भाजपाने मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे युती सरकार सत्तेवर होते.
भाजपाने पाठींबा काढून घेतल्यानंतर हे सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला आणि भाजपाने राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली.
रमझानच्या काळात राजझिंग काश्मीरचे संपादक शुजाद बुखारी यांची हत्या झाल्यानंतर भाजपा आणि पीडीपीमधील संबंध तणावपूर्ण झाले होते.
रमजानच्या काळात राज्यात लागू केलेली शस्त्रसंधी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर हा तणाव आणखी वाढला होता.
जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ
पक्ष
जागा
पीडीपी
२८
भाजप
२५
नॅशनल कॉन्फरन्स
१५
काँग्रेस
१२
पिपल्स कॉन्फरन्स
०२
नामनिर्देशित
०२
एकूण जागा
८७
भारत, चीन आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सिपरी) अहवालानुसार भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
आशियातील या तीन प्रमुख देशांनी गेल्या वर्षभरात अण्वस्त्र यंत्रणा अधिक सुसज्ज केली असून अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ केली आहे.
सध्या हे तिन्ही देश अत्याधुनिक आणि लहान अण्वस्त्रांच्या विकासावर भर देत असल्याचे सिपरीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी चीनकडे असणाऱ्या अण्वस्त्रांची संख्या २७० इतकी आहे. आता ती वाढून २८० वर पोहोचली आहे.
भारताकडे सध्याच्या घडीला १३०-१४० अण्वस्त्र असून पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या १४०-१५० इतकी आहे. अण्वस्त्रांच्या संख्येचा विचार केल्यास पाकिस्तान आत्ताही भारताच्या पुढे आहे.
गेल्या वर्षभरात या तिन्ही देशांनी त्यांच्या अण्वस्त्रांच्या ताफ्यात प्रत्येकी १० अण्वस्त्रांनी वाढ केली आहे. मात्र यातील कोणतेही अण्वस्त्र डागण्यासाठी क्षेपणास्त्रात लावण्यात आलेले नाही.
आशिया खंडात अण्वस्त्र स्पर्धा सुरू असताना पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र स्थिरता आहे, असे निरीक्षण सिपरीने नोंदवले आहे.
अण्वस्त्रांच्या बाबतीत संपन्न असलेल्या देशांनी आपल्याकडील अण्वस्त्रांच्या संख्येत कपात केली किंवा स्थिर ठेवली आहे.
या अहवालानुसार, जागतिक शक्ती असलेले देश अण्वस्त्रांची संख्या कमी करत असले तरी त्यांचे आधुनिकीकरण आणि मारक क्षमता वाढवित आहेत.
अमेरिकेने अण्वस्त्रांची संख्या ६,८०० हून ६,४८० केली आहे. तर रशियानेही अण्वस्त्रांची संख्या ७,०००हून कमी करुन ६,८५० केली आहे.
जगभरातील अण्वस्त्र संपन्न देशांकडे सद्यस्थितीला १४,४६५ अण्वस्त्र आहेत. गेल्या वर्षी हा आकडा १४,९३५ इतका होता. यातील ९२ टक्के अण्वस्त्रे फक्त अमेरिका आणि रशियाकडे आहेत.
मॅसेडोनिया देशाचे उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक असे नामांतर
पूर्वीच्या युगोस्लाव्हियातून वेगळे झालेल्या मॅसेडोनिया या देशाचे नाव बदलून ते उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक (रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसेडोनिया) असे करण्याबाबत ग्रीस आणि मॅसेडोनिया यांच्यात करार झाला आहे.
ग्रीसचे पंतप्रधान ॲलेक्सिस त्सिपरास आणि मॅसेडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
दोन्ही देशांच्या संसदेची संमती मिळाल्यावर आणि मॅसेडोनियाच्या जनतेने सार्वमतात अनुकूल कौल दिल्यावरच हा नावबदल प्रत्यक्षात अंमलात येईल.
सध्या हा देश फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅसेडोनिया (एफवायआरओएम) नावाने ओळखला जातो.
मॅसेडोनिया हे नाव ग्रीसच्या उत्तर प्रांताचे नाव होते. १९९१साली युगोस्लाव्हियातून फुटून निघालेल्या नव्या देशाने हेच नाव घेतल्याने ग्रीक लोक संतप्त झाले.
भविष्यात हा देश त्याच नावाच्या आपल्या प्रांतावर आणि ग्रीक संस्कृतीवर हक्क सांगेल, असा ग्रीकवासियांचा आक्षेप आहे. त्यामुळे या शेजारी देशाचे संबंध ताणलेले आहेत.
नाटो व युरोपिय संघाचा ग्रीस सदस्य आहे, परंतु मॅसेडोनिया या नावास ग्रीसमध्ये असलेल्या तीव्र विरोधामुळे मॅसेडोनियाचा या दोन्ही संघटनांमधील प्रवेश अडकून पडला आहे.
या बाबतीत मॅसेडोनियाशी कोणताही तडजोड करण्यास ग्रीसच्या ७० टक्के नागरिकांचा विरोध आहे.
याच मुद्द्यावर संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानात त्सिपरास यांचे सरकार थोडक्यात बचावले होते.
या दोन देशांमध्ये सुमारे २७ वर्षांनंतर शांतता प्रस्थापित होण्याची पहिलीच वेळ आहे.
इंग्लंडचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ४८१ अशी धावसंख्या उभारत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.
यापूर्वीही हा विश्वविक्रम इंग्लंडच्याच नावावर होता. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध ४४४ धावा केल्या होत्या. त्याखालोखाल श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्ध ४४३ धावा केल्या आहेत.
इंग्लंडसाठी जॉनी बेअरस्टोव्हने यावेळी ९२ चेंडूंत १५ चौकार व ५ षटकारांच्या जोरावर १३९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
तर अॅलेक्स हेल्सने ९२ चेंडूंत १६ चौकार व ५ षटकारांच्या जोरावर १४७ धावांची तुफानी खेळी साकारली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा