ज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगर येथे १४ जून रोजी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.
श्रीनगरमधील प्रेस कॉलनीतील आपल्या कार्यालयातून बाहेर पडताना बुखारी व त्यांच्या सुरक्षारक्षकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात बुखारी हे ठार झाले, तर सुरक्षा रक्षकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
यापूर्वी बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हापासून त्यांना सुरक्षारक्षक पुरवण्यात आला होता.
जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेली शस्त्रसंधी अंतिम टप्प्यात असताना बुखारी यांची हत्या झाली आहे. ते ५० वर्षांचे होते.
हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बुखारी यांच्यावरील हल्ल्याचे कारणही समजू शकलेले नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये १५ वर्षांनी दहशतवाद्यांनी पत्रकाराची हत्या केल्याची घटना घडली आहे.
भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा जनरल मोटर्सच्या सीएफओ
भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) नियुक्ती करण्यात आली आहे.
सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या १ सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारतील.
मुळच्या चेन्नई येथील असणाऱ्या सूर्यदेवरा या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मेरी बारा यांना रिर्पोट करतील.
मेरी बारा या २०१४पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
त्यामुळे आता २ प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.
दिव्या सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी वयाच्या २२व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले.
त्यांनी जनरल मोटर्सचे अनेक महत्वाचे व्यवहार चांगल्या पद्धतीने हाताळले होते. यामध्ये युरोपियन कंपनी ओपलची स्वंयचलित वाहन स्टार्टअप क्रूझ खरेदीच्या व्यवहाराचाही समावेश आहे.
२०१६मध्ये त्यांना ऑटोमोटिव्ह न्यू रायजिंग स्टारसाठी नामांकित करण्यात आले होते.
९८वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन मुलुंडमध्ये सुरु
सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला १३ जून रोजी मुंबईतील मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात सुरुवात झाली.
दिमाखदार नाट्य दिंडीने या संमेलनाची सुरुवात झाली. यामध्ये जवळपास ४०० लोककलावंत सहभागी झाले.
आतापर्यंतच्या नाट्यसंमेलनाची परंपरा मोडीत काढत यंदाचे नाट्यसंमेलन वैविध्यपूर्ण पद्धतीने आयोजित करण्याचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानस आहे.
त्यामुळे १३ जून रोजी दुपारी ४ वाजता नाट्यदिंडीने झालेला हा महाअंक १६ जूनच्या पहाटे ४ वाजता संपणार आहे.
२५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंचतर हे संमेलन मुंबईत पार पडत आहे. ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलाकार कीर्ती शिलेदार या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा आहेत.
‘टी फॉर थिएटर आणि टी फॉर ट्रंक’ अशी या संमेलनाची संकल्पना असून, या माध्यमातून मराठी रंगभूमी ज्या रंगमंच कामगारांच्या आधारावर बहरली आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.
ग. श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता दरवर्षी जवळजवळ नाट्यसंमेलन होते.
गेल्यावर्षी ९७वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबाद येथे जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष : प्रसाद कांबळी
ब्रिटनच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत प्रियंका जोशी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी प्रियंका जोशी यांचा ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
प्रियंका यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठामध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली होती.
प्रियंका यांच्या संशोधनामुळे मानवी मेंदूतील लहान रेणूंच्या औषधे आणि चयापचय्यांना ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.
अलझायमर्स रोगाचे मूळ कारण समजले जाणारे अमाइलॉइड बीटा प्रथिने क्लंप तयार होण्याशी या प्रक्रियेचा निकटचा संबंध आहे.
या संशोधनांतर्गत त्यांनी तयार केलेली लहान रेणुंचा साठा (मॉलिक्युल लायब्ररी) हे असामान्य संशोधन म्हणून वाखाणण्यात आले आहे.
यामधून केंब्रिज विद्यापीठामध्ये अल्झायमरवरील औषध तयार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संशोधनास बळ मिळाले.
सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये रिसर्च फेलो म्हणून कार्यरत असलेल्या प्रियंकाने अल्झायमर्स आजारावरील संशोधनामध्ये आघाडी घेतली आहे.
फोर्ब्स या जगप्रसिद्ध नियतकालिकाने ‘अंडर ३०, सायन्स अँड हेल्थकेअर’ या अंकामध्ये विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या तरुणांच्या (३० वर्षांखालील) यादीमध्ये प्रियंकाचा समावेश करुन नुकताच त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा गौरव केला होता.
व्होगने प्रसिद्ध केलेल्या जुलैमधील अंकासाठीच्या मुखपृष्ठावर प्रियंका यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे.
व्होगने या यादीत हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीमालिकेच्या लेखिका जे के रोलिंग यांनाही स्थान दिले आहे.
मालदिवच्या माजी राष्ट्रपतींना १९ महिन्यांचा तुरुंगवास
मालदिवचे माजी राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूम यांच्यासह इतर दोन जणांना १९ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये मालदिवचे माजी सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अली हमीद यांचा समावेश आहे.
या तिघांवरही पोलीस तपासात सहकार्य न केल्याचा आरोप ठेवत, प्रत्येकी १९ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या सर्वांनी पोलीस चौकशीमध्ये आपले मोबाइल फोन पोलिसांना देण्यास नकार दिला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांचा हा सत्तेवरती पकड घट्ट करण्यासाठी चाललेला खटाटोप असल्याचे मत मालदिवमध्ये व्यक्त होत आहे.
अब्दुल्ला यामिन येत्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा विजयी होऊन सत्तेत येण्यासाठी गेले अनेक महिने धडपड करत आहेत.
मालदिवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद यांच्यासह ९ विरोधी पक्षनेत्यांवरील आरोप रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यावर अब्दुल्ला यामिन यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये ४५ दिवसांची आणीबाणी लादली होती.
मालदीवमध्ये आणीबाणी घोषीत केल्यानंतर या तिघांनाही लगेचच ५ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
नाशिद यांना सत्तेवरुन बाजूला करण्यासाठी पोलिसांनी २०१२साली बंड केले होते. तेव्हापासून मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता आहे.
मोहम्मद नाशिद हे मालदिवचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले नेते होते. त्यांच्यावर दहशतवादाचे आरोप ठेवून त्यांना १३ वर्षांची शिक्षा ठोठावली गेली होती.
निर्लेप उद्योग समूहाचे बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडून अधिग्रहण
१९७०च्या दशकात स्वयंपाकासाठी लागणारी उत्पादने नॉनस्टिक टेक्नॉलॉजीतून आणून भारतात क्रांती करणाऱ्या निर्लेप उद्योग समूहाचे बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडून अधिग्रहण होणार आहे.
येत्या ६ महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन हा व्यवहार पूर्ण होईल. दोन्ही उद्योगोंमधील व्यवहारानुसार, ८० टक्के समभाग बजाज इलेक्ट्रीक्ल्सकडे तर २० समभाग निर्लेप उद्योग समूहाकडे राहणार आहे.
निर्लेप उद्योग समूह मागील ३ वर्षांपासून मार्केट शेअरमध्ये मागे पडत आहे. ३ वर्षांत दरवर्षी होणारी उलाढाल पाहता कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे.
शिवाय या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यासमोर आणि त्यांच्या मार्केटींग धोरणासमोर निर्लेपचा निभाव लागणे अवघड होत चालले होते.
कंपनीची वार्षिक उलाढाल २०१६साली ७९ कोटी, २०१७साली ५४ कोटी, २०१८साली ४७ कोटींची होती.
हा सगळा व्यवहाराचा आलेख पाहता निर्लेप ब्रॅण्डच्या उत्कर्षासाठी हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा