देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी भाषा तिसऱ्या स्थानी
देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून, या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
२०११मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आली आहे.
या यादीमध्ये हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून, हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण २००१ सालच्या ४१.०३ टक्क्यांवरुन ४३.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८.१ टक्क्यांवरुन ८.३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१च्या तुलनेत ६.९९ टक्क्यांवरुन २०११मध्ये ७.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१च्य तुलनेत ७.१९ टक्क्यांवरुन ६.९३ टक्क्यांवर घसरले आहे.
मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून २००१मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे.
देशातील २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील १.०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे.
देशात फक्त २४,८२१ लोकांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार संस्कृत भाषा बोडो, मणिपुरी, कोकणी भाषेच्याही खाली आहे.
कोकणीलाही असाच अनुभव आला आहे. देशात २२.५६ लाख लोकांनी आपली मातृभाषा कोकणी असल्याची नोंद केली आहे. पण २००१च्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या २.३२ लाखांनी घटली आहे.
गोव्यातील मराठी भाषकांची सख्या २००१च्या तुलनेत २०११मध्ये १.४५ लाखांनी घटली आहे.
सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन
जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडिकेशन : जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम २०१३मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती.
त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील शेतकऱ्यांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता.
वायगाव हे गाव ८० टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे (औषधी गुणधर्म असलेला घटक) प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते.
भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो.
केशरी रंग, पेवातील साठवणूक या सांगलीच्या हळदीच्या खास वैशिष्ट्यांमुळे तिला भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी पुन्हा केली होती.
या प्रस्तावाचा स्वीकार करत मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाने सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन जाहीर केले.
हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगलीची हळद म्हणून मान्यता मिळाली आहे.
ही मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे हा सांगलीचा ब्रँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकला जाणार आहे.
इराणकडून तेल आयात बंद करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव
अमेरिकेने भारत, चीन व इतर मित्रराष्ट्रांना इराणकडून तेल आयात न करण्याचे आवाहन केले आहे.
येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत इराणशी होत असलेले तेल व्यवहार पूर्णपणे थांबवा, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले होते. इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याचे पूर्वीच ट्रम्प प्रशासनाने घोषित केले होते.
भारताला तेल निर्यात करणाऱ्या देशांपैकी इराण तिसरा मोठा निर्यातदार आहे. इराक व सौदी अरेबियानंतर इराणचा क्रमांक येतो.
एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन कच्चे तेल निर्यात केले होते.
गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण अणुकरारातून बाहेर पडल्याचे घोषित केले होते.
अमेरिका दबाव तंत्राचा वापर करत आहे. भारत व चीनवरही त्यांनी तेल आयात बंद करण्यासाठी दबाव टाकला आहे.
अमेरिका इराण धोरणाविषयी प्रचंड संवदेनशील असून, भारत आणि चीनने या आवाहनास सकारात्मकच प्रतिसाद न दिल्यास या देशांसोबतच्या उद्योग व व्यापार धोरणावर अमेरिका पुनर्विचार करणार आहे.
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकेरला सुवर्णपदक
जर्मनीत सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेरने चीनच्या कायमान लूवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
१६ वर्षीय मनु भाकेरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात २४२.५ गुणांची कमाई करत विक्रमाची नोंद केली. या वर्षातील मनूचे हे सातवे सुवर्णपदक आहे.
मनूने याआधी याच स्पर्धेत आपली सहकारी महिमा अग्रवालसोबत सांघिक प्रकारात कांस्यपदकाचीही कमाई केली.
याच स्पर्धेत भारताच्या उदयवीर आणि विजयवीर सिद्धु या जुळ्या भावांनी आपला सहकारी राजकंवर सिंह याच्यासोबत २५ मीटर पिस्तुल प्रकारात सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
उदयवीरने २५ मीटर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक कांस्यपदकाचीही कमाई केली. तर अनिश भनवालाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले.
वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. एच वाय मोहन राम यांचे निधन
प्रसिद्ध भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. होलेनरसिपूर योगनरसिंहम मोहन राम १८ जून रोजी निधन झाले. ‘एचवायएम’ या नावाने ते ओळखले जात होते.
पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, सनदी अधिकारी एच. वाय. शारदाप्रसाद हे त्यांचे मोठे बंधू होते.
डॉ. राम यांनी वनस्पतिशास्त्राची दुर्मीळ वाट निवडून फुलझाडांचे जीवशास्त्र, वनस्पतींचे रचनाशास्त्र यात संशोधन केले. एकूण २०० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत.
त्यांनी फुलांचे रंग, फुलझाडांचे लैंगिक प्रकटीकरण, बांबूची संकरित पद्धतीने निर्मिती यातही मोठी कामगिरी केली होती.
एचवायएम यांचा जन्म कर्नाटकात १९३०मध्ये झाला. सेंट फिलोमेना कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी केले. पदवीनंतर त्यांनी आग्रा येथे एमएस्सी केले.
पुढे दिल्ली विद्यापीठात त्यांची अध्यापक म्हणून निवड झाली. नंतर ते फुलब्राइट शिष्यवृत्ती घेऊन वनस्पतिशास्त्र शिकण्यासाठी कार्नेल विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी उती संस्करणाचे तंत्र आत्मसात केले व त्याचा वापर भारतात केला.
त्यांनी ल्युपिन, ग्लॅडिओलस, क्रीसॅनथमम, कँलेंड्यूला, झेंडू व इतर वनस्पतींच्या वेगळ्या गुणधर्माचा अभ्यास केला.
त्यातील काही गुण त्यांनी केळी, कडधान्ये व बांबू या वनस्पतींत आणून आर्थिक किफायत वाढवली. केळीच्या उती संकरात त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग करून त्यात यश मिळवले.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी नॅचरल सायन्स सोसायटीची स्थापना करून तेथे व्याख्यान देण्यासाठी नोबेल विजेते वैज्ञानिक सर सी.व्ही. रामन यांना बोलावले.
राज्यात कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता
महिला सक्षमीकरण व सबलीकरणासोबत वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.
पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे, यासाठी वन विभागातर्फे ही विशेष योजना तयार करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी दोन लक्ष शेतकरी कुटुंबांना होईल, असा अंदाज आहे.
त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला सरकारकडून साग, आंबा, फणस, जांभूळ व चिंच अशी झाडांची १० रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत.
या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल.
या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यासह मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून १० रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा