आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने कोचर यांच्या जागी संदीप बक्षी यांची बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारी म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.
- त्यामुळे सध्या आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेले बक्षी १९ जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.
- बक्षी यांच्या जागी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बँकेचे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
- कोचर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात व्हिडिओकॉन समुहाला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात फायदा घेतल्याचा आरोप आहे.
- एका जागल्याने केलेल्या तक्रारीनंतर बँकेने कोचर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांविरोधात ३० मे रोजी स्वतंत्र चौकशीची घोषणा केली होती.
- व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देताना अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची बँकेच्या अंतर्गत समितीमार्फत चौकशी होणार आहे.
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण या वादग्रस्त कर्ज प्रक्रियेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत चंदा कोचर रजेवर असतील.
- कोचर यांचा सहभाग असलेल्या एका समितीने २०१२मध्ये व्हिडीओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यांपैकी २,८१० कोटी रुपये या उद्योग समूहाने परत केलेले नाहीत.
- व्हिडीओकॉनकडूनच कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यूपॉवर रीनीवेबल्स कंपनीला आर्थिक लाभ झाल्याने चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत.
एललआयसीचे माजी अध्यक्ष जगदीश साळुंखे निधन
- भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) माजी अध्यक्ष जगदीश साळुंखे यांचे १६ जून रोजी निधन झाले.
- मुंबईतील सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालयातून साळुंखे यांनी पदवी घेतली. म. गो. दिवाण (जे पुढे एलआयसीचे अध्यक्षही बनले) यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने त्यांनी ॲक्च्युरिअल सायन्स हा विषय निवडला.
- ‘ॲक्च्युरिअल सायन्स’ म्हणजे जोखीम पातळीनुसार विम्याच्या संरक्षणाचे स्वरूप व हे संरक्षण देणे विमाप्रदात्या कंपनीलाही महाग पडू नये असे त्याचे दर ठरविणाऱ्या मूल्यमापनाची विमागणिती करण्याचे शास्त्र.
- त्यात पारंगत असलेल्या देशातील पहिल्या पिढीतील काही मोजक्या मंडळींमध्ये साळुंखे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल.
- साळुंखे हे एलआयसीचे २०वे अध्यक्ष (१९९४ ते १९९७) होते. आधीची दोन वर्षे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
- भारतात विम्याच्या सार्वत्रिकीकरणाचा पहिला प्रयत्न अर्थात गटसमूह योजनांची संकल्पना आणि त्याची एलआयसीकडून सुरुवात साळुंखे यांच्याकडून झाली.
- साळुंखे यांनी देशाच्या विमा व्यवसायाच्या घडणीत ४० वर्षांहून अधिक काळाचे महत्त्वाचे योगदान दिले आहे.
महाराष्ट्रातील देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा
- झी मराठी वाहिनीवरील होममिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाचे ते सुत्रसंचालक आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.
- हा राज्यमंत्रिपदाचा दर्जा व्यक्तीला नाही तर सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षपदाला मिळाला आहे.
- आदेश बांदेकर यांच्याबरोबरच शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे,तसेच पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
- देवस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- मध्यप्रदेश सरकारने काही महिन्यांपूर्वी भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत या ५ आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता.
ऑडी कंपनीचे सीईओ रूपर्ट स्टॅडलर यांना अटक
- जगातील दिग्गज कार उत्पादक कंपनीपैकी एक फॉक्सवॅगनच्या ऑडी डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रूपर्ट स्टॅडलर यांना जर्मनीतून अटक करण्यात आली.
- डिझेल गाडीच्या इंजिनात व उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत फेरफार करून पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
- २०१५मध्ये एका अमेरिकन संस्थेने फॉक्सवॅगनच्या कारमध्ये प्रदूषण तपासणीला चकवा देण्याच्या इराद्याने कारच्या सॉफ्टवेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप केला होता.
- त्यामुळे फॉक्सवॅगनवर डिझेल एमिशन घोटाळ्याप्रकरणी १ अब्ज युरोचा (सुमारे १.१८ अब्ज डॉलर) दंड ठोठावण्यात आला होता.
- जर्मनी सरकारकडून कोणत्याही कंपनीला करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा दंड आहे.
- साधारण तीन वर्षांपूर्वी ‘डिझेलगेट’ नावाचा हा घोटाळा उघडकीस आला होता. मोटारीतून निघणाऱ्या प्रदूषणकारी वायूंची मोजदाद होऊ नये यासाठी कंपनीने विशिष्ट उपकरण लावले होते.
- अमेरिकी सरकारच्या पर्यावरणरक्षण विभागातील डॅनियल कार्डर या अभियंत्याने ही चलाखी उघड केली. त्याने या कंपनीच्या मोटारी पर्यावरणरक्षणाचे नियम पाळत नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले.
- फोक्सवॅगनच्या गाड्या इतर वाहनाच्या तुलनेत १५ ते ३५ पट जास्त कार्बन व इतर वायू बाहेर टाकीत असल्याचे दिसून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा