चालू घडामोडी : ६ जून
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१८-१९या आर्थिक वर्षातील पहिले पतधोरण जाहीर केले असून, यात सुमारे साडे चार वर्षांनी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
- आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने ६ जून रोजी हे पतधोरण जाहीर केले.
- आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ करून ६.२५ टक्के केला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढवून ६ टक्के केला आहे.
- या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर वाढू शकतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
- बँका ज्या दरानं आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर (म्हणजे रिव्हर्स रेपो) त्यांना ६ टक्के व्याज मिळेल.
- रेपो रेट : बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचे कर्जही महाग होते आणि त्याचा फटका सर्वसामान्य कर्जदारांना बसतो.
- रिव्हर्स रेपो रेट : बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचे काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.
सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली
- जगप्रसिद्ध नियतकालिक ‘फोर्ब्स’ने २०१८तील जगभरातल्या १०० सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
- या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये एकाही महिला खेळाडूचा समावेश नाही.
- विराट या यादीमध्ये यंदा ८३व्या स्थानावर आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या यादीमध्ये तो ८९व्या क्रमांकावर होता.
- २०१८मध्ये विराटने १६१ कोटींची कमाई केली आहे. या संपत्तीमध्ये त्याचे वेतन आणि अन्य कामकाजातून मिळालेल्या रकमेचा समावेश आहे.
- या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉयड मेवेदर आहे. २०१८ या वर्षातील त्याची कमाई १९१३.३ कोटी रुपये आहे.
- त्यानंतर फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (७४४.२ कोटी), फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनॉल्डो (७२४.२ कोटी), मिक्स्ड मार्शल आर्टस खेळाडू कोनॉर मेकग्रेगर (६६३.९ कोटी), फुटबॉलपटू नेमार (६०३.५ कोटी) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
निकेश अरोरा : सर्वाधिक पगार घेणारे सीईओ
- उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे जन्मलेले निकेश अरोरा यांची अमेरिकेतील पालो अल्टो नेटवर्क्स इंक या सिक्युरिटी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पालो अल्टोकडून अरोरा यांना १२.८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास ८५९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचे नाव दाखल झाले आहे.
- निकेश यांच्याआधी अॅपलचे सीईओ टीम कुक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळवणारे सीईओ होते. त्यांचे पॅकेज ११.९ कोटी डॉलर आहे.
- जगभरातल्या सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर निर्माता पालो नेटवर्क्स कंपनीची जगभरातल्या जवळपास ५० हजार कंपन्यांबरोबर भागीदारी आहे. यात ५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
- टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये क्लाऊड आणि डेटा डीलिंगचा अरोरा यांचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. यापूर्वी ते सॉफ्ट बॅंक आणि गुगलमध्ये कार्यरत होते.
- पालो अल्टोमध्ये अरोरा यांनी मार्क मिकलॉकलीन यांची जागा घेतली आहे. मार्क २०११पासून पालो अल्टोचे सीईओ होते.
- मार्क मिकलॉकलीन हे कंपनीमध्ये मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत, तर अरोरा हे मंडळाचे अध्यक्ष असतील.
- ६ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे निकेश अरोरा यांचा जन्म झाला. वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते.
- त्यांनी १९८९साली आयआयटी वाराणसीमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि त्यानंतर काही काळ त्यांनी विप्रोमध्ये नोकरी केली.
- पुढील शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जाण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली. नंतर अमेरिका नॉर्थ-ईस्टर्न यूनिव्हर्सिटीतून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली.
तामिळनाडूमध्ये १ जानेवारी २०१९ पासून प्लास्टिकबंदी
- प्लास्टिकच्या पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तूंवर तामिळनाडू सरकारने पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
- आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी विधानसभेत प्लास्टिक बंदीबाबत घोषणा केली.
- या निर्णयामुळे १ जानेवारी २०१९ पासून तमिळनाडूमध्ये प्लास्टिक निर्मिती, विक्री, साठा आणि प्लास्टिक पेपर, कप, पिण्याचे पाणी विकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या, स्ट्रॉ आणि इतर प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी लागू होईल.
- यापूर्वी मुख्यमंत्रिपदावर असताना जे. जयललिता यांनी २००२मध्ये सर्वप्रथम प्लास्टिक बंदी जाहीर केली होती. त्यासाठी जयललिता यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.
रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रामध्ये करार
- रोहिंग्यांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार आणि संयुक्त राष्ट्रे यांनी एक करार केला आहे. यामुळे म्यानमारमधून पळून गेलेल्या ७ लाख रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये आणण्याच्या योजनेला गती येण्याची शक्यता आहे.
- रोहिंग्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य आणि अत्यंत सुरक्षित व शाश्वत पुनर्वसनासाठी सहकार्य मिळण्याची अपेक्षा या करारातून करण्यात आलेली आहे.
- सुमारे १३ लाख लोकसंख्या असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील रखाइन प्रांतात यांची सर्वात जास्त वस्ती होती.
- मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. तसेच त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली.
- स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे.
- जुलै-ऑगस्ट २०१७मध्ये म्यानमारच्या रखाइन प्रांतामध्ये रोहिंग्या आणि म्यानमार सुरक्षादले व पोलीस यांच्यामध्ये झालेल्या तणावामुळे या रोहिंग्यांनी घाबरुन देश सोडला होता.
- म्यानमारने कारवाई करताना डझनभर रोहिंग्या शिक्षक, वृद्ध लोक, धार्मिक नेत्यांना लक्ष्य करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप रोहिंग्या करत आहेत.
- हे लोक बांगलादेशसह इतर अनेक देशांमध्ये आश्रयासाठी गेले. त्यातील बहुतांश लोक बांगलादेशातील कॉक्स बझार येथे गेले ९ महिने राहात आहेत.
- बांगलादेशात असणाऱ्या रोहिंग्यांच्या छावणीमध्ये ९ महिन्यांमध्ये १६ हजार मुलांचा जन्म झाला आहे. या छावणीमध्ये ७ लाख रोहिंग्या राहात आहेत.
- म्यानमारच्या सुरक्षा दलांकडून रोहिंग्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला जात आहे. रोहिंग्या महिलांवर बलात्कार आणि रोहिंग्यांची हत्या झाल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
गौरी लंकेश व सुदीप दत्ता यांचे नाव न्युझियम संग्रहालयात
- पत्रकारिता आणि बातम्यांचा इतिहास सांगणारे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय असलेल्या ‘न्युझियम’मधील पत्रकारांच्या स्मारकामध्ये गौरी लंकेश व सुदीप दत्ता भौमिक या २ भारतीयांसह १८ पत्रकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
- जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे, त्याची जाणीव सर्वांना व्हावी या हेतूने अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे ‘न्युझियम’ संग्रहालयात पत्रकारांचे हे स्मारक उभारले आहे.
- भारतातील जातीव्यवस्था व हिंदु मुलतत्त्ववादावर घणाघाती प्रहार करणारे लेख गौरी लंकेश नेहमी लिहीत.
- गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी एका व्यक्तीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
- सुदीप दत्ता भौमिक यांनी निमलष्करी दलातील भ्रष्टाचार त्रिपुरातील एका वृत्तपत्रात लेखन करुन उजेडात आणला होता.
- त्यानंतर एक आठवड्याने निमलष्करी दलाचा एक अधिकारी तपन देववर्मा याने सुदीप यांना २१ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटायला बोलावले. त्यावेळी रागाच्या भरात देववर्माने आपल्या अंगरक्षकाला सुदीप यांना गोळी घालून ठार मारण्याचा आदेश दिला.
- दक्षिण अशियाई देशांतील यामिन रशीद या पत्रकाराच्या नावाचाही यंदा न्यूजियमच्या स्मारकात समावेश करण्यात आला आहे. मालदीवमधील द डेली पॅनिक या वृत्तपत्रासाठी यामिन काम करत होते.
कबड्डीपटू अशोक कोंढरे यांचे ५ जून निधन
- जपान, नेपाळ, भूतान, बांगलादेशासारख्या देशांमध्ये कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करणारे शिवछत्रपती पुरस्कारविजेते माजी राष्ट्रीय खेळाडू अशोक कोंढरे यांचे ५ जून रोजी आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
- चढाईतील दादा खेळाडू म्हणून कोंढरे यांनी आपली कारकीर्द गाजविली. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या नियामक मंडळाचे ते अध्यक्ष होते.
- खेळाडू म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतरही कोंढरे यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू ठेवले होते. राज्य सरकारने त्यांना १९७६मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांचा राजीनामा
- क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात मंडळाची प्रतिमा डागाळली गेली असल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याचीही चर्चा आहे.
- क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नवी दिशा देण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. मंडळाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
- माजी अकाउंटंट आणि मध्यम वेगवान गोलंदाज सदरलँड हे प्रथम श्रेणी सामने खेळले असून १९९८मध्ये ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे महाव्यवस्थापक बनले.
- २००१मध्ये माल्कम स्पीड यांच्या जागी त्यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. गेली १७ वर्षे त्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पेलली.
- सदरलँड यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला १२ महिन्यांची नोटीस दिली असून जोपर्यंत त्यांना योग्य पर्याय मिळत नाही तोपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा