चालू घडामोडी : ३ जून

अग्नि ५ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

 • ओदिशातील बालासोर येथील डॉ. अब्दुल कलाम बेटावरून स्वदेशी बनावटीच्या अग्नि ५ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
 • लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अण्वस्त्रे वाहून नेता येऊ शकतात.
 • या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५००० किमी इतकी असून, हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते. या क्षेपणास्त्राची लांबी २० मीटर तर वजन ५० टन आहे.
 • अग्नि ५ची ही सहावी चाचणी ठरली. या क्षेपणास्त्राच्या यापूर्वीच्या सर्व पाच चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या.
 • इतर अग्नि ५च्या तुलनेत हे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशा दर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे.

डॉ. कमलजित बावा यांना लिनियन पुरस्कार

 • हिमालयाच्या जैवविविधतेचे गाढे अभ्यासक डॉ. कमलजित बावा यांना अलीकडेच वनस्पतिशास्त्रातील मानाचा लिनियन पुरस्कार मिळाला आहे.
 • लिनियन सोसायटी ऑफ लंडनचा हा मानाचा पुरस्कार मिळालेले ते पहिलेच भारतीय वैज्ञानिक ठरले आहेत.
 • सध्या डॉ. बावा बंगळूरु येथील ‘अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी’ संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे संशोधन हे जैवविविधता व वनस्पतिशास्त्रातील आहे.
 • उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ, संवर्धन जीवशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. ते बोस्टनच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स येथे जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
 • उष्ण कटिबंधीय वनस्पती, लाकडापेक्षा वेगळी वनउत्पादने, मध्य अमेरिका, पश्चिम घाट व पूर्व हिमालयाची जैवविविधता हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
 • ‘कन्झर्वेशन अ‍ॅण्ड सोसायटी’ नियतकालिक ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी’ पोर्टल हे त्यांचे उपक्रम विशेष महत्त्वाचे आहेत.
 • त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. पंजाब विद्यापीठातून बीएस व एमएस केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन व हार्वर्ड विद्यापीठांतून शिक्षण घेतले.
 • अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सचे ते सदस्य, तर रॉयल सोसायटीचे फेलो आहेत. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीच्या समितीत त्यांनी काम केले आहे.
 • एकूण १८० शोधनिबंध त्यांनी लिहिले असून १० पुस्तकांचे संपादन केले आहे. ‘सह्याद्रीज इंडियाज वेस्टर्न घाट्स’ हा विशेषांक त्यांनी लिहिला होता. ‘हिमालया-माऊंटन्स ऑफ लाइफ’ व ‘सह्याद्रीज’ ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
 • हवामान बदलांमुळे भारतातील जैवविविधतेची महत्त्वाची केंद्रे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, ती वाचवण्यासाठी त्यांनी अशोका ट्रस्टच्या माध्यमातून मोठे काम केले आहे.
 • यापूर्वी त्यांना गनरेस सस्टेनिबिलिटी अवॉर्ड, दी सोसायटी फॉर कॉन्झर्वेशनचा जीवशास्त्र पुरस्कार, ग्युजेनहेम फेलो, पी.एन. मेहरा स्मृती पुरस्कार असे मानसन्मान मिळाले आहेत.

कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे निधन

 • तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे ३ जून रोजी चंद्रपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते नांदेडमधील नागभीड तालुक्यातील होते.
 • दादाजी खोब्रागडे हे मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले होते.
 • त्यांनी आपल्या संशोधनातून शेतकऱ्यांना पर्यायाने देशाला समृद्ध केले होते. प्रसिद्ध ‘एचएमटी’ या तांदळाचा प्रकारासह त्यांनी इतर ८ वाणे शोधली आहेत.
 • त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही.
 • मात्र त्यांनी आपल्या अवघ्या दीड एकर शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले. दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे.
 • १९८५-९०च्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या एचएमटी कंपनीच्या घड्याळ्यांमुळे त्यांनी शोधलेल्या एका प्रसिद्ध वाणाला ‘एचएमटी’ हे नाव देण्यात आले होते.
 • त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१०मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.
 • ५ जानेवारी २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 • तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील तांदूळ संशोधनातील त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित केले.
 • शालेय पाठ्यपुस्तकात ‘थोरांची ओळख’ या शिर्षकाखालील एका धड्यात त्यांच्या कार्याची ओळख करुन देण्यात आली आहे.
 • त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते.
 • दादाजींनी विकसित केलेले नऊ वाण : एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा