बेनामी मालमत्तेसंदर्भात माहिती पुरवणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस
प्राप्तिकर विभागाने बेनामी संपत्ती उघड करण्यासाठी ‘बेनामी व्यवहार माहिती पुरस्कार योजना २०१८’ सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत बेनामी मालमत्तेसंदर्भात योग्य माहिती पुरवणाऱ्याला वित्त विभागाकडून १ कोटी पर्यंतच रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा १९८८ अंतर्गत येणाऱ्या बेनामी मालमत्तेची माहिती देणाऱ्यास हे बक्षीस मिळणार आहे.
यापूर्वी बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा १९८८ या कायद्यात २०१६मध्ये बदल करून तो आणखी कडक करण्यात आला होता.
बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख ही गुप्त ठेवली जाणार असून, हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गोपनीयतेने हाताळले जाणर आहे.
बेनामी संपत्ती उघड करण्यासाठी सरकारने रोख बक्षीस जाहीर करुन लोकांना यात सहभागी करुन घेतले आहे. या योजनेचे फायदा परदेशी नागरिकदेखील घेऊ शकतात.
या योजनेची संपूर्ण माहिती आयकर विभागाच्या कार्यालयात तसेच त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
या योजनेचा उल्लेख अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात केला होता. तसेच बेनामी व्यवहार आणि बेनामी कंपन्यांचे लक्षपूर्वक परीक्षण केले जाईल असे आश्वासन दिले होते.
शेतकऱ्यांचा १ जूनपासून १० दिवसांचा देशव्यापी संप सुरु
संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी देशासह राज्यातील शेतकरी १ जूनपासून १० दिवस संपावर गेले आहेत.
या १० दिवसांच्या कालावधीत दुधासह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणला जाणार नाही.
शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण होत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.
राष्ट्रीय किसान महासंघाच्यावतीने १ ते १० जून दरम्यान देशव्यापी शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली असून, सुमारे १२० शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत.
या संपात मंत्री व राजकीय नेत्यांना गावबंदी असेल, असा निर्णय मे महिन्यात वर्धा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
संपाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला आणि धान्य रस्त्यावर फेकण्याऐवजी ग्रामीण भागातील गरजूंना द्यावा, असे आवाहन किसान क्रांती जन आंदोलन या शेतकरी संघटनेने केले आहे.
अन्नछत्र चालवणाऱ्या संस्थांना जीएसटीमध्ये सूट
अन्नछत्र चालवणाऱ्या धार्मिक व स्वयंसेवी संस्थांना अन्नछत्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवरील जीएसटीची रक्कम परत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमृतसर येथील सुवर्ण मंदिरासह विविध शीख संघटनांनी गुरुद्वारातील लंगरसाठी लागणाऱ्या गोष्टींना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याची मागणी लावून धरली होती.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने २०१८-२० या कालावधीसाठी सेवा भोज योजनेतंर्गत ३२५ कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली आहे.
सुवर्ण मंदिरातील लंगर हा जगातील सर्वात मोठा मुदपाकखाना मानला जातो. याठिकाणी ५५ ते ६० हजार लोक दररोज जेवतात.
यासाठी मंदिर प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर गव्हाचे पीठ, तूप, डाळी, भाज्या, साखर, तांदूळ आणि अन्य जिन्नसाची व्यवस्था करावी लागते.
त्यामुळे या वस्तूंवर जीएसटीही मोठ्या प्रमाणात द्यावा लागतो. त्यामुळेच अनेक शीख संघटनांनी सुवर्ण मंदिरातील लंगरला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याची विनंती केली होती.
एअर आशियाच्या सीईओंविरोधात गुन्हा दाखल
एअर आशिया समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय हवाई परवाना नियमांच्या निकषांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोनी फर्नांडिस यांनी सरकारी सेवकांशी साटेलोटे करून परवाने मिळवले व ५/२० नियमाचे उल्लंघन केले, नियामक धोरणे बाजूला ठेवण्यास भाग पाडले असा आरोप आहे.
विमान कंपनी चालवताना ५ वर्षांचा अनुभव व २० विमाने असणे आवश्यक असते. या ५/२०च्या नियमातील निकषांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
याशिवाय परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळासाठी असलेल्या निकषांचेही त्यांनी उल्लंघन केले आहे.
एअर आशिया ही जगातील सर्वात स्वस्त हवाई कंपनी आहे. या कंपनीच्या दिल्ली, मुंबई व बेंगळुरू येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.
या प्रकरणी सीबीआयने टाटा ट्रस्टचे विश्वस्त वेंकटरामण यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
एअर आशियामध्ये टाटा समुहाची ४९ गुंतवणूक असून वेंकटरामण हे कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे १.५० टक्के समभाग आहेत.
उसेन बोल्टचा सहकारी नेस्टा कार्टर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी
जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट डोपिंग प्रकरणात अडकल्यामुळे त्याला बिजिंग ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले सुवर्ण पदक परत करावे लागले आहे.
परिणामी एका ऑलिम्पिक स्पर्धेत सलग ९ सुवर्ण जिंकण्याचा त्याचा विक्रम रद्द करण्यात आला आहे.
बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा सहकारी नेस्टा कार्टर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
नेस्टा कार्टर ऑलिम्पिकमधील रिले शर्यत प्रकारात दोषी आढळला होता. हा खेळ प्रकार सांघिक असल्यामुळे या प्रकरणात उसेन बोल्टलाही दोषी ठरवण्यात आले आहे. परिणामी बोल्टचेही सुवर्णपदक परत घेण्यात आले.
बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टने ९ सुवर्णपदके जिंकली होती. परंतु या डोपिंग प्रकरणामुळे त्याचे १ सुवर्ण परत घेण्यात आले आहे.
या ४०० मीटर रिले शर्यतीची सुरवात नेस्टा कार्टरने केली होती. आणि उसेन बोल्टने ३७.१० सेकंदात शर्यत पुर्ण करुन सुवर्णपदक पटकावले होते.
जमैकाकडून परत घेण्यात आलेले सुवर्ण पदक आता त्रिनिदाद टोबॅगो संघाला मिळणार आहे. तसेच जपानला रौप्य आणि ब्राझिलला कांस्य पदक मिळणार आहे.
उसेन बोल्ट हा महान ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक म्हणुन ओळखला जातो. परंतु या डोपिंग प्रकरणामुळे त्याच्या कारकिर्दीवर डाग लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा