एससीओ शिखर बैठकीनिमित्त मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या किंगडाओ शिखर बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले.
भारतीय पंतप्रधानांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर बैठकीस उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मोदी यांच्याशिवाय चीनचे अध्यक्ष जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, इराणचे अध्यक्ष हासन रूहानी, पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक समस्यांवर चर्चा केली.
दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये वुहान बैठकीनंतर सहा आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक होत असून, तत्पूर्वी डोकलाम मुद्द्यावर दोन्ही देशांतील संबंध तणावाचे बनले होते.
या बैठकीत द्विपक्षीय संबंध व व्यापार तसेच गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.
यावेळी ब्रह्मपुत्रा नदीच्या जलप्रवाहासंबंधीची सर्व शास्त्रीय माहिती चीनने भारतास देण्यासाठी व भारतातून बासमती तांदळाची चीनमध्ये निर्यात करण्यासाठीच्या दोन करारांवर मोदी व शी जिनपिंग यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
राफेल नदालला ११व्या वेळेस फ्रेंच ओपनचे जेतेपद
क्ले कोर्टचा बादशहा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने ११व्या वेळेस फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकवत विक्रम केला आहे.
फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमचा ६-४, ६-३ आणि ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.
तसेच १९९५नंतर ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारा थिएम हा ऑस्ट्रियाचा पहिला खेळाडू ठरला आहे.
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या ३२ वर्षीय नदालने यापूर्वी २००५ ते २००८, २०१० ते २०१४ तसेच गतवर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते.
त्याने अकराव्यांदा विजेतेपद मिळवत मार्गारेट कोर्ट यांच्या अकरा विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली.
त्याचे कारकिर्दीतील हे १७वे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. नदालने फ्रेंच ओपन स्पर्धा अकरावेळा, अमेरिकन ओपन तीन वेळा, विम्बल्डन दोन वेळा आणि ऑस्ट्रेलियन ओपन एकवेळा जिंकली आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये त्याने एकदा सुवर्णपदक जिंकले आहे.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या रॉजर फेडररपेक्षा (२०) नदाल आता तीन ग्रँडस्लॅम जेतेपदांनी मागे आहे.
केंद्रातील १० सहसचिव पदांसाठी थेट भरती
मोदी सरकारने केंद्रातील १० महत्त्वाच्या खात्यांमध्ये सहसचिवांच्या नेमणुका ‘लॅटरल एन्ट्री’ पद्धतीने थेट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकारने सनदी अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) निवड करण्याच्या प्रचलित पद्धतीला छेद दिला आहे.
हे करत असताना सरकारने संबंधित विषयातील ज्ञान आणि अनुभव हा एकमेव निकष डोळ्यापुढे ठेवत ही पदे खासगी उद्योगांतील व्यक्तींसाठीही खुली केली आहेत.
कार्मिक विभागाने या थेट भरती योजनेच्या नियम व अटींचा तपशील देणारी अधिसूचना मार्गदर्शिकेसह जारी केली आहे.
महसूल, वित्तीय सेवा, आर्थिक बाबी, कृषी, रस्ते वाहतूक व महामार्ग, जलवाहतूक, पर्यावरण आणि वने, नवीन आणि अक्षय ऊर्जासाधने, नागरी विमान वाहतूक आणि वाणिज्य या १० विभागांतील सहसचिवांची पदे या पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
ज्यांना राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देण्याची इच्छा आहे अशा बुद्धिमान व समर्पित व्यक्तींची नेमणुक या पदांवर केली जाणार आहे. प्रशासनात नवे विचार व दृष्टिकोन आणणे, हा यामागचा हेतू आहे.
निवडलेल्या उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाईल. सुरुवातीस हे कंत्राट ३ वर्षांसाठी असेल व ते ५ वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकेल.
या सहसचिवांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा १,४४,२०० ते २,१८,२०० या ‘पे मॅट्रिक्स’मध्ये पगार मिळेल. याखेरीज सरकारमधील समकक्ष पदावरील अधिकाऱ्याला मिळणारे भत्ते व अन्य सुविधाही त्यांना मिळतील.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था इत्यादीमधील पात्र उमेदवारांना ही योजना खुली आहे.
या जागांसाठी इच्छुकांना १५ जून ते ३० जुलै या काळात फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. उमेदवाराचे वय १ जुलै रोजी किमान ४० वर्षे असायला हवे. तसेच त्याला त्याच्या क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी लेखी परीक्षा होणार नसून, निवडलेल्या उमेदवारांची कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीतर्फे केवळ मुलाखत घेण्यात येईल.
भारत आणि नेपाळदरम्यान सूर्य किरण-१३ युद्धसराव
भारत आणि नेपाळ देशांनी परस्पर लष्करी समन्वय स्थापित करण्यासाठी ३० मे ते १२ जून दरम्यान उत्तराखंडमधील पिथोरागड येथे सूर्य किरण १३ या संयुक्त युद्ध सरावाचे आयोजन केले.
या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश दहशतवादविरोधी कारवायांविरुध्द दोन्ही देशांमधील सैन्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे हा आहे.
तसेच अतिदुर्गम आणि पर्वतीय प्रदेशातील दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देणे, हादेखील या युद्धसरावाचा हेतू आहे.
या सरावामध्ये ३०० भारतीय तसेच नेपाळी सैनिकांनी सहभाग घेतला. सैनिकांच्या सहभागाच्या दृष्टीने सूर्य किरण १३ हा सर्वात मोठा सैन्य अभ्यास आहे.
सूर्य किरण युद्धसराव दर सहा महिन्यांच्या अंतराने भारत व नेपाळ या देशांमध्ये आयोजित करण्यात येतो.
सैन्य समन्वयासह आपत्ती व्यवस्थापन व बचाव या महत्वाच्या बाबींवर या सरावात भर दिला जातो. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यास मदत होते.
भारतावर मात करत बांगलादेशला आशिया चषक विजेतेपद
सहा वेळा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघावर मात करत बांगलादेशने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बांगलादेशचे हे पहिलेच टी-२० आशिया चषक विजेतेपद ठरले.
मलेशियात पार पडलेल्या आशिया चषकावर आपले नाव कोरत बांगलादेशच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
बांगलादेशची रुमाना अहमद हिने अष्टपैलू खेळ करत सामनावीराचा किताब पटकावला.
अंतिम सामन्यात जेतेपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताला हा सामना गमवावा लागला.
अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी ११३ धावांचे आव्हान दिले. बांगलादेशने हे आव्हान ३ गडी राखून पूर्ण करत आशिया चषकावर नाव कोरले.
काँग्रेसचे माजी खासदार शांताराम नाईक यांचे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे माजी खासदार शांताराम नाईक यांचे ९ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (वयाच्या ७२व्या वर्षी)
नाईक हे काही काळ गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. नाईक हे दक्षिण गोवा मतदारसंघातून १९८४मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते.
व्यवसायाने वकील असलेले नाईक यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. दक्षिण गोवा वकील संघटना व राज्य बार असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
नाईक यांनी राज्यसभेत २००५-२०११ व २०११ ते २०१७ असे दोनदा गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते.
आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक खाजगी विधेयके संसदेत मांडली. गोव्यास घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा