चालू घडामोडी : १५ जून
गौरी लंकेश हत्या प्रकरणात परशुराम वाघमारेला अटक
- पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात संशयित परशुराम वाघमारेला अटक झाली असून, त्यानेच गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे.
- फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गोविंद पानसरे, एमएम कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी एकच शस्त्र वापरल्याचे स्पष्ट झाले आहे, असे एसआयटीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
- आणखी ३ जण गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असून त्यांचा एसआयटीकडून शोध सुरु आहे.
- गौरी लंकेश यांची मागच्यावर्षी ५ सप्टेंबर रोजी बंगळुरुतील घराच्या प्रवेशद्वाराजवळ गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.
- गौरी लंकेश यांची हत्या करणाऱ्या संघटनेने कोणतेही नाव धारण केलेले नसून, या संघटनेचे मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या ५ राज्यात जाळे पसरले आहे. त्यांचे ६० सदस्य आहेत.
- सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण नवीन संघटनेसाठी सदस्यांची भरती करायचा. त्याच्या चौकशीतून या सर्व गोष्टीचा उलगडा झाला.
- हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था या सारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांमधून लोक या नव्या संघटनेत आले असले, तरी या हत्यांमध्ये हिंदू जनजागृती समिती किंवा सनातन या संस्थांचा थेट संबंध नाही.
- ही टोळी प्रोफेसर के. एस. भगवान यांची हत्या करण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. त्याचवेळी त्यांना अटक करण्यात आली.
- के. एस. भगवान यांच्या लेखनामुळे उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या मनात त्यांच्याबद्दल राग होता.
- एसआयटीला अलीकडेच एका संशयिताकडे डायरी सापडली. त्यामध्ये संभाव्या टार्गेटसची नावे होती. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचेही नावही होते.
मलेशियातील महाधिवक्तापदी भारतीय वंशाचे टॉमी थॉमस
- मलेशियातील सत्ताबदलानंतर तेथील महाधिवक्तापदी (अॅटर्नी जनरल) भारतीय वंशाचे बॅरिस्टर टॉमी थॉमस यांची नेमणूक झाली आहे.
- माजी पंतप्रधान नजीब रझाक व त्यांची पत्नी यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीत ते महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
- मलेशियन विकास निधीत नजीब रझाक यांनी केलेले घोटाळे जनतेच्या रोषास कारण ठरले होते. याचाच फायदा घेऊन रझाक यांच्याविरोधात महाथीर महंमद यांनी उतारवयातही नेतृत्व करून सत्ता मिळवली.
- थॉमस हे मलेशियात गेल्या ५५ वर्षांत महाधिवक्तापदी विराजमान झालेले पहिलेच अल्पसंख्याक व्यक्ती आहेत.
- खरे तर मलेशियातील ३१ दशलक्ष लोकांपैकी दोनतृतीयांश लोक हे वांशिक मलय वंशाचे व मुस्लीम आहेत. त्यांनी हे पद मुस्लीम व्यक्तीला देण्याची मागणी केली असताना थॉमस यांची केलेली नेमणूक ही वेगळी आहे.
- थॉमस हे गेली ४२ वर्षे मलेशियात वकिली व्यवसायात काम करीत आहेत. ते मँचेस्टर विद्यापीठाच्या व्हिक्टोरिया इन्स्टिट्युय़ूशनचे माजी विद्यार्थी आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
- ब्रिटनमध्ये तेथील वकील संघटनेने १९७५मध्ये त्यांना निमंत्रित केले होते, पण नंतर १९७८ मध्ये त्यांनी मलेशियात वकिली सुरू केली.
- थॉमस यांनी १९८४-८७ या काळात ‘इन्साफ’ या नियतकालिकेचे संपादन केले होते. एकूण १५० महत्त्वाचे खटले त्यांनी लढवले.
- बॅरिस्टर असलेले थॉमस हे केवळ वकील म्हणूनच नाही, तर समाजशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिध्द आहेत.
- अर्थशास्त्र, राजकारण, इतिहास यात त्यांना तेवढाच रस असून त्यांनी वेगवेगळ्या मंचावर शोधनिबंधही सादर केले आहेत.
कसोटीमध्ये शिखर धवनचा उपहाराआधी शतक करण्याचा विक्रम
- अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
- कसोटी क्रिकेटमध्ये उपहाराआधीच शतक झळकावणारा शिखर धवन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
- याआधी ५ खेळाडूंना अशी करामत करता आलेली आहे. (व्हिक्टर ट्रम्पर, चार्ली मॅकार्टनी, डॉन ब्रॅडमन, माजीद खान, डेव्हिड वॉर्नर)
- शिखरने आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर उपहारापर्यंत नाबाद १०४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये १९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
- बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरोधात हा ऐतिहासिक कसोटी सामना सुरु आहे. अफगाणिस्तानचा हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे.
सीआयएच्या अहवालानुसार आरएसएस राष्ट्रवादी संघटना
- अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांचा उल्लेख ‘धार्मिक दहशतवादी समूह’ असा केला आहे.
- राजकीय दबाव टाकणाऱ्या संघटनांच्या यादीत सीआयएने या बजरंग दल आणि विहिंपचे नाव समाविष्ट केले आहे.
- याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही संघटना राष्ट्रवादी असल्याचे निरीक्षण सीआयएने नोंदवले आहे.
- सीआयएने काश्मीरच्या हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी संघटना असल्याचे नमूद केले आहे.
- तर राज्यसभा खासदार मौलाना मेहमूद मदानी यांच्या उलेमा-ए-हिंद या संघटनेला धार्मिक संघटनेचा दर्जा देण्यात आलाय.
- ‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे वार्षिक प्रकाशन आहे. या फॅक्टबुकमध्ये देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, उर्जा, दळणवळण सेवा, लष्कर याबाबतची माहिती दिलेली असते.
न्यूझीलंडची अॅमेलिया केर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू
- न्यूझीलंडची अष्टपैलू क्रिकेटपटू अॅमेलिया केर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे.
- अवघ्या १७व्या वर्षी अॅमेलियाने आयर्लंड विरुध्दच्या सामन्यात १४५ चेंडूत ३१ चौकार आणि २ षटकारांची बरसात करत नाबाद २३२ धावा केल्या.
- एकदिवसीय सामन्यातील हे तिचे पहिलेच शतक आहे. तिने आपल्या पहिल्याच शतकाला द्विशतकात परिवर्तित करण्याचा पराक्रम देखील केला.
- यानंतर अॅमेलियाने गोलंदाजीतही कमाल दाखवत आयर्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून संघाला सहज मिळवून दिला.
- पुरुष आणि महिलांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतक्या कमी वयात (१७ वर्ष २४३ दिवस) द्विशतक ठोकणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
- महिला क्रिकेटमध्ये वन-डेत २०० धावा ठोकण्याचा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने केला होता.
- महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :-
- अॅमेलिया केर (न्यूझीलंड) : नाबाद २३२ धावा वि. आयर्लंड
- बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : नाबाद २२९ धावा वि. डेन्मार्क
- दिप्ती शर्मा (भारत) : १८८ धावा वि. आयर्लंड
२०२६चा फिफा वर्ल्डकप मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये
- २०२६च्या फिफा वर्ल्डकपच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला देण्यात आली आहे.
- मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेमे मोरोक्कोला मागे टाकत फिफा वर्ल्डकपचे यजमानपद पटकावले.
- यामुळे सुमारे ३२ वर्षांनंतर उत्तर अमेरिकेत फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येणार आहे.
- यापूर्वी अमेरिकेने १९९४मध्ये फिफा वर्ल्ड पचे यजमानपद भूषविले होते. त्यावेळी अमेरिकन संघ पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
- याआधी उत्तर अमेरिकेने ३ वेळा फिफा वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले आहे. तर आफ्रिकेने एकदा स्पर्धेचे आयोजन केले आहे.
- फिफाचे अध्यक्ष : जिआनी इन्फेंटिनो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा