विश्वास मंडलिक व योग इन्स्टिट्यूटला पंतप्रधान पुरस्कार
नाशिकचे योगतज्ज्ञ विश्वास मंडलिक व मुंबईतील योग इन्स्टिट्यूट या संस्थेला योगविद्येच्या प्रसार व विकासासात भरीव कामगिरीबाबत यंदाचे पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाले आहेत.
२१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार देण्यात येतात. मानचिन्ह, मानपत्र व प्रत्येकी २५ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या पुरस्कारांसाठी देशभरातून विविध गटांत १८६ नामांकने प्राप्त झाली होती. या नावांची छाननी दोन समित्यांकडून करण्यात आली.
प्राचीन ग्रंथांचे अध्ययन करुन विश्वास मंडलिक यांनी पतंजली व हटयोगाचे उत्तम ज्ञान मिळवले.
१९७८साली योग धाम विद्या या संस्थेची पहिली शाखा त्यांनी सुरु केली. आता या संस्थेच्या देशात १६० शाखा आहेत.
त्यानंतर योगविद्या शिकविण्यासाठी मंडलिक यांनी १९८३साली योग विद्या गुरुकुल नावाची संस्था स्थापन केली.
योगविद्येवर त्यांनी ४२ पुस्तके लिहिली असून, योगविद्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ३०० सीडी त्यांनी तयार केल्या आहेत.
मुंबईतील योग इन्स्टिट्युट ही १९१८मध्ये योगेंद्रजी यांनी स्थापन केली. यंदा या संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली.
या संस्थेने आजवर ५० हजारपेक्षा अधिक योगविद्या शिक्षक तयार केले आहेत तसेच योगविद्येबद्दल ५००हून अधिक पुस्तके या संस्थेने प्रसिद्ध केली आहेत.
बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन आणि जे.पी. मॉर्गन यांच्या हेल्थकेअर कंपनीची धुरा अतुल गावंडे यांच्याकडे
बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे.
अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय असेल. येत्या ९ जुलैपासून गवांदे कंपनीच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतील.
या तिन्ही कंपनीच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.
औषधोपचाराच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा या कंपनीचा प्रामुख्याने भर असेल.
बर्कशायर हॅथवेचे संस्थापक व प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे, अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती.
या तिन्ही कंपन्यांच्या ना नफा तत्त्वावर सुरु केलेल्या या कंपनीमुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
अल कायदा आणि आयसिसशी संबंधित संघटनांवर प्रतिबंध
‘अल कायदा’ आणि ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांच्या नव्या संघटनांना बेकायदा ठरवत केंद्र सरकारने प्रतिबंध लावले आहेत.
यामध्ये अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड शाम खुरासन या संघटनांचा समावेश आहे.
या संघटना वैश्विक जिहादसाठी भारतीय तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांना आपल्याच देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त करतात.
आयसिस-के या संघटनेला इस्लामिक स्टेट इर खुरासन प्रोविन्स (आयएसकेपी) तसेच आयएसआयएस विलायत खुरासन या नावानेही ओळखले जाते.
त्याचबरोबर अल कायदाशी संबंधीत असलेली अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट (एक्यूआयएस) ही संघटनाही एक दहशतवादी संघटना आहे.
या संघटनेने आपल्या शेजारी देशात दहशतवादी कृत्ये केली आहेत. तसेच भारतीय उपखंडात भारताविरोधात दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ही संघटना करते.
या संघटना कट्टरवाद पसरवताना भारतातील तरुणांना आपल्या संघटनेत भरती करीत आपली मुळे मजबूत करण्याचे काम करीत आहेत.
तसेच लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे उखडून फेकून देऊन, स्वतःचा खलीफा स्थापन करण्यासाठी दहशतवादी कृत्ये घडवून आणत आहेत.
देशातील तरुणांमध्ये कट्टरवाद निर्माण होणे हे राष्ट्रहित आणि आंतरराष्ट्रीय शांतीसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे.
त्यामुळे बेकायदा कृत्ये प्रतिबंध कायद्याअंतर्गत या संघटनांवर कारवाई करण्यात आली असून, अशा प्रतिबंधित संघटना आणि त्यांच्या सदस्यांविरोधात कारवाईसाठी या कायद्यात कठोर शिक्षेची तरतुद आहे.
इंग्लंडच्या महिला संघाकडून टी- २०मधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद
इंग्लंडच्या महिला संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २० षटकांत २५० धावा करत टी- २० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली.
न्यूझीलंड महिला संघाने अवघ्या काही तासांपूर्वीच केलेला विक्रम इंग्लंडने मोडला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० षटकांत २१६ धावा केल्या होत्या.
इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांच्या तिरंगी टी-२० मालिकेमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा