चालू घडामोडी : ५ जून

जागतिक पर्यावरण दिन

  • दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.
  • पर्यावरणासाठी पुरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
  • तसेच पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरण समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हादेखील यामागचा उद्देश आहे.
  • पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द ‘Environ’ या शब्दापासून तयार झाला आहे. ‘Environ’ म्हणजे ‘Surrounding or encircle’.
  • सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
  • पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. त्यामुळे १९६०पासून पर्यावरण हा विषय स्वतंत्र्यरित्या अभ्यासाठी येऊ लागला.
  • बदलत्या हवामानाचे परिणाम हळूहळू जगाला जाणवू लागले होते. भविष्यात याचे गंभीर परिणाम मानवजातीला भेडसावू लागतील, फक्त मनुष्यजीवांवरच नाही तर पशू-पशी सगळ्यांनाच याचे परिणाम भोगावे लागतील याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली.
  • पर्यावरण संरक्षणासाठी ५ जून १९७२ या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची दखल घेत काही देश एकत्र जमले. बदलते हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी ही परिषद आयोजीत करण्यात आली होती.
  • त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९७४पासून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.
  • पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाअधिक देशांनी सहभागी व्हावे यासाठी १९८७पासून दरवर्षी एकएक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात येते.
  • २०१८च्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे आहे. ‘प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालणे’ ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

मुगलसराय स्टेशनचे पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन नामकरण

  • उत्तर प्रदेशाताली योगी आदित्यनाथ सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नामकरण पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे केले आहे. याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे.
  • जनतेच्या मागणीवरुन उत्तर प्रदेशातील मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय करण्यात आल्याचे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
  • योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्याच वर्षी मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता.
  • दरम्यान, योगी सरकारच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून विरोध व्हाऊ लागल्याने काही काळ त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला होता.
  • काही लोकांनी मुगलसराय जंक्शनला देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आणि भाजपाचे नेते असलेले दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री या दोघांचाही मुगलसराय शहराशी जवळचा संबंध आहे.
  • मुगरसराय हे शास्त्रींचे जन्मस्थळ आहे. तर १९६८मध्ये दीनदयाल उपाध्याय यांचा मुगलसराय जंक्शन येथे संशयास्पद मृत्यू झाला होता.
  • बऱ्याच काळापासून भाजपा या रेल्वे स्टेशनला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी करीत होती.

किशनगंगा धरण प्रकरणी पाकिस्तानला धक्का

  • भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने भारताचा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.
  • या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालात दाद मागितली. तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
  • त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
  • सिंधू नदीवरील भारताचे अनेक प्रकल्प हे जागतिक बँकेच्या मध्यस्तीने १९६०साली झालेल्या सिंधू पाणी कराराचे भंग करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून नेहमीच करण्यात येत असतो.
  • जागतिक बँकेने सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप निश्चित करण्यासाठी हा करार करवून घेतला होता.
  • सद्यस्थितीत सिंधूनदीच्या पाण्यावर पाकिस्तानमधील सिंचनाखालील ८० टक्के शेतीला पाणीपुरवठा होतो.
  • त्यामुळे सिंधू नदीवर धरण बांधल्यास नदीचा मार्ग बदलेल तसेच पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीमध्येही कमालीची घट होईल, अशी भीती पाकिस्तानने वाटत आहे.
  • दुसरीकडे भारताने मात्र सिंधू पाणी करारानुसार जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा आपल्याला अधिकार आहे. तसेच यामुळे नदीचा प्रवाह आणि पाणीपातळीमध्ये कोणत्याही प्रकारची घट होणार नसल्याचा दावा केला आहे.
  • या धरणाच्या आराखड्याबाबत पाकिस्तानसोबत असलेला वाद सोडवण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी भारताने केली आहे.

ग्वाटेमालाजवळ फ्युगो ज्वालामुखीचा उद्रेक

  • ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला, तर ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले.
  • या उद्रेकामुळे ग्वाटेमाला शहरात नदीच्या रूपात लाव्हा वाहू लागला. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे.
  • या ज्वालामुखी उद्रेक एवढा मोठा होता की, यातून निघालेला लाव्हा आणि राख आठ किमीपर्यंत पसरली आहे. या वर्षीचा फ्युगोचा हा दुसरा स्फोट होता.
  • सेंटियागुइटो आणि पकाया असे आणखी दोन ज्वालामुखी ग्वाटेमालामध्ये आहेत आणि त्यांचाही कोणत्याही वेळी उद्रेक होऊ शकतो.

नंदन नीलेकणी अर्धी संपत्ती दान करणार

  • इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलेकणी, त्यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी यांच्यासह तीन अनिवासी भारतीय अब्जाधीश आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कारणांसाठी दान करणार आहेत.
  • बिल आणि मेलिंडा गेट्‌स, वॉरेन बफे या प्रसिद्ध उद्योजकांनी जनहितार्थ सुरू केलेल्या ‘द गिव्हिंग प्लेज’ उपक्रमाअंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • नीलेकणी यांसह अनिल व एलिसन भुसरी, शमशेर व शबीना वायलिल, बीआर शेट्टी आणि त्यांच्या पत्नी चंद्रकुमारी ही अनिवासी भारतीय दांपत्ये ही आपली संपत्ती दान करणार आहेत.
  • गेल्यावर्षी ‘द गिव्हिंग प्लेज’ या संस्थेशी जोडल्या गेलेल्या १४ जणांमध्ये या दांपत्यांचा समावेश आहे.
  • ‘द गिव्हिंग प्लेज’ ही संस्था जगभरातील धनाढ्य उद्योजकांना आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कामांसाठी दान करण्यासाठी प्रोत्साहित करते.
  • या संस्थेची स्थापना गेट्स दाम्पत्याने वॉरन बफे यांच्या सहकार्याने २०१०साली केली.
  • या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारणारे नीलेकणी हे चौथे भारतीय आहेत. याआधी विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी, बॉयकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ आणि पी. एन. सी. मेनन यांनी या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा