जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी बीव्हीआर सुब्रमणियन
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बीव्हीआर सुब्रमणियन यांची नियुक्ती केली आहे. सध्या मुख्य सचिव असलेल्या बी. बी. व्यास यांची जागा ते घेतील.
याशिवाय निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी. बी. व्यास यांची राज्यपालांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पाठिंबा काढून घेतल्याने पीडीपी-भाजपाचे सरकार कोसळले. त्यानंतर मुख्यमत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राज्यातील इतर कोणत्याही प्रमुख पक्षाने पीडीपीसोबत युती करण्यास नकार दिल्याने या ठिकाणी नवे सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख प्रशासकीय पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
रत्नाकर मतकरी, नवनाथ गोरेंना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.
२०१८साठी देशातील एकूण ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
त्यात बाल साहित्य पुरस्कारासाठी २१ साहित्यिकांची तर युवा पुरस्कारासाठी २१ साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे या २ मराठी साहित्यिकांची नावे आहेत. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
इंग्रजी भाषेतील पुरस्कारासाठी योग्य पुस्तक आढळले नाही, तसेच डोगरी व बोडो भाषेतील साहित्यासाठीचे उर्वरित पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला जाहीर झाला आहे.
रत्नाकर मतकरी यांनी बाल साहित्यात लिहिलेल्या कथा आणि गोष्टी प्रचंड गाजल्या. बालमनावर एक वेगळाच संस्कार करणाऱ्या या कथा होत्या.
नवनाथ गोरे हे मूळचे सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील उमदी येथील आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात संशोधक सहायक आहेत.
याआधी नवनाथ गोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्कार यासह एकूण दहा पुरस्कार मिळाले आहेत.
रत्नाकर मतकरी यांचे बाल साहित्य : अचाटगावची अफाट मावशी, अलबत्या गलबत्या, गाऊ गाणे गमतीचे (बालगीते), चटकदार, चमत्कार झालाच पाहिजे, यक्षनंदन, राक्षसराज जिंदाबाद, शाबास लाकड्या, सरदार फाकडोजी वाकडे.
नाटकासाठीचे पुरस्कार : चंपा चेतनानी यांच्या सिंधी नाटकाला.
प्रसिध्द उर्दू विनोदी लेखक मुश्ताक अहमद युसूफी यांचे निधन
प्रसिध्द उर्दू व्यंग्यकार आणि विनोदी लेखक मुश्ताक अहमद युसूफी यांची २० जून २०१८ रोजी कराची येथे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले.
पाकिस्तानच नव्हे तर भारतातील उर्दू साहित्यवर्गातील ते सर्वाधिक वाचले गेलेले व लोकप्रिय विनोदी लेखक गणले जातात. त्यांची तुलना उर्दूतील इब्ने इन्शा या नामवंत साहित्यिकाशी केली जाते.
मुश्ताक अहमद युसूफी यांचा जन्म ४ सप्टेंबर १९२१ रोजी टोंक (राजस्थान) येथे झाला. फाळणीनंतर ते कराचीला गेले.
त्यांनी आग्रा विद्यापीठातून तत्त्वज्ञानात एमए पदवी घेतली. नंतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढे त्यांच्या उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना डीलिट ही पदवीही प्रदान करण्यात आली.
व्यवसायाने बँकर असलेल्या युसूफी यांनी पाकिस्तानातील अलाइड बँक, युनायटेड बँक व पाकिस्तान बँकिंग काउन्सिलची सर्वोच्च पदे त्यांनी भूषविली.
अर्थजगतामध्ये वावरत असताना दुसरीकडे त्यांचे विनोदी लेखनही सुरू होते. त्यांचे लिखाण बहुप्रसव झाले नसले तरी ते अत्यंत वाचकप्रिय होते.
चिराग तले, खाकम बदहन, जरगुजिश्त, आबे गुम आणि शामे शहरे यारां हे त्यांचे पाच विनोदी लेखसंग्रह उर्दू साहित्य जगतात अफाट लोकप्रिय आहेत.
ते समाजातील सांस्कृतिक, नैतिक धारणा, मानवी स्वभावाचे वैविध्य, राजकीय व्यक्तिमत्त्वांची अनाकलनीय वृत्ती यावर अत्यंत मिश्कीलपणे व्यंगात्मक भाष्य करीत.
मात्र त्यांच्या विनोदातील व्यंग अथवा उपरोध बोचरा नव्हता, किंबहुना विचार करण्यास प्रवृत्त करणाराच होता.
समाजातील त्याज्य रूढी, परंपरांना विनोदाची टाचणी लावताना ते घाबरले नाहीत. धर्माध वर्ग त्यांच्या लिखाणामुळे कधी दुखावला गेला असेही घडले नाही.
आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांना आदमजी पुरस्कार, सितारा ए इम्तियाज, हिलाल ए इम्तियाज, पाकिस्तान अकादमी ऑफ लेटर्स, कायदे आजम मेमोरियल मेडल आदी अनेक पुरस्कार मिळाले.
हिलाल ए इम्तियाज हा पाकिस्तानात साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.
पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचे निधन
पुलित्झर पुरस्कार विजेते स्तंभलेखक चार्ल्स क्रॉथम्मर यांचे २१ जून रोजी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.
जगभरातल्या ४००हून अधिक प्रकाशनांनी चार्ल्स क्रॉथम्मर यांचे लेख छापले होते. अनेक वर्षांपासून क्रॉथम्मर यांना कर्करोगाने पछाडले होते.
१९८७साली दी वॉशिंग्टन पोस्टमधील त्यांच्या स्तंभलेखासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा