महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाचा अंतिम मसुदा जाहीर
नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८’चा अंतिम मसुदा जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार उद्योग व शिक्षण संस्थांच्या सहकार्याने राज्यात ‘इनक्युबेटर्स नेटवर्क’ उभारण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने ५ फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप’ धोरणाला तत्त्वतः मंजुरी दिली होती.
कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने या धोरणाचा अंतिम मसुदा अंमलबजावणीसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांसह १३ जून रोजी प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटीने ही तत्त्वे तयार केली आहेत.
नवउद्योगांना चार वर्गांनुसार राज्य सरकारकडून भांडवलातील काही भाग निधी म्हणून दिला जाणार आहे.
हा निधी मिळविण्यासाठी संबंधित स्टार्टअपने ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ किंवा ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ स्थापन करून तिची कंपनी कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे.
विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू कांबळे यांचे निधन
विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू नाथा कांबळे यांचे १३ जून रोजी नाशिक येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते.
ते गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
नव्या शाहीरांसाठी प्रेरणादायी असलेले शंतनू हे मुळचे सांगलीतील तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळा येथे ते राहत होते. आजारपणानंतर मात्र ते नाशिकला स्थायिक झाले होते.
शाहीर अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शाहीर बोबडे यांच्या प्रभावातून कांबळे यांनी शाहिराच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची चळवळ पुढे चालविली.
सामाजिक विषमता, अंधश्रद्धा याविरोधात त्यांनी गावोगावी जाऊन जनप्रबोधन केले. लोकशाहीचा प्रचार-प्रसार केला.
अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसर होते.
गाणी आणि कवितातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे.
२००५मध्ये त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. सुमारे १०० दिवस ते पोलीस कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची त्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
कांबळे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘कोर्ट’ हा चित्रपटही गाजलेला आहे. विद्रोही मासिकाच्या संपादक मंडळावरही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली, तसेच लिखाणही केले.
त्यांच्या निधनामुळे विद्रोही चळवळीतील एक शिलेदार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अॅड. शांताराम दातार यांचे निधन
मराठी भाषा मंचचे संस्थापक आणि न्यायालयीन कामकाज मराठीतून होण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा उभारणारे अॅड. शांताराम दातार यांचे १६ जून रोजी निधन झाले.
उच्च न्यायालयात मराठी भाषेतून न्यायदान केले जावे यासाठी त्यांनी आग्रह धरला. कनिष्ठ न्यायालयांतील कामकाज मराठीत सुरू होण्याचे श्रेय त्यांनाच जाते.
महाराष्ट्रात मराठीची होत असलेली गळचेपी आणि शासनाचे मराठीविरोधी धोरण या सर्व गोष्टींविरूद्ध आवाज उठवण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे दातार संस्थापक होते.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी शासनाला अधिसूचना काढावी लागली.
दातार यांचा जन्म ९ जून १९४२ला मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
निरनिराळ्या ठिकाणी नोकऱ्या करून त्यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण इंदूरमध्ये घेतले. वकिली व्यवसाय करण्यासाठी ते १९६८साली कल्याणमध्ये आले.
दातार यांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले असले, तरी त्यांनी मराठी भाषेसाठी कायम लढा दिला.
दातार हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. तेव्हापासून त्यांना समाजसेवेची आवड होती.
कल्याण येथे वकिली व्यवसायास सुरूवात केल्यानंतर त्यांनी १९७२मध्ये भारतीय मजदूर संघाच्या व १९७२पासून जनसंघाच्या कामास सुरूवात केली.
जून १९७५मध्ये देशात आणीबाणी घोषित झाली. तेव्हा ते आणीबाणीविरूध्दच्या लढ्यात सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता.
ते भाषा सल्लागार समितीचे निमंत्रित सदस्य आणि महाराष्ट्र राज्याच्या विधी सल्लागार परिभाषा समितीचेही सदस्य होते. ते अनेक बँकांचे व संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम पाहत होते.
मराठी राजभाषा नियम १९६६मध्ये दुरूस्ती करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते सदस्य होते.
महाराष्ट्र शासनाने दोन महिन्यापूर्वी मराठीच्या न्यायव्यवहारासाठी उपाययोजना करता यावी, यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीत दातार होते.
ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा या पुस्तकाच्या निमिर्तीमध्ये त्यांचा सहभाग होता.
सलमा हुसेनची अमेरिकेतील ॲण्डी नेतृत्व निर्माण संस्थेत निवड
आसामच्या सलमा हुसेनला अमेरिकेतील प्रसिद्ध ॲण्डी नेतृत्व निर्माण संस्थेत काम करण्याची संधी मिळाली आहे.
जगभरातून फक्त आठ तरुणींना या कार्यक्रमासाठी निवडण्यात आले, त्यात ती भारतातून एकमेव आहे. ५ ऑगस्टपासून ती वॉशिंग्टन येथे शांतता प्रशिक्षणात सहभागी होणार आहे.
वयाच्या आठव्या वर्षी वडील वारल्यानंतर, शिक्षक असलेली आई रेझिया हुसेन यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सलमाला शिकवले.
नॅशनल फाऊंडेशन ऑफ इंडियाचा युवा शांती पुरस्कार तिला २०१७-१८ मध्ये मिळाला होता.
२०१७मध्ये त्रिपुरातील आयसीएफएआय विद्यापीठातील कार्यक्रमात तिला ‘राइट्स ऑफ एल्डरली पर्सन्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
मानवी हक्क व शांतता क्षेत्रातील धडाडीची कार्यकर्ती अशी तिची ओळख आता निर्माण झाली आहे.
अमेरिकेतील ॲण्डी फाऊंडेशन ही संस्था २००८मध्ये स्थापन झाली. मानवतावाद, राजनीती यांसारख्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांना ही संस्था प्रशिक्षण देते.
ॲण्डी पामोविच ही एक युवकांना प्रेरणा देणारी महिला होती, तिच्या नावे ही संस्था सुरू केली गेली. तिचा इराकमध्ये मानवतावादी काम करत असताना २००७मध्ये मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा